Jalgaon News : पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी प्रकरणातील संशयित बापाला भेटू दिले नाही म्हणून आठवीत शिकणाऱ्या सोम रहिम पवार (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास हलखेडा येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक व्याघ्र दिवसाच्या दिवशी २९ जुलैला पट्टेदार वाघाची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. (boy took extreme step by saying not allowed to meet father )
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नशिराबाद टोलनाक्याजवळ वाघाची कातडी घेऊन तस्करी करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे प्रकरण वनविभागाकडे सोपविण्यात आले. संशयित सहापैकी चार जण हे हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील आहेत. या बाबत तपास कामासाठी शुक्रवारी (ता. २) सकाळी वन विभागाचा ताफा संशयित म्हणून ताब्यात असलेल्या रहिम पवारला हलखेडा येथे घेऊन आला असता संपूर्ण गाव जमा झाले होते. तपास कार्य करून ताफा निघून आला.
मात्र त्यानंतर मोठी घटना घडली. रहिम पवार यांचा लहान मुलगा इयत्ता आठवीत शिकणारा सोम रहिम पवार याने घराच्या समोर असलेल्या कोंबड्यांच्या शेडजवळ जाऊन गळफास लावून आत्महत्या केली आणि चिठ्ठी (सुसाईट नोट) वर लिहिले की, माझ्या बाबाला पोलिसांनी भेटू नये दिले म्हणून मी आत्महत्या केली, असे लिहून खाली तारीख टाकून त्याचे नाव लिहिले. त्याचे आई-वडील वन विभागाच्या ताब्यात आहेत.
वन विभागाला खाकी वर्दी असल्याने चिठ्ठीमध्ये लिहिताना वन विभागाच्या ऐवजी त्याने पोलिस लिहिले, असे बोलले जात आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कुऱ्हा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या मुश्किलीने दुपारी तीनला त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जाऊ दिला. पोलिस निरीक्षक मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि जमावाला शांत केले.
मृत मुलाची आत्या नरेशना गांजी भोसले (रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांनी खबर दिली, की मृत सोम रहिम पवार यास त्याचे वडील रहिम रफिक पवार यांना भेटू दिले नाही, याचा राग आल्याच्या कारणावरून त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे तपास करीत आहेत.
''झालेली घटना वेदनादायी व दुर्दैवी आहे. स्थळदर्शक पंचनामा तसेच वाघ शिकार प्रकरणी आज सकाळी मुख्य संशयित रहीम (रा. हलखेडा) याने चौकशीत दिलेल्या जबाबानुसार शिकार प्रकरणातील इतर संबंधित साहित्य, स्थळदर्शक पंचनामा करण्यासाठी सहाय्यक वन संरक्षक तथा चौकशी अधिकारी उ. म. बिराजदार यांचे सोबत जळगाव, मुक्ताईनगर, वडोदा रेंज स्टाफने हलखेडा येथे इन कॅमेरा तपासणी केली आहे. संशयिताच्या कुटुंबीयांसोबत कोणत्याही स्टाफने गैरप्रकार केलेला नाही.''- परिमल साळुंके, वनक्षेत्रपाल वढोदा, ता. मुक्ताईनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.