Jalgaon Accident : शिवलिंग व मूर्ती आणण्यासाठी मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर तसेच उज्जैनला जाण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रूझरला डंपरने जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार भाविक जखमी झाले. बांभोरी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर भल्या पहाटे झालेला अपघात इतका गंभीर होता की, त्यात क्रूझरसारख्या मजबूत कारचा अक्षरश: चुराडा झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. (Jalgaon 3 killed 4 injured in truck cruiser accident)
मूर्ती घेण्यासाठी निघाले
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथांच्या वाढलेल्या प्रस्थानंतर विविध भागात महादेव मंदिरं उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील खोटे नगर परिसरातील साईनगर भागात महादेवाचे मंदिरात पशुपतीनाथची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार होती त्यासाठी या भागातील काही जण मूर्ती घेण्यासाठी ७ भाविक उज्जैनसह ओंकारेश्वरला (मध्यप्रदेश) जात असतांना आज शुक्रवारी (ता.१५) पहाटे साडे चारच्या सुमारास क्रूझरने (क्र. एमएच १९ सीव्ही ४०५२) खोटेनगरहून निघाले.
असा घडला अपघात
काही अंतर कापल्यानंतर बांभोरी गावाजवळ डंपर (एम एच १९ जे ९५२४) च्या रुपात काळाने भाविकांवर घाला घातला. डंपरने क्रूझरला जोरदार धडक दिल्याने क्रझूरचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात तुषार जाधव (वय २५ वर्षे, खोटेनगर, मूळ गाव धोबी वराड), विजय हिंमतराव चौधरी (वय ४२,रा. साईनगर), भूषण सुभाष खंबायत (वय ४५ रा.साईनगर) यांचा मृत्यू झाला. तर किशोर धुडकु पाटील (६२).
स्वप्नील आनंदा पवार(४५), अनिल देविदास ठाकरे हे सर्व रा.साईनगर निमखेडी शिवार तर दिलीप काशिनाथ साळुंखे (३७) रा. खोटे नगर हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. क्रुझरचा चेंदा मेंदा झाल्याने क्रेन मागवून क्रूझर बाजूला करीत त्यात अडकून पडलेल्या जखमींना रुग्णालयात हलविले.
पोलिस अधिकारी दाखल
अपघातानंतर चोपडा भागाचे उप विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले, पाळधीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ, विठ्ठल पाटील, जितेश नाईक, बाविस्कर, विजय चौधरी, गजानन महाजन आदींनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कर्तेच गेल्याने कुटुंबीय उघड्यावर
मृत भूषण खंबायत याचे साईनगर येथे समृद्धी प्रोव्हिजन आहे. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. विजय चौधरी हे (शेरी ता. धरणगाव) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या मागे आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
तर तुषार जाधव हा चालक असून मागच्या वर्षी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान मृताच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने रुग्णालयात शोककळा पसरली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.