रावेर : जगातील एकूण केळी निर्यातीच्या तब्बल ६० टक्के केळी निर्यात करणाऱ्या जगप्रसिद्ध डोल कंपनीच्या आशिया विभागाचे प्रमुख ऑस्कर गार्सिया हे फेब्रुवारी - मार्च महिन्यात निर्यातदार केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या निमंत्रणावरून जिल्ह्यात येणार असून, जिल्ह्यातील केळी निर्यातवाढीच्या दृष्टीने त्यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील चौघा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फिलिपाइन्समध्ये डोल कंपनीच्यावतीने हे आश्वासन देण्यात आले.
जिल्ह्यातील अटवाडा (ता रावेर) येथील विशाल अग्रवाल, तांदलवाडी (ता. रावेर) येथील कृषिभूषण प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन व अभिजित महाजन या चौघा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फिलिपाईन्समधील दावाओ भागातील विविध प्रगत केळी भागांना मंगळवारी व बुधवारी भेटी दिल्या.
जळगावच्या जैन उद्योग समूहाचे केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांच्यामार्फत केळी निर्यातीत अग्रेसर, जगप्रसिद्ध डोल या कंपनीच्या विविध अधिकाऱ्यांशी या शेतकऱ्यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील केळीची निर्यात वाढविण्याबाबत चर्चा केली. या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील केळीबागा, त्यांची कापणी, पॅकेजिंग यांची माहिती दिली. जिल्ह्यातील केळीची गुणवत्ता पाहून तेथील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (Efforts of farmers to increase banana export Dol officials come to district visit to Philippines by four from Raver Jalgaon News)
डोल कंपनीच्या केळी बागेतील प्रतवारी आणि पॅकिंगची पाहणी ही शेतकऱ्यांनी केली. या बागेतून एकाच वेळी जपान, कोरिया, मलेशिया, इराण आणि चीन या देशांसाठी केळीची पॅकिंग केली जात होती. एकाच ठिकाणी ४ हजार हेक्टर्स (१० हजार एकर्स) केळीचा हा फार्म आगळावेगळाच असल्याचे मत शेतकऱ्यांनी फिलिपाईन्समधून ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
फिलिपाईन्स या देशात जळगाव जिल्ह्याइतकीच म्हणजे सुमारे ५० हजार हेक्टर्स केळीची लागवड होते. मात्र त्यांचे फ्रुटकेअर, ग्रेडिंग, पॅकिंग यामुळे तेथील ९० टक्के केळी निर्यात होते. याउलट जळगाव जिल्ह्यातील जेमतेम १ टक्का केळी निर्यात होते.
जगप्रसिद्ध डोल कंपनी जिल्ह्यात आल्यास ही निर्यात जिल्ह्यातील एकूण उत्पादनाच्या ५ ते १० टक्केपर्यंत होऊ शकेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या भेटीप्रसंगी डोल कंपनीचे फिलिपाईन्स येथील व्हाइस प्रेसिडेंट होगो उपस्थित होते. फेब्रुवारी ते जून महिन्यात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम केळीची कापणी होते. त्या काळात श्री. गार्सिया यांची ही भेट अपेक्षित आहे. त्यांनी अनुकूलता दाखविल्यास जिल्ह्यातील केळीला मोठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.