Jalgaon Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक विविध पैलूंनी गाजली. महाराष्ट्रात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही या निवडणुकीच्या एकूणच संचलनात दिग्गजांच्या पुढच्या पिढीने, वारसदारांनी ज्या पद्धतीने सक्रिय सहभाग घेतला तो कौतुकास्पद होता. तर काही वारसदारांनी मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने स्वत:ला ‘प्रमोट’ करण्याची संधी गमावली. (political leaders prepare For upcoming political developments )
जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीचे घमासान झाले. मात्र, निवडणुकीच्या आधीपासूनच जळगाव जिल्ह्यातील राजकारण विविध घटना, प्रसंगांनी ढवळून निघाले. त्यात सर्वाधिक चर्चेचा ठरला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजपतील प्रवेशाचा मुद्दा.
रोहिणी खडसेंचे एक पाऊल पुढे...
खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची साथ सोडत घरवापसीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंनी मात्र पवारांची साथ न सोडण्याचा पवित्रा घेतला व पित्याविरोधात भूमिका घेतल्याचे दाखवून दिले. एकीकडे लोकसभा निवडणुकीत खडसे पित्याप्रमाणे स्नुषा रक्षा खडसेंच्या पाठिशी उभे असताना तिकडे रोहिणी खडसेंनी मात्र त्यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून त्या मुक्ताईनगर मतदारसंघात सक्रिय होत्या, या निवडणुकीच्या निमित्ताने त्या अधिक जोमाने कामाला लागल्या. रक्षा खडसे दहा वर्षांपासून खासदार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत खडसेंच्या वारसदार म्हणून काम करत असताना आता रोहिणी ह्यादेखील खडसेंच्या कन्या म्हणून व कुटुंबातील दुसऱ्या राजकीय वारसदार या रुपाने समोर येत आहेत.. (latest political news)
धनंजय चौधरींची ‘एन्ट्री’
रावेरचे कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी नुकत्याच त्यांच्या वाढदिवशी झालेल्या कार्यक्रमात निवृत्तीचे संकेत दिले. पुढची निवडणूक ते लढणार नाहीत, त्यांचा वारसदार म्हणून पुत्र धनंजय हे गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. मतदारसंघातील सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी याआधीच काम सुरु केले असून शिरीषदादांच्या वाढदिवसाला धनंजय यांच्यासोबत असलेली तरुणांची फौज पाहता धनंजय यांची येणाऱ्या विधानसभेत नक्कीच उमेदवार म्हणून ‘एन्ट्री’ होऊ शकेल, असे दिसते.
पालकमंत्री पुत्राचीही कमाल
जळगाव ग्रामीणचे प्रतिनिधीत्व करणारे गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री. परंतु, मंत्री असल्याने गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा मतदारसंघातील वेळ मर्यादित. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मतदारसंघातील एकूणच सर्व कामांची व व्यवस्थापनाची धुरा प्रताप पाटलांकडे असते. जिल्हा परिषद सदस्य यापेक्षाही पालकमंत्र्यांचे पुत्र म्हणून त्यांचा संपर्क अधिक दांडगा. या लोकसभा निवडणुकीत त्यांनीही महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचार यंत्रणेची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे जरी गुलाबरावांनी निवृत्तीचे संकेत दिले नसले तरी प्रताप पाटील तयार होतोय, असे म्हणायला जागा आहे.
डॉ. केतकी पाटलांचा जनसंपर्क
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या माध्यमातून उभे केलेले आरोग्य सेवेचे नेटवर्क मोठे आहेच. पण हे जाळे अधिक व्यापक होण्यासाठी त्यांच्या कन्या डॉ. केतकी गेल्या काही वर्षांपासून समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी त्या उमेदवारी म्हणून प्रबळ दावेदार होत्या.
भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाने महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलीय. उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारात घेतलेला सहभाग लक्षणीय ठरला. त्यामुळे त्यांनाही राजकीय भविष्य खुणावतेय, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
अमोल पाटील- रोहन पाटीलही चर्चेत
तिकडे पारोळ्यात आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटील हे गेल्या काही वर्षांपासून पित्याचा वारसा जनसंपर्काच्या रुपाने पुढे नेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमोल पाटलांनी एरंडोल मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची जबाबदारी एकहाती सांभाळली. आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित अमोल पाटीलच उमेदवार असतील, अशी शक्यता या सक्रिय सहभागातून दिसून आली.
दुसरीकडे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुत्र रोहन यांनीही चुलत भाऊ तथा शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार करण पवारांच्या प्रचारात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. त्यामुळे पारोळ्याचे राजकारण आगामी काळात अमोल व रोहन ही पाटीलद्वयी हाती घेईल, असे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.