Jalgaon Bus News : दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असून सणासाठी गावी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. याचाच फायदा खासगी प्रवासी वाहतुकदारांनी घेत तिकीट दरात भरमसाट वाढ केली आहे. जळगाव ते पुणे प्रवास तिकीटदर ९०० रुपयांवरून थेट २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयापर्यंत पोचले आहेत.
हे दर विमान प्रवासापेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात आहे. खासगी बस तिकीटदर वाढीवर राज्य परिवहन विभागास इतर कुठल्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसून सामान्य प्रवाशांची प्रचंड लूट होत असल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे. (Jalgaon Pune Luxury Bus Fare increase news)
विमानसेवा बंद असली तरी जळगाव-मुंबई, जळगाव- पुणे विमान प्रवासासाठी २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांचे तिकीट आहे. जळगाव स्थानकावरून पुण्यासाठी फारच कमी रेल्वेगाड्या असल्याने त्या प्रवाशांनी तुडुंब भरून वाहतात.
महिनाभरापूर्वीच काहींनी तिकीट बुकिंग केल्याने एका जागेसाठी शंभर-दीडशेच वेटिंग सुरु आहे. कन्फर्म तिकीट मिळणे सणाच्या काळात दुरापास्त झाले असून नाइलाजास्तव प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांकडे वळावे लागत आहे. याचाच गैरफायदा घेत एरवी ७५० ते ९०० रुपयांपर्यंत असणारे भाडेदर आता चक्क अडीच हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
ट्रॅव्हल्स मालकांची ‘स्ट्राँग लॉबी’
जळगाव-पुणे प्रवासात थेट नागपूरपासून ते धुळ्यापर्यंत जवळपास चारशेच्यावर बसेस ये-जा करीत आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदारांचे मोठे सिंडिकेट महाराष्ट्रात सक्रिय आहे. जळगाव व लगतच्या जिल्ह्यांमध्येही खासकरुन जळगाव- पुणे खासगी बससेवा पुरविणाऱ्यांची ‘लॉबी’ मजबूत असल्याचे बोलले जाते.
या ‘लॉबी’पुढे परिवहन विभागाचेही काही चालत नाही, अशीही नेहमी चर्चा असते. त्यातही दिवाळी, गणपती आणि इतर सण- उत्सवांमध्ये पुणे, मुंबईसाठीची भाडेवाढ इतकी प्रचंड वाढते की, सामान्य प्रवाशाकडे त्या दराने तिकीट घेण्यापलीकडे मार्ग नसतो.
परिवहन विभागाचे दुर्लक्ष
मनमानी पद्धतीने हा कारभार सुरू असला तरी परिवहन विभागाचे त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. परिवहन विभागाचे अधिकारी ‘तक्रार आली तर कारवाई करू...’ या भूमिकेत असून अशा प्रकारांत तक्रारच समोर येत नाही.
त्यामुळे परिवहन विभागाचे आणि पर्यायाने प्रवासी वाहतुकदारांचे फावते. हा प्रकार सर्रास सुरू असताना परिवहन विभाग तपासणी, चौकशीची साधी तसदीही घेतली जात नसल्याने प्रवाशांची सर्रास लूट अशीच सुरु असते.
ऑनलाइन बुकिंग फुल्ल
बहुतांश सर्वच ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या ७ ते १० नोव्हेंबरपर्यंतच्या बसेसची बुकिंग फुल्ल झाल्या आहे. परिणामी एंजटमार्फत मिळेल त्यादरात प्रवाशांना तिकीट खरेदी करावे लागत आहे. पुण्यात शिक्षण व नोकरीस असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवाळीच्या वेळेस प्रचंड हाल आणि पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी असून यावर तत्काळ कारवाईची मागणी आता जोर धरु लागली आहे.
तक्रार करणार कुणाकडे?
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असून त्यांचा संपर्क नंबर ‘नॉट रिचेबल’ असल्याने पुणे-जळगाव प्रवासादरम्यान एका शासकीय कर्मचाऱ्याचीच तक्रार असल्याने त्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या लॅण्डलाइन नंबरवर संपर्क केला.
मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्याने लगेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा नंबर मिळवला तर, तो देखील बंद असल्याने तक्रार करू शकलो नाही असे त्यांनी सांगितले.
अशी आहे आकडेवारी
- जळगाव-पुणे अंतर : ४६१ कि.मी.
- नियमित भाडे : ७५० ते ९००
- महामंडळ शिवशाही बस भाडे : ९०५
- २६ ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस (१ ते ५ वाहने)
- पुण्यासाठी दररोज बसफेऱ्या : किमान ८०
- दिवाळीत प्रवास भाडे : २४०० ते २८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.