रावेर : उन्हाळा सुरू झाला की महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. रावेर तालुका मात्र याला अपवाद आहे. या तालुक्यासह जिल्ह्याचे नेते (कै.) मधुकरराव चौधरींच्या दूरदृष्टीमुळे तालुक्याच्या उत्तर आणि दक्षिणेला उभारण्यात आलेल्या मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमुळे तालुक्यात पाणीटंचाई किंवा टँकरने पाणीपुरवठा कधी अनुभवलाच नाही. (Jalgaon 4 villages in Raver taluka under water scarcity)
रावेर हा टँकर मुक्त तालुका आहे. तापी नदीवरील हतनूर या मध्यम प्रकल्पाबरोबरच ६ मध्यम व लघु प्रकल्प, १७ पाझर तलाव व सुकी व भोकर नदी पात्रातून होणारे परक्युलेशन यामुळे मे ते जूनमध्ये तालुक्यातील विहिरी अथवा कूपनलिकांची पाणीपातळी क्वचितच कमी होते. तिथे विहीर अधिग्रहण किंवा नवीन विंधन विहीर करून पाणी प्रश्न सोडवला जातो. यावर्षीही चारच गावे पाणी टंचाई आराखड्यात आहेत.
हतनूर, सुकी, अभोडा प्रकल्पात सद्य स्थितीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा आहे. यामुळे रावेर तालुका पाण्याच्या बाबतीत सुजलाम, सुफलाम व समृद्ध आहे. रावेर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवलेली नाही. रावेर तालुक्याला सातपुडा पर्वतामुळे एक संजीवनी मिळाली आहे.
या पर्वत रांगांच्या दक्षिणेकडील भागांत बंधारा बांधून मोठा जलसाठा अडविण्यासाठी योग्य नैसर्गिक स्थिती निर्माण झालेली आहे. तिचा कल्पकतेने उपयोग करून घेऊन तत्कालीन मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष (कै.) मधुकरराव चौधरी यांनी दुरदृष्टीतून सुकी, अभोरा, मंगरूळ, गंगापुरी हे जलसिंचन प्रकल्प व दीड डझनांपेक्षा जास्त पाझर तलाव पूर्ण झाले. (latest marathi news)
नंतरच्या काळात तत्कालीन आमदार राजाराम महाजन, आमदार अरुण पाटील यांच्या कार्यकाळात मात्राण, चिंचाटी हे लघु सिंचन प्रकल्प पूर्ण झाले. रावेर तालुक्याच्या दक्षिणेला हतनूर, तर उत्तरेला सातपुडा पर्वत भागात सुकी, अभोरा, मंगरूळ, गंगापुरी, मात्राण, चिंचाटी असे सहा मध्यम व लघु प्रकल्प आहेत. सातपुड्याच्या याच भागात सतरा पाझर तलाव आहेत.
चार गावे संभाव्य टंचाई आराखड्यात
रावेर तालुक्यात या वर्षी सरासरी टक्केवारी ओलांडली आहे. तालुक्यात १०६ टक्के पाऊस पडला होता. दीड महिन्याहून अधिक काळात नदी, नाले वाहात होते. यामुळे मार्च व एप्रिलअखेरपर्यंत तालुक्यातील एकाही गावाचा टंचाई प्रस्ताव प्रशासनाकडे आला नाही.
मात्र मे महिन्यात भोकरी, लालमाती, जिन्सी व मोरव्हाल या चार गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरी, कुपनलिकेची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तालुक्यातील चार गावांचा संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात समावेश केला आहे. मात्र, या चारही गावांत तीव्र पाणीटंचाई नाही, हे नमूद केले पाहिजे. गरज भासल्यास विहीर अधिग्रहण किंवा विंधन विहिरीचा प्रस्ताव देण्यात येतो.
धरणातील साठ्याची सद्य:स्थिती
हतनूर धरणात सध्या ७७ टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून रावेर व सावदा, भुसावळ, जळगाव, वरणगाव आदी शहरांना पाणीपुरवठा होतो. गावांना पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी या धरणातील पाणी आरक्षित आहे. जून अखेरपर्यंत पाऊस न आल्यास देखील येथून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकेल, असे नियोजन आहे.
सुकी धरण ७५.३९ टक्के, अभोरा ७७.९१ टक्के असा मुबलक पाणीसाठा तालुक्यात आहे. तालुक्यात १७ पाझर तलाव आहेत. यापैकी कुसुंबा ५० टक्के तर मोरव्हाल पाझर तलावात ६० टक्के पाणीसाठा आहे.
अन्य १२ पाझर तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना धरणे, पाझर तलाव यातील गाळ काढण्यास अनुमती दिल्यास या पाझर तलावांत आधिक पाणीसाठा होऊन तालुक्यात भविष्यात देखील पाणीटंचाई भासणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.