Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जळगाव व रावेर मतदारसंघात मतदानानंतर आता मतदानोत्तर चाचण्या येईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची समीकरणे मांडली जात होती. त्यात जातीय, धार्मिक ध्रुवीकरणासह अन्य मुद्देही होते.
मात्र या निवडणुकीतील एकूणच मुद्दे पाहता शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या भूमिकेवर जसा निकाल अवलंबून असेल तसा तो धार्मिक ध्रुवीकरणासह जाती समीकरणांवरही बेतलेला असेल, असे मानले जातेय. (Jalgaon Lok Sabha Election 2024 discussion of changing equation in last step)
यंदाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. जळगाव जिल्ह्यातही या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नवीन राजकीय गणितं, समीकरणे उदयास आली. महायुतीच्या वतीने दोन्ही जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवार मैदानात होत्या, तर महाविकास आघाडीतर्फे जळगावला शिवसेना ‘उबाठा’, तर रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुरुष उमेदवार रिंगणात होते.
प्रचाराचे मुद्दे मात्र अनेक
जळगाव व रावेर दोन्ही मतदारसंघ जळगाव या एकाच जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्याची एकूणच भौगोलिक रचना सारखी असली तरी रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघांमधील सामाजिक रचना वेगळी आहे. रावेर लोकसभा क्षेत्र हे प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग, तर जळगाव मतदारसंघ पश्चिम भाग.
पूर्व भागात केळी उत्पादकांची संख्या मोठी, त्यांच्या समस्या वेगळ्या. तर पश्चिम विभागात कापूस उत्पादकांचे प्रमाण अधिक आणि त्यांचे प्रश्नही वेगळे. त्यामुळे जळगाव मतदारसंघातील निवडणूक कापूस उत्पादकांच्या आत्महत्यांसह कापसाला भाव, पाडळसरे प्रकल्पाचे रखडलेले काम, दूध संघ आदी मुद्द्यांभोवती फिरली. तर रावेर मतदारसंघात केळी उत्पादकांच्या समस्या, केळी वाहतुकीसह त्यावरील प्रक्रिया उद्योग, मेगारिचार्ज स्कीम, असे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. (latest marathi news)
शहरी-ग्रामीण वर्गीकरण
जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांचा विचार करता जळगाव लोकसभा क्षेत्रात शहरी भाग किंबहुना शहरी मतदार रावेर मतदारसंघापेक्षा तुलनेने जास्त आहे. तर रावेर मतदारसंघ ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारे क्षेत्र म्हणून परिचित आहे.
एरवी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्येही शहरी मतदार भाजपच्या बाजूने, तर ग्रामीण मतदार भाजपच्या विरोधात उभा राहातो, असे चित्र असायचे. गेल्या काही वर्षांत विशेषतः:२०१४ पासून हे चित्र बदलले आणि ग्रामीण मतदारही बऱ्यापैकी भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचे विविध निवडणुकांचे परिणाम सांगतात.
शहरी-ग्रामीण मतदार यंदा कुठे?
लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे शहरी व ग्रामीण असे वर्गीकरण केले तर बऱ्यापैकी दोघा मतदारांची मानसिकता व भूमिका वेगवेगळी असावी, असा कयास बांधला जात आहे. मतदानापर्यंतचा प्रचार, प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू असताना व त्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील एकूणच कल पाहता शहरी मतदार भाजपकडे, तर ग्रामीण मतदार महाविकास आघाडीकडे काही प्रमाणात झुकल्याचे दिसून येतेय. अर्थात, हे वरवरचे आकलन असले तरी त्याचा निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे. (latest marathi news)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मुद्दा
ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या कृषिविषयक धोरणांबद्दल काही प्रमाणात नाराजी दिसून आली. कापसाला भाव नाही, केळी उत्पादकांची समस्या, केळी फळ पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित शेतकरी, सिंचनाचा अभाव, बी-बियाणे-खतांच्या वाढलेल्या किमती या मुद्द्यांमुळे शेतकरी व पर्यायाने ग्रामीण मतदार नाराज होता.
याउलट शहरी मतदारांचेही काही प्रश्न असले तरी तुलनेने शहरी मतदारांच्या भावना तीव्र नव्हत्या. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत शहरी व ग्रामीण मतदारांच्या भूमिका व मानसिकता या निकषाप्रमाणे बदलली असेल, तर त्याचा परिणाम निवडणूक निकालातून दिसून येईल.
जातीय, धार्मिक ध्रुवीकरण
जळगाव व रावेर मतदारसंघातील विश्लेषण आपापल्या पद्धतीने मांडले जात असताना काही विश्लेषक ही निवडणूक विशेषतः रावेर मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणावर लढली गेल्याचे सांगतात. तर धार्मिक ध्रुवीकरण हा मुद्दाही मतदान केंद्रांवरील चित्र पाहताना लक्षात आला.
त्यामुळे जातीय, सामाजिक रचनेसह धार्मिक ध्रुवीकरण हा घटकही थेट निकालावर परिणाम करणारा ठरू शकेल, असेही बोलले जात आहे. अर्थात, या जर-तरच्या शक्यतांना व तर्कवितर्क, चर्चांना मंगळवारी (ता. ४) पूर्णविराम मिळणार आहे, तोपर्यंत आता काही क्षण वाट पाहावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.