Jalgaon Cotton News : जिल्ह्यात यंदा दसऱ्यापूर्वी ‘पांढऱ्या सोने’ अर्थात कापसाच्या दरात चांगली सुधारणा होत असताना, परतीच्या पावसामुळे खरेदी पुन्हा रखडली आहे. कापूस ओलसर असल्याने व्यापाऱ्यांनी कापूस घेणे बंद केले आहे, तर दुसरीकडे शेतात उभ्या पिकावर किडी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. काही ठिकाणी पाऊस थांबला असला, तरी दर वाढण्यासाठी अजून आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Instability in cotton price due to rain)
कापसाचे भाव सध्या अस्थिर आहे. मध्यंतरी दरात किंचित सुधारणा झाली. तेव्हा दर प्रतिक्विंटल साडेसात हजार रुपये होता. या दरात अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यापेक्षा अधिकचे दर होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या कापसात ओलावा अधिक असून, बाजारात सहा ते साडेसहा हजारांचा दर मिळत असल्याने तुरळक कापूस विक्रीसाठी येत आहे.
बहुतांश ठिकाणी कापूस खरेदी थांबली असून, मक्याच्या खरेदीवर भर दिला जात आहे. सध्या पावसाळी स्थितीमुळे यापेक्षा अधिक दरात खरेदी परवडत नाही, असे खरेदीदारांचे म्हणणे आहे. कापसाची आवक कमी आहे. खडा किंवा थेट गावात खरेदी रखडत सुरू आहे.
सणासुदीला पैशांची गरज असल्याने काही शेतकऱ्यांनी कमी भावातही कापसाची विक्री केली. चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोल या भागामध्ये शेतकऱ्यांकडे कापसाची आवक सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात आणखी वाढेल, असे संकेत आहेत.
पावसामुळे दुहेरी संकट
जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाची उघडीप मिळाल्यानंतर कापूस वेचणीला गती आली होती. जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा व अन्य भागात वेचणीच्या कामाला चांगली सुरुवात झाली. कापूस पीक यंदा कमी आहे.
त्यामुळे यंदा चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची वाळवणूक करून बाजारात नेण्याची तयारी ठेवली होती; परंतु जिल्ह्यात गेल्या तीन, चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी, कापसात ओलावा आहे. ओलाव्यामुळे कापूस पिवळा होतो. त्याचा दर्जा घसरतो. त्याला पुढे भाव कमी मिळतो. त्यामुळे शेतकरी कापसाची साठवणूक करीत आहेत. (latest marathi news)
लागवड घटल्याने आवक कमी
यंदा कापसाची लागवड कमी असल्याने बाजारात पोकळी निर्माण झाली आहे. मागील वर्षी पाच लाख ६५ हजार हेक्टवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड होती. हे क्षेत्र ५० ते ५५ हजार हेक्टरने घटले असून, यंदा शेतकऱ्यांनी पाच लाख ११ हजार हेक्टरवर लागवड केली आहे.
परिणामी, येत्या काळात आवक कमीच राहणार असून, भाव चांगले राहतील, असे जाणकारांचे मत आहे. सध्या पावसामुळे सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. आठवडाभरात त्यात सुधारणा होईल. येत्या काळात भाव आठ हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.