Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर पेच निर्माण झाला आहे. पक्षातर्फे एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र तब्येतीमुळे त्यांनी नकार दिला. मात्र, आता पक्षातर्फे त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. मात्र, त्यांची मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू आहे. (Jalgaon Lok Sabha Election MP Raksha Khadse nominated by Bharatiya Janata Party in Raver Lok Sabha Constituency)
त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत पेच निर्माण झाला. हा पेच सोडवून उमेदवार निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे दोनदा निवडून आल्या आहेत. आता तिसऱ्यांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत.
एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच आहेत. त्यांनी पक्षाचे कार्य सुरू ठेवत जनसंपर्कही कायम ठेवला आहे. राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष झाला तरीही रक्षा खडसे यांनी मात्र कधीही त्यात हस्तक्षेप केला नाही. या वादात त्या पडल्या नाहीत.
खासदार म्हणून त्यांचे कार्यही चांगले होते. मतदारसंघातील वाड्या, वस्ती या ठिकाणीही भेटी देऊन लोकांशी संपर्क ठेवला. मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्याकडेही त्यांचे लक्ष दिले. त्यांच्याबाबत मतदारसंघात व भाजपमधील नेतृत्वातही नाराजी दिसून आली नाही. त्यामुळे केवळ ‘खडसे’ नावामुळे त्यांची भाजपमधील उमेदवारी रद्द होऊ शकते, अशी चर्चा होती.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे स्वत: एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात उतरण्याची तयारी दाखविली होती. पक्षातर्फे उमेदवारीसाठी त्यांचा ठराव करूनही पाठविण्यात आला होता. (latest marathi news)
मात्र, तब्येतीच्या कारणामुळे आपण लढू शकणार नाही, असेही त्यांनी कळविले होते. जर डॉक्टरांनी सांगितले तर आपण लढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आता तब्येतीच्या कारणावरून त्यांनी लढण्यास असमर्थतता दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बारामतीप्रमाणे नणंद-भावजय लढत?
आता रक्षा खडसे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवार कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे बारामती येथे होत असलेली पवार नणंद-भावजयीची लढत मुक्ताईनगरातही खडसे नणंद-भावजयीत होणार काय, याबाबत आता चर्चा सुरू आहे.
परंतु ॲड. रोहिणी खडसे यांनी लोकसभेची दावेदारी केलेली नाही. मुक्ताईनगर विधानसभेसाठीच त्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी घेण्याची शक्यता कमीच आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रमेश पाटील आदींची नावे चर्चेत आहेत.
उमेदवार ठरविण्याबाबत आता पक्षाच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसनेही मतदारसंघात मागणी केली असून, रावेर येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी, चोपडा येथील संदीपभय्या पाटील, जगदीश पाटील हे उमेदवार असल्याचा दावाही पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’तील उमेदवारीचा पेच पाहता काँग्रेसकडेही ही जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौधरींच्या उमेदवारीला चेन्नीथलांची संमती
लोकसभा मतदारसंघाचे राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. रावेर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसनेही मागणी केली. काँग्रेसतर्फे आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याप्रसंगी दोंडाईचा येथे राष्ट्रीय सरचिटणीस रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी नेत्यांची रावेरबाबत चर्चा झाली. आमदार शिरीष चौधरी यांच्या उमेदवारीवरही चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत असेल तर चेन्नीथला व पटोलेंनी आमदार चौधरी यांच्या उमेदवारीला संमती दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
"रावेर मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारीबाबत शुक्रवारी (ता. १५) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत."- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.