जळगाव : जळगाव जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांची प्रशासकीय कामकाजात प्रचंड ढवळा-ढवळ वाढली आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त अहवालावरून (तक्रारी) तब्बल दहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यापूर्वीच या कर्मचाऱ्यांची दुसऱ्यांदा बदली करण्यात आल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. (Jalgaon Police Transfer With intervention of leaders marathi news)
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ४ फेब्रुवारीस पदभार स्वीकारला. अवघ्या दीड महिन्याच्या कार्यकाळात पोलिस अधीक्षकांनी अमळनेर येथील तीन, शहर पोलिस ठाण्यात कार्यरत ठाणे अंमलदार एक, एमआयडीसी पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या आपसी वादा नंतर दोघांच्या बदल्या आणि नुकतेच शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा प्रकरणात चार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली.
त्यापैकी अमळनेर पोलिस ठाण्यातील तिन्ही कर्मचाऱ्यांच्या भडगाव, अडावद, बोदवड अशा बदल्या करण्यात आल्या होत्या. बदली आदेश निघाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द करून पारोळा, एरंडोल अशा बदल्या करण्यात आल्या. तर, तक्रारदाराची तक्रार नोंदवून न घेतल्याच्या कसुरीवरुन शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराचे निलंबन मागे घेऊन पुन्हा चार दिवसात पुर्ननियुक्ती देण्यात आली.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये माझ्या बिटमध्ये कारवाई का केली? म्हणत कलेक्शन असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस ठाण्यातच धक्काबुकी झाली. या वादाचा बोभाटा होवुन पोलिस अधीक्षकांनी एकाला बोदवड तर, दुसऱ्याची मेहुणबारे पोलिस ठाण्यात बदली करण्याचे आदेश दिले. हे आदेशही चार दिवसात बदलून एकाची शनिपेठ पोलिस ठाण्यात तर दुसऱ्याला शहर पोलिस ठाण्यात पुनर्वसन करण्यात आले आहे.
शिस्तीच्या खात्यात बेशिस्ती
पोलिस खात्याची रचनाच बक्षिस आणि शास्ती यावर आधारीत आहे. शिस्तीचे खाते म्हणून परिचित असलेल्या पोलिस दलात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढीस लागला आहे. पोलिस खात्यातील अंतर्गत कारवाईला छेदण्यासाठी गुन्हेगार प्रवृत्तीशी निगडित कर्मचारी मंडळी राजाश्रयाला जातात. कुण्या आमदाराचा, खासदाराचा नाहीच तर थेट मंत्र्यांचा फोन आणून वरिष्ठांना जेरीस आणण्याचे प्रकार सर्रास शिस्तीच्या खात्यात होत आहेत. (latest marathi news)
डबल बदल्यांची प्रथा घातक
पोलिस खात्यात सर्वसाधारण बदल्यांसाठी सामान्य कर्मचाऱ्यांची मरमर असते, कुणाच्या आई- वडिलांचे आजारपण, कुणाच्या मुलांचे शिक्षण, पत्नीची नोकरी अशा विविध कारणांनी प्रामाणिक कर्मचारी सोईच्या ठिकाणी बदली होण्यासाठी दरवर्षी उंबरे झिजवतात. तरी, त्यांचा दादपुकारा घेतला जात नाही.
मात्र, पोलिस ‘मॅन्युअल’नुसार खातेअंतर्गत कारवाईसाठी केलेल्या बदल्या पोलिस खात्यातील वरपर्यत पोहोच असलेले कर्मचारी हातोहात बदलून आणत असल्याने याचा दूरगामी परिणाम पोलिस दलास भोगावा लागेल अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागून आहे.
त्या कर्मचाऱ्यांचा दोष काय?
मध्यरात्री एका बियरबार-हॉटेल बाहेर गोंधळ सुरु असताना गस्तीवर असलेल्या पोलिस गाडीने घटनास्थळ गाठले. येथे सुरु असलेल्या हाणामारीत एका ज्येष्ठ पोलिस कर्मचाऱ्याने एकाच्या कानशिलात लगावली. उलटून त्याने या पोलिस कर्मचाऱ्याची गचांडी धरुन मारहाण केली.
त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात शासकीय नोकरास मारहाण प्रकरणी (कलम-३५३) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याही प्रकरणात अर्ज-फाटे वरिष्ठांना नोटिसा आणि राजकीय दबावा तंत्राचा वापर करून चारही कर्मचाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली.
रस्तोंगीच्या कार्यकाळाची चर्चा
संतोष रस्तोगी यांनी नेहमीच कर्मचाऱ्यांची पाठराखण केली. त्याच्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात थेट विधिमंडळात गाजेल इतका दबाव आणला गेला. मात्र, कधीच त्यांनी खात्याच्या शिस्तीला सोडून ‘सॅल्युट’ मारला नाही. ‘पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख आणि प्रत्येकाच पिता एकच असतो..’ या भाषणाची रेकॉर्डिंग आजही प्रामाणिक पोलिसांच्या मोबाईलमध्ये सेव असून राजकारण्यांच्या मर्जीतील कर्मचारी असो की राजकीय हस्तक्षेपाचा विषय आला की, नेहमीच चर्चिली जाते.
तर, पोलिसांच्या क्राईम मिटिंगमध्ये शिरून पालकमंत्री, आमदारांनी अवैध धंद्यावरुन दबाव आणायचा प्रयत्न केला असता तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकांत कुंभार यांनी त्याच व्यासपीठावरून वाळू माफिया, अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिले. चार दिवसात दबाव आणणारा राजकीय गोतावळा हात जोडत आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.