Jalgaon News : जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे नष्ट करण्याचा विडा उचलणाऱ्या कर्तव्यनिष्ठ डीवायएसपींनी बांधकाम मजुराचा जीव वाचवला.
अव्हाणे ते जळगाव हे अंतर त्यांनी अवघ्या साडेपाच मिनिटांत गाठत विजेच्या धक्क्याने कोमात गेलेल्या मजुराला तातडीची मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला. (dysp appasaheb pawar saved life of workers jalgaon news)
या मजुराच्या कुटुंबीयांनी भरल्या डोळ्यांनी डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांचे आभार मानले.
गिरणा नदीपात्राची संपूर्ण तटबंदीच तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची उचल होऊन ती अवैध मार्गाने सर्वत्र पोचवली जाते. वर्षेनुवर्षे हा क्रम सुरू होता.
मात्र तीन महिन्यांपासून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी तालुका पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दारूभट्ट्यांवर बुलडोझर फिरवण्यापासून वाळू वाहतूकदारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या आहेत.
सध्या आप्पासाहेब पवार अवैध धंदेवाईकांवर तुटून पडत आहे. भल्याभल्यांना पळता भुई थोडी करणाऱ्या या अधिकाऱ्यास कर्तव्याची जाण तसेच त्याला संवेदनशील मन असल्याचा अनुभव आज अव्हाणेवासीयांना आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
श्री. पवार गुरुवारी (ता. १७) दुपारी तीनला पोलिस कर्मचारी मनोज पाटील, भूषण सपकाळे, जितेंद्र सोनवणे, अशोक पाटील यांच्यासह गस्तीसाठी अव्हाणेकडे निघाले होते. अव्हाणे रस्त्यावर निर्माणाधीन इमारतीबाहेर एका मजुराने त्यांचे वाहन थांबवत आपला सहकारी सोपान चौधरी बांधकाम करत असताना त्याला विजेचा धक्का लागल्याने तो कोमात गेला होता.
घटना गंभीर होती. क्षणाचाही विलंब न करता आप्पासाहेब पवारांनी विजेचा धक्का लागलेल्या ठिकाणी जात पडलेल्या मजुराला खांद्यावर उचलत वाहनात टाकले आणि अव्हाणे ते जिल्हा रुग्णालय हे अंतर शासकीय वाहनाने अवघ्या साडेपाच मिनिटांत कापत तातडीने उपचाराची सोय करून दिली. डॉक्टरांनीही तत्परता दाखवत सोपानला मृत्यूच्या दाढेतून वाचवले.
आप्पासाहेब पवार यांनी सोपानला केवळ रुग्णालयात दाखलच केले नाही, तर कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्याचे पूर्ण उपचार होईपर्यंत त्याच्याच जवळच थांबून राहिले. अखेर चौधरी कुटुंबीय रुग्णालयात आल्यावर श्री. पवार यांनी त्यांची रजा घेतली. घडलेला प्रकार ऐकून धाय मोकलून रडणाऱ्या कुटुंबीयांनी हात जोडत पोलिसांच्या वर्दीला नमन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.