MLA Bhole : शहरातील रस्त्यांसह इतर विविध विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून अपेक्षित निधी मंजूर असतानाही केवळ महापालिकेकडून या कामांसाठी ‘ना हरकत दाखला’ दिला जात नसल्याने विविध विकासकामे रखडली आहेत.
शहरातील विकासकामांसाठी दिरंगाई होत असल्याची तक्रार आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शहरातील नागरिकांची भूमिका आमदार भोळे यांनी मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Jalgaon Municipality block development NOC MLA Bhole complaint to Chief Minister Deputy Chief Minister jalgaon news)
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. शहराचे आमदारही भाजपचेच असल्याने शहरातील रस्त्यांसह इतर विविध विकासकामे मार्गी लागली पाहिजेत, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. यासंदर्भात आमदार भोळे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन नागरिक विविध विकासकामांची अपेक्षा व्यक्त करतात.
त्यानुसार, आमदार भोळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने भरघोस निधी मंजूर करण्यात यश मिळविले. या निधीतून विशेषतः शहरातील रस्ते, विविध भागांतील खुले भूखंड विकास, हायमास्ट लॅम्प, बसण्यासाठी बाक आदींचा लाभ शहरातील नागरिकांना दिला जाणार आहे.
‘मनपा’चा खोडा
आमदार राजूमामा भोळे यांनी राज्य सरकारकडून मंजूर केलेल्या निधीतून विकासकामे करायची झाल्यास त्यासाठी महापालिकेचा ‘ना हरकत दाखला’ आवश्यक असतो. हे दाखले देण्यासाठी दिरंगाई होत असल्याने विकासकामांना अडथळा निर्माण होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विशेष म्हणजे, यासंदर्भात आमदार भोळे यांनी वारंवार सूचना देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे आमदार भोळे यांचे म्हणणे आहे. ‘मनपा’कडून असा खोडा घातला जात असल्यानेच विकासकामे ठप्प झाली असून, शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्वतःचा निधी खर्च करावा
महापालिकेला शासनाच्या निधीतून शहरातील विविध विकासकामे करायची नसल्यास ‘मनपा’ने स्वनिधीतून विकासकामे करावी. म्हणजे, शासनाचा मंजूर निधी परत जाणार नाही, असे आमदार राजूमामा भोळे यांचे म्हणणे आहे. शासनाच्या मंजूर झालेल्या निधीतून केवळ ठराविक प्रभागात नव्हे, तर शहरातील सर्वच प्रभागांत विकासकामे केली जाणार आहेत.
केवळ ‘मनपा’च्या या भूमिकेमुळे शहरातील नागरिकांना विकासकामांचा लाभ मिळत नसल्याने शहरवासीय नागरिक विनाकारण वेठीस धरले जात आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली असून, त्यांनी यावरच लवकरच मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
"शहरातील नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे. यासाठी पावसाळी अधिवेशनात आपण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देणार आहोत. विधानसभेत यावर लक्षवेधी सादर करणार आहे." - राजूमामा भोळे, आमदार, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.