Jalgaon News : तापमानात वाढ झाल्यामुळे डोळ्यांचा त्रास वाढल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. अनेकांना डोळे लाल होणे, डोळ्यांना चुरचुर होणे, डोळे आग मारणे आदी विकार होत आहेत.
त्यामुळे नेत्ररुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढलेली दिसून येत आहे. यात मुख्यतः घराबाहेर पडणाऱ्या युवा मुले-मुलींची संख्या वयोवृद्ध रुग्णांपेक्षा जास्त आहे.
दर दहा रुग्णांमागे ३ ते ४ रुग्ण उष्णतेमुळे डोळ्यांच्या समस्या घेऊन येत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ सांगतात. (Four out of ten patients Eye disorders Eye pain due to rising temperature Jalgaon News)
डोळ्यांना इजा होण्याची कारणे
फोटोकेराटायटीसमुळे डोळ्यांना ईजा होतात. यामध्ये, उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते. हळूहळू उन्हाचा तडाखा वाढतो आणि डोळ्यांच्या तक्रारी सुरु होतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे.
डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. त्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञांना दाखविणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे झाडांची पानगळ, हवेत पसरणारे परागकण, तसेच हवेतील धुळ यामुळे डोळ्यांना ॲलर्जी होते. डोळ्यांना खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळतात.
४ ते १० वर्ष वयोगटातील मुलांना जास्त ॲलर्जी होते. त्यास ‘व्हर्नल कंजक्टीवायटीस’ असे म्हणतात. जळगाव शहरात धुळीचे प्रमाण जास्त असल्याने पायी चालणाऱ्यांमध्ये, तसेच दुचाकीस्वारांना जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय, टी. व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलचा जास्त वापर केल्याने डोळे कोरडे होतात. डोळ्यांची आग होते. डोळ्यांना टोचणे, खाज येणे, पाणी येणे असा त्रास सुरु होतो. अशा वेळी नेत्रतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असते.
अशी घ्या काळजी
कॉम्प्युटरचा वापर करताना दर २० मिनिटांनी, २० फुट स्क्रीनपासून दूर बघणे. २० वेळा पापण्यांची उघडझाप करणे. स्क्रीन डोळ्यांच्या उंचीच्या खाली ४ ते ५ इंच असावी, कॉम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर २२ ते २८ इंच ठेवावे. मॉनिटर स्क्रीनवर अँटीरिफ्लेक्टर स्क्रीन लावणे जास्त चांगले. पोहतांना पोहण्यासाठीचा गॉगल वापरावा.
उन्हापासून बचाव असा करा
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना टोपी किंवा रुमाल, स्कार्फ व सनग्लास वापरावा. पुरेसे पाणी प्यावे, परिपूर्ण आहार घ्यावा.
पाणीदार फळे खावी. डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवावा. व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यात, हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपईचा समावेश असावा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या सनग्लासेसचा उपयोग करा, अशी माहिती नेत्ररोग तज्ज्ञ डॉ .धर्मेंद्र पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.