Jalgaon Lok Sabha Election : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवारी सर्वच ठिकाणी शांततेत व सुरळीत मतदान झाले. रावेर मतदारसंघात रावेरसह मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ तालुक्यात सकाळी चांगला पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण होते. तापमानाचा पारा घसरल्याने मतदारांना दिलासा मिळाला व मतदानाचा टक्का वाढू शकला. उशिरापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार लोकसभेसाठी सरासरी ५८ टक्के, तर रावेर लोकसभेसाठी ६० टक्क्यांवर मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (drop in temperature give relief to voters and voting percentage could increase )
या मतदानाद्वारे जळगावातील १४ व रावेर मतदारसंघातील २४, अशा ३८ मतदारांचे भवितव्य मशिनबंद झाले. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदारांनी चांगला उत्साह दाखविला. दुपारी बारापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. रावेर मतदारसंघात सकाळी ९ ते १० दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने मतदारांची तारांबळ उडाली होती. नंतर मात्र पावसाने उघडीप दिली. सोबत वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. यामुळे मतदारांनी पुन्हा उत्साह दाखविला.
जळगाव लोकसभा मतदारसंघातही सकाळपासून उत्साह होता. युवा, ज्येष्ठ, महिला, दिव्यांगांसह इतर मतदारांनी मतदान केले. दुपारनंतर मात्र उन्हाची तीव्रता वाढत ४१ अंशांपर्यंत गेल्याने दुपारनंतर मतदानाचा टक्का कमी झाला. शहरातील मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती. मात्र उपनगरातील काही केंद्रांवर सायंकाळी चारनंतर गर्दी झाल्याने काही ठिकाणी मतदान केंद्रांवर सहानंतरही मतदान सुरू होते.
तापमानाचा पारा घसरला
जळगाव जिल्ह्यात कालपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. सोमवारी सकाळी रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ तालुक्यांमध्ये पाऊस झाला. जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानाचा पारा दोन-तीन अंशांनी खाली आला. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळाल्यामुळे मतदार भरदुपारीही मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. (latest political news)
...या उमेदवारांमध्ये लढत
रावेर मतदारसंघात भाजप-महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणेही रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ व शिवसेना ‘उबाठा’चे करण पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंतची मतदान टक्केवारी अशी
जळगाव मतदारसंघ : एकूण ५१.९८ टक्के
विधानसभानिहाय टक्केवारी
- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ - ४९.५० टक्के
- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - ५५.७९ टक्के
- अमळनेर विधानसभा मतदारसंघ - ४७.४० टक्के
- एरंडोल विधानसभा मतदारसंघ - ५५.८४ टक्के
- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - ५०.३७ टक्के
- पाचोरा विधानसभा मतदारसंघ - ५३.९० टक्के
रावेर मतदारसंघ - ५५.३६ टक्के
विधानसभानिहाय टक्केवारी
- चोपडा विधानसभा मतदारसंघ - ५५.९९ टक्के
- रावेर विधानसभा मतदारसंघ - ५६.८५ टक्के
- भुसावळ विधानसभा मतदारसंघ - ५२.७० टक्के
- जामनेर विधानसभा मतदारसंघ - ५४.६३ टक्के
- मुक्ताईनगर मतदारसंघ - ५३.२० टक्के
- मलकापूर विधानसभा मतदारसंघ - ५९.१० टक्के
मतदान प्रक्रियेतील क्षणचित्रे
- जळगाव मतदारसंघातील रामदेववाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
- जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा
- रावेर परिसरात पावसामुळे दिलाशाने वाढले मतदान
- उन्हाची तीव्रता कमी झाल्याने रावेर, जळगावातही मतदारांमध्ये उत्साह
- वृद्धांसह तरुण मतदारांमध्ये उत्साहाचे चित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.