Jalgaon News : देशात सत्ता कोणाची हे ठरविणारी ही निवडणूक आहे? निवडून गेलेला प्रतिनिधी देशाची राजधानी दिल्लीत अर्ध्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. देशाचे प्रश्न मांडण्यासह जिल्ह्याचे प्रश्नही उपस्थित करून त्यावर मंथन करणार आहेत. अशा स्थितीत निवडणूकीत अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)
परंतु निवडणूक अर्ज भरण्याच्या अगोदर सुरू झालेल्या रणधुमाळीत राष्ट्रीय विरूध्द स्थानिक मुद्दे असा संघर्ष सुरू आहे. त्यात भाजपकडून गेल्या दहा वर्षाच्या सत्तेत सोडविण्यात आलेल्या मुद्यांवर भर देण्यात येत आहे. तर विरोधी पक्ष जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांचा उहापोह करतांना दिसत आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष असलेल्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गट व मित्र पक्ष असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यात संघर्ष होणार हे चित्र आता उघड झाले आहे. उमेदवारी अर्ज'भरण्यास आजपासून प्रारंभ झाला असून आणखी कोण मैदानात उतरणार हे चित्र उमेदवारी अर्ज दाखल होवून माघारीच्या अंतिम दिवशीच स्पष्ट होईल.
मात्र निवडणूकीतील प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पक्षांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. निवडणूकीच्या प्रारंभिक स्थितीत महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय मुद्यांच्या प्रश्नावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून दहा वर्षाच्या काळात जे काम केले आहे.
त्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यात अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेले राम मंदिर आणि त्यासाठी झालेला संघर्ष, राज्यातील लखपती दीदी योजना, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर देशांशी निर्माण केलेले सलोख्याचे संबंध, देशभरात दळणवळणाच्या करण्यात आलेल्या सुविधा. (Latest Marathi News)
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी, गरीबांसाठी असलेली मोफत धान्य योजना अशा योजनांचा ऊहापोह करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा लेखाजोखा समोर ठेवण्यात येत आहे. जळगावात महायुतीचा नुकताच मेळावा घेण्यात आला. त्यातही भारतीय जनता पक्षाचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन.
जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील, राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री तसेच अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षात केलेल्या कार्याबाबत विश्वास व्यक्त करून नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार आहेत असे समजून मतदान करावे असे जनतेला आवाहन करण्यास कार्यकर्त्यांना सांगितले.
या शिवाय भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या पक्षातंरावरही गिरीश महाजन यांनी तुफानी हल्ला चढविला आहे. केवळ उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्षनिष्ठा डावलून पक्षांतर केल्याचा थेट आरोप त्यांनी उन्मेश पाटील यांच्यावर केला आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत, परंतु उमेदवारी जाहीर झाल्याने आता पक्षांतर्गत मेळावे, पत्रकार परिषद या माध्यमातून प्रचार सुरू झाला असून उमेदवारांच्या तसेच नेत्यांकडून जनतेच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. प्रारंभिक स्वरूपात राष्ट्रीय व स्थानिक मुद्यावरून आता आरोप- प्रत्यारोपाचा धुराळा उडू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचाराचा तोफा आणखी कोणत्या मुद्यावर धडाडणार याकडेली जनतेचे लक्ष असणार आहे.
पालकमंत्र्यांना धरले धारेवर
शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीतर्फे मात्र स्थानिक मुद्यांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षातून शिवसेना ठाकरे गटात गेलेले उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यातील स्थानिक मुद्यांवर भर देवून पालकमंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरले आहे. जिल्ह्यात आम्ही सत्तांतर करून जिल्हा बँक, जिल्हा दूध संघावर सत्ता मिळविली असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
तोच मुद्दा पकडून उन्मेश पाटील यांनी प्रथम जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या तसेच गटसचिवाच्या प्रश्नांवर हल्लाबोल केला तर आता जळगाव जिल्हा दूध संघावर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे संघाचे चेअरमन आहेत. त्या माध्यमातून दूध संघात सुरू असलेल्या कारभाराबाबत जोरदार प्रश्न उपस्थित करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
राज्यात सत्ता आहे, मंत्रीपद असूनही दूध उत्पादकांचे प्रश्न सुटले नसल्याचा आरोप त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला. या शिवाय कापसाचा भाव, टेक्सटाईल पार्क हे प्रश्नही उपस्थित करीत आहेत. आपण पदासाठी नव्हे; तर जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षांतर केल्याचे सांगत आहेत. तर महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारीही याच मुद्यावर आवाज उठवू लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.