Jalgaon Crime News : शहरातील सराफ बाजारातील भवानीमाता मंदिरासमोरच महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स सराफा शोरूम सोमवारी (ता. २०) मध्यरात्री तीनच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी फोडले. डोक्यावर मंकी कॅप, जॅकेट, तोंडाला रूमाल बांधून दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांना चाकू-पिस्तूल लावून सौरभ ज्वेलर्सचे एका मागून एक दहा कुलूपे तोडत आत प्रवेश करून सुमारे ३०० ग्रॅम सोने, ७ ते ८ किलो चांदी, साडेतीन लाखांची रोकड, असा ऐवज अवघ्या २९ मिनिटांत लुटून नेला. (Jalgaon Crime Armed robbery in bullion market)
विशेष म्हणजे सायरन वाजला, म्हणून दरोडेखोरांनी आटोपते घेत आल्या मार्गाने काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सायंकाळपर्यंत हिशेब करून गुन्हा दाखल करण्याचे काम शनिपेठ पोलिसांत सुरू होते.
तीन दुचाकींवर सहा जण
सौरभ ज्वेलर्सबाहेर रविवारी (ता. १९) रात्री दोन सुरक्षारक्षक झोपले होते. सोमवार उजाडण्यापूर्वीच मध्यरात्री तीन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास तीन दुचाकींवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी दुकानामागील गल्लीतून लोखंडी चॅनल गेटचे कुलूप कटरने कापून आत प्रवेश केला.
रक्षकांना शस्त्रांचा धाक
दाराबाहेरील सुरक्षारक्षकांना चॉपर आणि पिस्तूल लावून शांत राहण्यास सांगितले. दुकानाची ८ ते १० कुलूप एका मागून एक कटरने कापत त्यांनी जवळपास ७ ते ८ किलो चांदीसह ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. पुन्हा मागील बाजूने बाहेर पडत दरोडेखोरांनी पळ काढला.
पोलिस सायरन वाजला तेव्हा...
एका बाजूला एमआडीसीची हद्द, दुसरी बाजू शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याची हद्द असून, सौरभ ज्वेलर्समध्ये सहा दरोडेखोर माल गोळा करीत असताना, पोलिसांच्या गस्ती पथकाच्या वाहनाचा सायरनचा आवाज ऐकू आल्याने हातात येईल तो माल घेत दरोडेखोरांनी घाईगडबडीत आल्या दिशेने पळ काढल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. (latest marathi news)
पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ
दरोडेखोरांनी लूट करून पळ काढल्यानंतर सुरक्षारक्षकांनी दुकानमालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा पडल्याची माहिती दिली. महेंद्र कोठारी यांच्यासह कुटुंबातील इतरांनी दुकानाच्या दिशेने धाव घेतली. घडल्या प्रकाराबाबत तातडीने शनिपेठ पोलिसांना कळविले.
शनिपेठ पोलिसांपाठोपाठ डीवायएसपी संदीप गावित, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. तद्नंतर सहाही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक शनिपेठ पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना पोलिस अधीक्षकांनी योग्य त्या सूचना दिल्या.
पाच महिन्यांत चौथा दरोडा
जळगाव सराफ बाजार बंद झाला, तरी परिसरात दहा ते १५ सुरक्षारक्षक राहतात. सोबतच प्रत्येक गल्ली बोळ सीसीटीव्हीने कव्हर झाली आहे. शहर-शनिपेठ दोन पोलिस ठाण्याची गस्त नियुक्त आहे. असे असताना गेल्या पाच महिन्यांत चार मोठ्या घटना सराफ बाजारात घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच सराफा व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सीसीटीव्ही बंद
सौरभ ज्वेलर्स सराफ बाजारातील मधोमध असलेले शोरूम आहे. साधारण १० ते १५ लोक दिवसभर येथे काम करतात. शोरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी उंदरांनी वायर कुर्तडल्याने सीसीटीव्ही बंद पडले असून, दरोड्यात शोरूमच्या आतील चित्रण पोलिसांना उपलब्ध झाले नाही.
दृष्टिक्षेपात...
-तीन दुचाकींवर आले दरोडेखोर
-एकूण दरोडेखोऱ्यांची संख्या सहा
-दोन सुरक्षारक्षकांना शस्त्र दाखविली
-२९ मिनिटांत दरोडा टाकून ऐवज लंपास
-दरोडा टाकताना १० कुलूपे तोडली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.