Jalgaon News : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी अलीकडे लोकसभा व विधानसभा क्षेत्राचे निवडणूकप्रमुख नेमले. अगदी शिंदे सेनेच्या ताब्यातील जागांवरही भाजपचे प्रमुख नेमले गेले अन् त्यातून शिंदे सेनेतील अस्वस्थतेबद्दल चर्चा सुरू झाली.
मुळात, भाजपच्या अशाप्रकारच्या नियुक्त्यांवर कुणी पुढची गणित मांडत असेल, तर ते मूर्खपणाचे ठरेल. कारण, लोकसभा अथवा विधानसभा निवडणुका पंचवार्षिक असल्या, तरी भाजपसारखा ‘केडर बेस्ड्’ पक्ष पाचही वर्षे ‘इलेक्शन मोड’वर असतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. ( Jalgaon BJP Election detail article jalgaon news)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. एप्रिल महिन्यात ते जळगावलाही येऊन गेले. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह श्री. बावनकुळे व त्यांचे शिलेदार सध्या मोदी सरकारच्या ९ वर्षांचा लेखाजोखा मांडताहेत.
आगामी २०२४ हे वर्ष निवडणूक हंगामाचे वर्ष आहे. या वर्षात देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीसह पाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही संग्राम आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनीही वातावरण निर्मिती सुरू केलीय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालातून उभारी मिळालेला कॉंग्रेस व देशातील वातावरण बदलत आहे, अशी आशा निर्माण झालेला भाजपविरोधी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने पुढची गणितं मांडत आहे.
अशात, भाजपनेही पुढल्या वर्षीच्या या दोन्ही निवडणुकांच्या दृष्टीने ‘मिशन मोड’वर काम करायला सुरवात केलीय. श्री. बावनकुळे यांनी प्रदेशाची कार्यकारिणी नव्याने गठित केली. नंतरच्या टप्प्यात त्यांनी राज्यातील सर्व ४८ लोकसभा क्षेत्रासह २८८ विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख नियुक्त केले.
आता राज्यातील सत्तेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना वाटेकरी असताना, भाजपने त्यांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांवरही निवडणूक प्रमुख नेमल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
ठाकरे सेनेच्या नेत्यांनीही या नियुक्त्यांवरून शिंदे सेनेला टोमणे मारत कोंडीत पकडल्याचे दिसून येतेय. शिंदे सेनेतील काही अस्वस्थ नेतेही हीच भाषा बोलू लागले आहेत आणि स्वत:ला तज्ज्ञ समजणारे विश्लेषकही या नियुक्त्यांवरून पुढची गणितं मांडतांना दिसतांय.
मुळात, भाजप हा एक ‘केडरबेस्ड्’ पक्ष असल्याचे सर्वश्रुत आहे. निवडणुका आल्या, की कामाला लागायचे, असे या पक्षाचे धोरण कधीच राहिलेले नाही. निवडणूक पंचवार्षिक असली, तरी हा पक्ष पाचही वर्षे ‘इलेक्शन मोड’वर असतो, हा नेहमीचा अनुभव आहे.
त्यामुळे लोकसभा व विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक प्रमुख नेमले म्हणजे शिंदे सेनेच्या जागांवर भाजप उमेदवार देणार, असे सरसकट गणित मांडणं मूर्खपणाचं ठरेल. ज्यांना भाजपच्या एकूणच ध्येयधोरणं आणि संघटनात्मक रचनेची माहिती आहे, तो राजकीय विश्लेषक असे गणित कधीही मांडणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राजकारणात प्रत्येक पक्षाला त्याचे विचार, पक्ष विस्ताराचा अधिकार आहे. प्रत्येक पक्ष त्यादृष्टीने प्रयत्नशील असतो. युती-आघाडी हा त्या-त्या वेळच्या सत्ता समीकरणांचा खेळ असतो. त्यामुळे ज्या जागा आपल्या मित्र पक्षाच्या ताब्यात आहेत, तिथे काही ॲक्टिव्हीटीच करायच्या नाहीत, असे होत नाही.
भाजपसारखा पक्ष तर असे कधीही करणार नाही. त्यामुळेच भाजपने त्या जागेवर उमेदवार द्यायचा की नाही, यापेक्षा आपत्कालीन स्थितीत त्या मतदारसंघाची मोट बांधून तयार हवी, असे नियोजन करीत असतो.
त्यातूनच या नियुक्त्या झाल्या आहेत. अर्थात, विस्ताराच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने मतदारसंघाचे ‘स्कॅनिंग’ करण्याच्या दृष्टीने असे जबाबदार पदाधिकारी नेमणे आवश्यक आहे. भाजपने त्यात पुढचे पाऊल टाकलेय, पुढे अजून काय काय होते, ते बघूया..!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.