बोदवड : तालुक्यात गुरुवारी (ता. २६) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अवघ्या तीन तासांत पडलेल्या पावसामुळे शेतीचे बाध फुटले तर नदी नाले तुडुंब भरुन वाहू लागले. शहरातील न. ह. रांका हायस्कूलच्या मागील बाजूस असलेला नाला ओसांडून पाणी थेट शाळा परिसरात शिरल्याने भर पावसात विद्यार्थ्यांना सोडून द्यावे लागले तर शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास अतिपावसामुळे हिरावला गेला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मका पिकाचे नुकसान झाले असून, कणसे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. (Heavy rain in Bodwad taluka)
मनूर बुद्रुक येथील शेतकरी उल्हास वाघ, सर्वेश पाटील, वैभव पाटील, रामा कोळी, सुभाष डिके, रवी पाटील, भास्कर बोदडे, उल्हास वाघ, रामा काळे यांचा मका पाण्यात वाहून गेला तर कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. यासह येवती, जामठी, कुऱ्हा, राजुरा, शेलवड आदी भागातील शेतकऱ्यांची देखील हिच अवस्था झाली आहे.
बोदवड शहर परिसरातील तपोवनमधील तलावालगतची शेती पाण्याखाली बुडाली असून, शहरातील मधोमध असलेला हिरवा तलाव तुडुंब भरला असून, फुटण्याची शक्यता होती. पण वेळीच नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे मुख्याधिकारी गजानन तायडे यानी तलावाचे पाणी जेसीबीने प्रवाह फिरवून नाल्यात काढले.
मेहतरवाडा परिसरातील पुलावरून पाणी वाहून गेले आणि काही वेळ गावातील दोन्ही बाजूंचा संपर्क काही तासांसाठी तुटला होता. यात कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, कृषी विभागाकडून ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असेल, व ज्यांनी पीकविमा भरला असेल, त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे फोटोसह ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (latest marathi news)
शेतकऱ्यांना मोठा फटका
जामठी (ता.बोदवड) : बोदवड तालुक्यासह ग्रामीण भागात गुरुवारी (ता. २६) सायंकाळी पावसाने थैमान घातले असून, मका व कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. गेल्या दिवसांपासून शेतात पाणी साचले आहे तर काढणी आलेले मक्याचे कणसांना कोंब येत असून, अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून कणसे पाण्यावर तरंगत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. परीसरात बुधवार सायंकाळ पासून पडत असलेल्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले. या वादळी पावसाच्या तडाख्यात मका, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
वेचणीसाठी आलेल्या कपाशीच्या पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मनुर येथील शेतकरी विनोद मालठाणे यांच्या शेतात सोंगून ठेवलेला मका पाण्यावर तरंगत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या तुरीच्या पिकाचे आणि कांद्याचेही नुकसान झाले आहे. राज्य सरकार ने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.