Vehicles parked on the road in front of Axis Bank near Govinda Rickshaw Stop. esakal
जळगाव

Jalgaon Parking Problem: शहरातील रस्ते...नव्हे, वाहनतळच! प्रमुख मार्गांवर बेशिस्त पार्किंगचा भार; महापालिका प्रशासनाची चिरनिद्रा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Parking Problem : शहरातील वाहतुकीच्या कोंडीला वाहनधारकांची बेशिस्त जशी कारणीभूत आहे, तशी महापालिकेच्या व अन्य खासगी व्यापारी संकुलांमधील वाहनतळांचा अभाव हेदेखील प्रमुख कारण आहे. संकुलांनी नकाशात वाहनतळ तर दाखवलेय, मात्र प्रत्यक्षात जागेवर वाहनतळच उभारलेले नाहीत. परिणामी, या संकुलांमध्ये येणाऱ्या शेकडो ग्राहकांच्या वाहनांना रस्त्यांवर लावण्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे ही सर्व वाहने सर्रास रस्त्यांवर उभी राहून रस्ते अडविल्याचे चित्र निर्माण होते. केवळ शहरातील नव्हे तर शहरालगतच्या उपनगरांमधून व छोट्या गावांमधूनही अनेक ग्राहक दररोज शहरात येतात आणि या संकुलांमध्ये, बाजारपेठेत खरेदीसाठी येताना रस्त्यांवर वाहने लावून वाहतुकीच्या कोंडीत भर घालतात. (Jalgaon City Loads of unruly parking)

वाहनांमुळे वाहतुकीची झालेली कोंडी.

दिवसेंदिवस ही समस्या अधिक गंभीर होत असताना महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रस्त्यांवरील हॉकर्सच्या अतिक्रमणांवर तात्पुरती कारवाई होते, हप्तेखोरीनंतर कारवाईची मोहीम थांबते.. ज्या व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळाच्या जागी दुकाने, गाळे, गुदामे काढली आहे त्या संकुलांच्या मालकांना, गाळेधारकांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्याचा ‘फार्स’ दाखवला जातो.

प्रत्यक्षात कारवाई होत नाही. अशी स्थिती आहे. परिणामी, शहरातील प्रमुख रस्ते भलेही वीस- तीस मीटरचे असोत, या वाहनांसह अतिक्रमणांमुळे ते दहा मीटरपर्यंत अरुंद झाले असून, प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागतेय.

व्यापारी संकुलांचे शहर

व्यापारी संकुलांचे शहर म्हणून जळगाव शहराची ओळख आहे. महापालिकेच्या मालकीचीच शहरात किमान २५ ते ३० संकुले आहेत. पैकी फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी व्यापारी संकुल, बी. जे. मार्केट, न्यू. बी.जे. मार्केट, आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट आदी मोठ्या संकुलांसह मध्यम व लहान संकुलांची संख्या बऱ्यापैकी आहे.

यापैकी फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट ही तीन मोठी संकुले एकाच भागात, एकाच प्रमुख रस्त्यावर (महात्मा गांधी मार्ग) आहे. शिवाय, गोलाणी संकुलाला लागूनच महापालिकेची सतरा मजली प्रशासकीय इमारत याच मार्गावर आहे. ही तीन संकुले, हा मार्ग आणि मनपाची इमारत असलेला नवीपेठेचा परिसर शहरातील प्रमुख बाजारपेठेचा मध्यवर्ती भाग.

त्यामुळे नेहरू चौकापासून महापालिका इमारतीसमोरून मार्गक्रमण करीत थेट फुले मार्केट, गांधी मार्केटद्वारे भिलपुरा चौकीपर्यंतचा मार्ग, त्याला मिळणारे उपरस्ते हे वाहनांची प्रचंड वर्दळ असलेले रस्ते आहेत. गोलाणी संकुलास लागून कोर्ट चौक ते चित्रा चौकाचा मार्गही अशा प्रकारच्या मोठ्या वर्दळीचा मार्ग असून, या प्रमुख दोन मार्गांवर व त्यांना मिळणाऱ्या उपरस्त्यांवर दुतर्फा हॉकर्सचा ‘डेरा’ आहे. अन्य खासगी व्यापारी संकुलांची संख्या तर खूपच आहे.

संकुलांमध्ये वाहनतळच नाही

कोणतीही मोठी इमारत, व्यापारी संकुल उभारताना त्याठिकाणी येणाऱ्या नागरिक, ग्राहकांची वाहने लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणे गरजेचे व अनिवार्यही आहे. मनपाच्या व्यापारी संकुलांमध्ये ही व्यवस्था असली तरी ती मर्यादित स्वरुपाची असल्याने महापालिकेच्या संकुलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहनेही सर्रास रस्त्यावर असतात.

खासगी व्यापारी संकुलांवर महापालिकेचीच, तेथील अधिकारी- अभियंत्यांची कृपादृष्टी असल्याने या संकुलांनी वाहनतळांची व्यवस्थाच केली नाही. ‘रस्ते आपल्याच बापाचे’ असल्याने आपल्या संकुलांत येणारी वाहने थेट रस्त्यावरच उभी राहतील, अशी व्यवस्था या संकुलांचे मालक, दुकानदारांनी करुन ठेवली आहे. महापालिकेकडे सादर नकाशात व्यापारी संकुल, मॉलला वाहनतळ दाखवायचे, प्रत्यक्ष जागेवर मात्र वाहनतळाच्या जागी दुकाने, गाळे, गुदामांची व्यवस्था दिसून येते. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत.

वाहनतळ नसल्याने वाहने रस्त्यावर

व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळच नसल्याने ग्राहकांची वाहने सर्रास रस्त्यावर लागलेली दिसतात. फुले मार्केट, गोलाणी संकुल, गांधी मार्केटसारख्या प्रमुख व मोठ्या संकुलांच्या समोर, आजुबाजूला अन्य खासगी संकुले खूप आहेत. त्या संकुलांमध्ये येणाऱ्या वाहनांचीही पार्किंग रस्त्यावरच. त्यामुळे रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा पार्क केलेल्या वाहनांची संख्या खूप जास्त आढळून येते. (latest marathi news)

कोर्ट चौकाजवळील रस्त्यावर पार्क केलेली वाहने व लागलेल्या रिक्षा.

हॉकर्सच्या अतिक्रमणाचा भार

केवळ वाहनांच्या बेशिस्त पार्किंगने रस्ते गिळलेले नाहीत, तर ५० टक्के रस्ते गिळले आहेत ते बेकायदा गाड्या लावणाऱ्या हॉकर्सने. हॉकर्सच्या मनमानीमुळे रस्त्यांवर दुतर्फा फळ, भाजीपाला, अन्य चीजवस्तूंच्या गाड्या लागत असल्याने रस्त्यांवरून वाहन चालविणे तर दूरच काही ठिकाणी पायी चालणेही कठीण झाले आहे.

ना दंड.. ना वाहन जप्ती

महापालिका असो की, पोलिसांची वाहतूक शाखा; कोणत्याही यंत्रणेकडून वाहनधारकांना शिस्त लावण्याची कार्यवाही होत नाही. बेशिस्त वाहनधारक, मुजोर रिक्षाचालकांना पोलिसांचे अभय असल्याचे चित्र आहे. वाहनतळ नसलेल्या ठिकाणी रस्त्यांवर वाहने पार्क केलेली असताना अशा वाहनांवर वर्षभरातून एखादवेळी ठराविक काळांसाठी कारवाईची मोहीम राबविली जाते. आठ- दहा दिवस कारवाई चालते, नागरिकांमधून बोंब झाली की, कारवाई थंडावते..

हे आहेत ‘रेड झोन’

- चित्रा चौक ते कोर्ट चौक ते थेट गणेश कॉलनी

- नेहरु चौक ते टॉवर चौकपासून भिलपुरा चौकीपर्यंत

- ‘गोलाणी’लगत दक्षिणमुखी मारोती मंदिर ते मनपा इमारत

- नवीपेठेतील बँक स्ट्रीट ते जयप्रकाश नारायण चौक

- चित्रा चौक ते टॉवर चौकापासून उड्डाणपूल

- गोविंदा रिक्षास्टॉपलगतचा चौक

- पांडे डेअरी चौक ते पंचमुखी हनुमानपर्यंतचा रस्ता

- काव्यरत्नावली चौक ते महाबळ स्टॉपपर्यंतचा रस्ता

या प्रमुख मार्ग व भागांचे क्षेत्र वाहतूक कोंडीच्या दृष्टीने ‘रेड झोन’ बनले आहे. या मार्गांवरून जाताना सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत गुगल मॅपवर मार्ग सर्च करताना वाहतूक कोंडीचे ‘रेड’ झोन दर्शविलेले हमखास दिसेल.

ही आहेत प्रमुख कारणे

- शहरातील प्रमुख मार्गांवर दुतर्फा हॉकर्सचे अतिक्रमण

- शहरातील प्रमुख मार्गांवरील बेशिस्त वाहतूक

- व्यापारी संकुलांना वाहनतळाची सुविधा नाही

- वाहनतळ नसल्याने वाहनांचे थेट रस्त्यावरच पार्किंग

- महापालिकेचा निद्रिस्त अतिक्रमण निर्मूलन विभाग

- वाहनतळ नसलेल्या व्यापारी संकुलांवर कारवाई नाही

- पोलिस दलाची शहर वाहतूक शाखाही निष्क्रिय

हे असू शकतात उपाय

- सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करणे

- व्यापारी संकुलांना वाहनतळ अनिवार्य करणे

- ज्यांनी वाहनतळ उभारले नाही त्यांच्यावर कारवाई

- वाहनतळ नाही त्या ठिकाणी शिस्तीत पार्किंगची सोय

- ‘पे ॲण्ड पार्क’ची कठोर अंमलबजावणी

- प्रमुख मार्गांवर वाहनांसाठी पिवळे पट्टे मारणे

- प्रमुख रस्त्यांवर सम- विषम दिवसांना पार्किंग

- वाहतूक नियमनासाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलिस नियुक्ती

- ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करून कठोर अंमलबजावणी

- फेरीवाला धोरणाची कठोर अंमलबजावणी करणे

(latest marathi news)

महापालिकेचा अजब कारभार; शहराच्या वाहतुकीचा बोजवारा

संपूर्ण शहरातील मुख्य रस्ते अस्थायी अतिक्रमण, बेशिस्त हॉकर्स आणि अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अरुंद होऊन वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील रस्तेच अरुंद झाल्याने पोलिस कारवाईला बहुतांश ठिकाणी मर्यादा येतात. अशा परिस्थितीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे रस्ते मोकळे करणे अपेक्षित असताना महापालिका आयुक्त, प्रशासन आणि त्यांचे अतिक्रमण विभाग फक्त फुले मार्केटच्या अतिक्रमणामागे लागून वाहतुकीच्या अडथळ्याचे कारण पुढे करून पोलिस बंदोबस्त मागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

जळगाव शहरातील प्रमुख आणि दुय्यम वापराचे संपूर्ण रस्ते हे अवरोध मुक्त ठेवण्याची मुख्य जबाबदारी जळगाव महापालिका प्रशासनाची आहे. तर, वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक विभागाने केले पाहिजे. असे, असताना शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारीला जागाच नसल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागते. परिणामी, बेशिस्त वाहतूक आणि किरकोळ अपघांताची संख्या वाढली आहे.

फुले मार्केटचे 'पोटशूळ'

जळगाव शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट, गांधी मार्केटचा परिसर हा वर्षानुवर्षे हॉकर्सच्या विळख्यात सापडला आहे. फुले मार्केटची पार्कींग देखील हॉकर्सला विकून टाकेलेली असून, ठराविक सहा महिने, वर्षभर उलटले की, फुले मार्केटच्या हॉकर्सचा विषय अजेंड्यावर घेतला जातो. गेल्या २४ वर्षांत कधीच हा मुद्दा महापालिकेने तडीस नेला नाही.

कारण, या भागातून महापालिका अतिक्रमण विभागाचे हप्ते आणि संबंधित नगरसेवकांचे राजकारण चालवले जाते. येथील हॉकर्सची चार- दोन दिवस उचलबांगडी होते, हॉकर्स कुठल्यातरी राजकीय नेत्याच्या शरणी जातात. मग, त्यांच्यातला पुढारी वसुली करतो.. आणि परिस्थिती ‘जैसे थे’ होते. कारवाईचा हा क्रम वर्षानुवर्षे सुरुच आहे. यंदाही जळगाव महापालिकेने फुले मार्केटचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. अर्थात त्याच तिकीटावर तोच खेळ! होणार हे निश्‍चित.

उर्वरित शहराचे काय?

साडेपाच- सहा लाख लोकसंखेच्या जळगाव शहरात, नो-हॉकर्स झोन असलेल्या रेल्वेस्थानकापासून ते थेट महाबळ कॉलनी, संतगाडगे महाराज चौक, आसोदा रेल्वे गेटपासून ते नेहरु चौक, चित्रा चौकापासून ते बजरंग बोगदा, गोविंदा रिक्षा स्टॉपपासून ते रेल्वे उड्डाणपूल, रिंगरोड यांसह शहरातील मोठ्या रहिवासी वस्त्यांमध्ये मुख्य रस्त्यांवर वाहन चालविण्यासाठी जागा शिल्लक नसताना तेथे महापालिका कारवाईसाठी कधी पुढाकार घेताना दिसत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pablo Picasso: कचऱ्यात सापडलेल्या जुन्या पेंटिंगने बनवलं 55 कोटी रुपयांचा मालक; जगप्रसिद्ध चित्रकाराच्या चित्राचा 62 वर्षांनी लागला शोध

Abdul Sattar vs BJP: "तर शिवसैनिक भाजपचा हिशोब करतील"; महायुतीत कलह, शिंदेंच्या मंत्र्याचे खळबळ उडवणारे विधान

Sambhaji Bhide: "गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, हिंदू समाजाला XXX...";  संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

Ankita Walawalkar Evicted: अंकिता वालावलकरचा 'बिग बॉस मराठी ५' मधला प्रवास संपला? चाहत्यांना मोठा धक्का

Zoho CEO: ...अन्यथा कंपन्या टिकणार नाहीत; टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल काय म्हणाले जोहोचे सीईओ?

SCROLL FOR NEXT