Rain Wild Vegetable : पाऊस पडला, की मांसाहारी खवय्ये घोरपड, ससे, लाहुरी, तितर, सायाळ यांसारख्या वन्यजीवांच्या शोधात निघतात. पावसाळ्यात या जिवांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते.
कारण या पक्षी-प्राण्यांचे मांस आरोग्यासाठी लाभदायक असते, असा गैरसमज समाजात रुजला आहे. मात्र, पावसाळ्यात मांसाहाराव्यतिरिक्त कितीतरी पटीने अधिक आरोग्यदायी खजाना निसर्गाने आपल्यासाठी दिला आहे.
याकडे मात्र आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. हा खजिना म्हणजे रानभाज्या. रानभाज्या आरोग्यवर्धक असल्या, तरी त्या प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये. त्याबद्दल पुरेशी माहिती घेऊनच त्या खाव्यात, असे जाणकार सांगतात. (healthy wild vegetables of rainy season enter in market jalgaon news)
रानभाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. दरही १५ ते २० रुपये पावशेर आहेत. १४ पेक्षा जास्त वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.
काही रानभाज्या अशा
हादगा : हादगाच्या फुलांचे भजे आणि भाजी करतात. या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरले जाते. अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे दिसल्यास हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात, त्यानंतर घाम येतो व कफ पडायला मदत होते.
दोडीची फुले ः ही वेलवर्गीय रानभाजी आहे. दोडी किंवा जिवती या वनस्पतीचे आयुर्वेदिक महत्त्व आहे. ही वनस्पती ज्या महिलांना श्वेतप्रदराचा त्रास आहे, त्यांनी ही भाजी १५ ते २० दिवस सेवन केल्यास आराम मिळतो.
कटुर्ली ः या भाजीला ‘रानकारली’ असेही म्हणतात. खडकाळ परिसरात ही रानभाजी आढळते. कार्टुलीच्या वेलीची पाने, फुले व फळेही कारल्यासारखीच असतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
फळे कारल्यापेक्षा छोट्या आकाराची असतात. कटुर्ली कारल्यासारखी कडवट नसते. याची भाजी छान रुचकर लागते. ही भाजी मूत्रविकारांवर गुणकारी आहे.
कुलूची भाजी ः पावसाळ्यात पहिली सर बरसल्यापासून कुलूची भाजी जंगलात दिसू लागते. कुलूची भाजी काही दिवसांतच तयार होते. या भाजीला फोडशी/कुलू किंवा काल्ला या नावाने ओळखले जाते. कुलूची भाजी एक प्रकारचे गवतच असते.
कुरडूची भाजी ः कुरडूची कोवळी पाने शिजवून ही भाजी केली जाते. वृद्ध माणसांचा कफविकार, जुना खोकला यासाठी ही भाजी गुणकारी आहे. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवीला साफ करायला मदत करते. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. कुरडूच्या बिया मूतखडा आजारासाठी उपयुक्त ठरतात.
अळू ः अळूच्या कांद्यापासून ही भाजी उगवते. पानांमुळे हाताला खाज सुटते, त्यामुळे हाताला थोडे तेल लावून आळूची पाने हाताळावी. अळूच्या पानांपासून अळूची पातळ भाजी (अळूचं फतफतं) तसेच अळूच्या पानांची वडीही करतात.
भुईआवळी ः ही भाजी आंबट असून, आधुनिक शास्त्रानुसार या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्रावामध्ये बिघाड झाल्यास हिपॅटायटिस- ब, काविळीमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे दिसून आले आहे. रक्तदाबवृद्धी, चक्कर येणे या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.
टाकळा तरोटा ः या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया टोरा’ आहे. हिच्या कोवळ्या पानाची भाजी करतात. ती पौष्टिक व वातनाशक असते. प्रसूतीनंतर तरोट्याची भाजी करून ती स्त्रियांना खायला देतात.
अंबाडी ः ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या फुलांची, पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यापासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.
तांदुळजा ः ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शरीरात सी जीवनसत्त्व मिळावे, यासाठी तांदुळजाची भाजी खावी. मधुररसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य अशी ही भाजी आहे. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर, कांजण्यात ही फार उपयुक्त आहे. विषविकारी, नेत्रविकारी, पित्तविकारी, मूळव्याध, यकृत, पाथारी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करण्यासाठी तांदुळजाची भाजी फार उपयुक्त आहे.
मायाळू ः ही एक वेलवर्गीय रानभाजी आहे. या भाजीच्या पानांचे भजे केले जातात. ही भाजी मूळव्याधीवरही उपयोगी आहे. मायाळू पित्तशामक असून, त्वचारोग, आमांश, व्रण यावर उपयोगी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.