Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीच्या प्रचार संपण्यास आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. उन्हाचा अधिक कडकपणा असल्यामुळे निवडणूकीचे वातावरण फारसे तापलेच नाही. मात्र भारतीय जनता पक्ष व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी सभांपेक्षा उमेदवार भेटीवर अधिक भर दिला. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांना आजच्या स्थितीत समसमान आशा आहे. जिल्ह्यात शिवसेना पक्ष फुटीत पक्षाचे सर्व आमदार पक्ष सोडून गेल्याने उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती निश्चित आहे, त्याचा फायदा उमेदवाराला होणार आहे. ()
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अद्यापही मतदारांमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे त्या फॅक्टरचा फायदा भाजपला होणार हे निश्चित आहे. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवार व पक्ष कोणता डाव टाकणार यावरच विजयाचा कल झुकणार असल्याचे चित्र दिसत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघ हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. एका पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी कॉंगेसचे वसंतराव मोरे विजयी झाले होते. यापलिकडे गेल्या पंचवीस वर्षात भारतीय जनता पक्षाने विरोधकांना यश मिळू दिले नाही सत्य आहे.
बदललेले समीकरण
भारतीय जनता पक्षाला जळगाव लोकसभा मतदार संघ बालेकिल्ला असला तरी त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे यांचा पक्ष होता. मात्र ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. यावेळी भाजपसोबत गेल्या अनेक वर्षापासून असलेला शिवसेना (उबाठा) हा मित्र पक्ष नाही. त्यामुळे यावेळी बरेच राजकीय समीकरण बदलले आहे. भाजपसोबत शिवसेना एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आहे. तर शिवसेना ठाकरे गटासोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आहे.
खासदार फुटीचे मोठे आव्हान
माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पक्षातून बाहेर पडून भाजप महायुतीला आव्हान दिले आहे. सोबत त्यांनी भाजपमधील पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना घेतले व त्यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे भाजप पक्षाची रणनीती माहिती असलेले पक्षातील खासदाराच समोर उभे असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान आहे. मात्र भाजपच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यासुध्दा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे भाजपच्या प्रचारात त्या खुबीने वापर करीत असून जनतेच्या भेटीकडेच त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. (latest political news)
ठाकरे गटासमोर जनतेपर्यंत पोहोचण्याचे आव्हान
शिवसेना (उबाठा) पक्ष प्रथमच लोकसभा निवडणूक लढवित आहे. शिवसेना फुटीनंतर पक्षाला नवीन चिन्ह मिळालेले आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार करण पाटील यांच्यासमोर जनतेपर्यंत हे चिन्ह पोहोचविण्याचे आव्हान आहे. परंतु पवार यांनी सभा घेण्यापेक्षा थेट भेटीवर भर दिला असल्याचे दिसून आले आहे. अगदी मतदार संघातील प्रत्येक गावात जावून ते मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या युवा मित्र गोतावळा मोठा आहे, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
ठाकरे-फडणवीस सभा
निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षातर्फे फारशा सभा झालेल्या नाहीत. भारतीय जनता पक्षातर्फे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाचोरा येथे सभा झाली तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा घेण्यात आली. आता दोन दिवसात दोन्ही पक्षातर्फे कोणते नेते येणार याकडे लक्ष आहे.
मात्र भाजपतर्फे जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण हे पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार यात्रेत सहभागी होत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत जळगावात तळ ठोकून प्रचार करीत आहेत. या शिवाय ‘निर्भय बनो’ चे असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनीही शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे.
दोन्ही उमेदवारांना समान संधी
प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत आता निवडणूक आलेली आहे. अशा स्थितीत भाजपच्या स्मिता वाघ व शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांना समसमान संधी असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळी भाजपच्या उमेदवाराला असलेला साडेचार लाखाचा लीड ही जमेची बाजू आहे. परंतु मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले खासदार उन्मेश पाटील हेच ठाकरे गटाच्या बाजूने असून नेटाने प्रचार करीत आहेत.
त्यामुळे आजच्या स्थितीत त्या लीडचा भाजपला कितपत फायदा होईल हाच प्रश्न आहे. या शिवाय शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख ठाकरे यांनी जळगाव येथे घेतलेली सभा व त्याला मिळालेला प्रतिसाद याचा फायदा होण्याची शक्यता आहे. शिवाय याच सभेत त्यांनी पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या आमदारांवर टीका टाळली आहे. त्यामुळे त्याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
त्याचा फायदा ठाकरे गटाचे करण पवार यांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचोऱ्यात सभा घेतली. तसेच त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेटी देवून विजयाचे राजकीय गणित तयार केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
या शिवाय चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे जोरदार खिंड लढवित आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा होणार असल्याचे दिसत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे गारुड अद्यापही मतदारांवर तसेच युवा वर्गात कायम आहे. त्यामुळे भाजपला विजयाची आशा आहे. मात्र मतदार काय भूमिका घेतात यावर विजयाचे गणित अवंलबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.