पारोळा : खरीप हंगाम चांगला जाईल या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत खूप मेहनत घेतली. पिकांची चांगल्या पद्धतीने मशागत केली. मुख्यत्वे करून तालुक्यात सर्वांत जास्त शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला. ऐन वेचणीला आलेल्या कापसाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. (Harvested cotton hit by rain)
म्हसवे (ता. पारोळा) शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांचा वेचणीला आलेला सुमारे ३० क्विंटल कापूस पावसात भिजला गेला. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पाच- सहा दिवसांपासून तालुक्यातील महसूल मंडळात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.
या परिस्थितीत सूर्यप्रकाशच नसल्यामुळे कापूस वेचणी मंदावली आहे. सततच्या पावसामुळे अजूनही अनेक शेत शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने मजुरांना कापूस तोडणी करणे अवघड जात आहे. तर काही भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे कापसाची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. (latest marathi news)
मागील आठवड्यात शेळावे मंडळातील रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री, शेळावे, चिखलोड या परिसरात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. ज्यामुळे परिसरातील पीक परिस्थिती अत्यंत बिकट बनली. त्यामुळे पावसाने मोठा फटका शेतकऱ्यांना दिल्याचे दिसून येत आहे.
"शेळावे बुद्रूक, खुर्दसह मोहाडी, धाबे व चिखलोड या परिसरात कापूस पीक स्थिती अत्यंत नाजूक आहे. शेळावे शिवारात माझी शेतजमीन आहे. अती पावसामुळे कापूस लाल पडून बोंडे सडू लागली आहेत. याबाबत शासनाने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत व तत्काळ भरपाई द्यावी."- राजेंद्र पाटील, शेतकरी, शेळावे खुर्द (ता. पारोळा)
"यंदा समाधानकारक पाऊस असल्याचे दिसत असल्याने कापूस पीक घेतले. मात्र, सलग दोन तीन दिवस झालेल्या पावसामुळे वेचणीला आलेला तब्बल २५ ते ३० क्विंटल कापसाचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेती तरी कशी करावी? असा प्रश्न भेडसावत आहे. शासनानेच आम्हाला आधार द्यावा."- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी, म्हसवे (ता. पारोळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.