चोपडा: जळगाव जिल्ह्यातील १७ केंद्रांत ऑनलाइन नोंदणी केलेल्या पाच हजार ६१० शेतकऱ्यांपैकी एका महिन्यात एक हजार २९४ शेतकऱ्यांचा ५२ हजार ६८० क्विंटल मका खरेदी झाला असून, चार हजार ३१६ शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. महिनाभर मका खरेदी झाली असली तरी अजूनही ७६ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी बाकी असल्याने हजारो शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील मका खरेदी उद्दिष्ट चार लाख ४५ हजार क्विंटल पूर्ण झाल्याने शासनाने १८ डिसेंबरला ऑनलाइन मका खरेदी पोर्टल बंद पडले. त्यामुळे राज्यातील मका खरेदी बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ खरेदी केंद्रांतील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही त्यांचा मका खरेदी केला जात नसून खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.
या तालुक्यातील शेतकरी प्रतिक्षेत
जिल्ह्यातून सर्वाधिक प्रतीक्षेत असलेले शेतकरी भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव,
अमळनेर, चोपडा, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, यावल येथील असून, महिनाभर खरेदी होऊनही भुसावळ व पाचोरा या ठिकाणी नोंदणी करूनही एकाही शेतकऱ्याचा मक्याचे मोजमाप झाले नाही. संपूर्ण नोंदणी केलेले शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
केवळ तेराशे शेतकऱ्यांचा मका खरेदी
जिल्ह्यातील १७ शासकीय खरेदी केंद्रांत पाच हजार ६१० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यांपैकी १८ डिसेंबरअखेर फक्त एक हजार २९४ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला, तर चार हजार ३१६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही अजून, त्यांची मका मोजणी बाकी आहे. त्यांचा नंबर उशिरा आहे. त्यात त्यांची काय चूक आहे? शासनाने मका मोजणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. हजारो शेतकऱ्यांची शासकीय मका खरेदी कधीपर्यंत होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा मका मोजला गेला ते तुपाशी, तर बाकीचे शेतकरी उपाशी, असा प्रकार शासनाने केला आहे.
७६ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी बाकी
जिल्ह्यातील १७ खरेदी केंद्रांवर एकूण पाच हजार ६१० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यांपैकी फक्त एक हजार २९४ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला. चार हजार ३१६ नोंदणी केलेले शेतकरी अजून ताटकळत आहेत. म्हणजे एकूण नोंदणीपैकी २४ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी झाला, तर ७६ टक्के शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
जिल्ह्यातील नोंदणी व प्रतीक्षेत असलेले शेतकरी
१७ शासकीय खरेदी केंद्रनिहाय नोंदणी केलेले शेतकरी व कंसात मका मोजणी बाकी असलेली शेतकरीसंख्या
अमळनेर- ६९१ (५४२), चोपडा- ३९३ (३१९)
पारोळा- ३१४ (२२७), एरंडोल- ४१६ (१९०)
धरणगाव- ३८५ (२८७), जळगाव- ८३ (११)
म्हसावद- १५३ (९४), भुसावळ- १४३ (१४३)
यावल- ३२२ (२१६), रावेर- ३५४ (२३२)
मुक्ताईनगर- ३४८ (२९८), बोदवड- ६३९ (६१३)
जामनेर- ४०७ (३२०), शेंदुर्णी- ७८ (५४)
पाचोरा- २२४ (२२४), भडगाव-२९८ (२६४)
चाळीसगाव- २६२ (१८२) असे एकूण पाच हजार ६१० नोंदणीपैकी चार हजार ३१६ शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.