जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून भाजपने ‘मिशन मोड’वर काम सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील तीन हजार ८०० कार्यकर्ते गावागावांत मुक्कामी जाणार आहेत. (Girish Mahajan statement about BJP Gaon Chalo Campaign 3800 activists of district will go to stay in villages jalgaon political)
त्याद्वारे मोदी सरकारच्या दहा वर्षांतील योजनांचा लेखाजोखा मांडण्यासाठी ‘गाव चलो अभियान’ पक्षातर्फे राबविण्यात येत असून, त्यात मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते असे सर्वच सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामीण विकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (ता. ४) भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सरकारच्या लोकाभिमुख योजना नागरिकांपर्यंत
मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत लोककल्याणाच्या ज्या योजना राबविल्या आहेत त्याचा लेखाजोखा प्रत्येक शहर, प्रत्येक गावात, प्रत्येक बूथपर्यंत मांडण्याचा ‘गाव चलो अभियाना’चा उद्देश आहे.
तळागाळातील जनतेपर्यंत या योजनांचा कसा लाभ झाला, त्यांना थेट लाभ मिळाला की नाही, त्यांच्या अपेक्षा व समस्या काय, हेदेखील या अभियानाद्वारे जाणून घेण्यात येणार आहे.
तीन हजार ८०० कार्यकर्ते सहभागी
जळगाव जिल्ह्यामध्येजवळपास तीन हजार ८०० बूथ आहेत. या प्रत्येक बूथपर्यंत पोचण्यासाठी पक्षाने तीन हजार ८०० कार्यकर्ते सज्ज ठेवले आहेत.
त्यात स्वत: मीदेखील असल्याचे सांगून महाजन म्हणाले, की आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पालिक, मनपातील नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच असे लोकप्रतिनिधी, तसेच पक्षातील पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.
तीन हजार ८०० कार्यकर्ते ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान त्यांना नेमून दिलेल्या गावात, बूथपर्यंत पोचतील व त्याठिकाणी २४ तास मुक्काम करतील. त्यातून गावकऱ्यांशी, जनतेशी संवाद साधून मोदी सरकारच्या योजनांचा लेखाजोखा मांडतील.
शहरी भागात वॉर्डनिहाय
शहरी भागात प्रत्येक वॉर्डात आमचे कार्यकर्ते पोचतील. याअंतर्गत राज्यातील ५० हजार युनिट्समध्ये ५० हजार प्रवासी नेते प्रत्येक मतदारापर्यंत पोचणार आहेत.
प्रत्येक युनिटमध्ये भाजपचा एक प्रवासी नेता, एक दिवस मुक्काम करून, बूथप्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, मतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कार्ये करेल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, पश्चिम जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, माजी महापौर भारती सोनवणे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.