Jalgaon News : देवघरातील विविध धातूच्या मूर्त्या, ज्वेलरी, नाणी, तसेच छापे यांना आकार देण्यासाठी साचे (डाय) आवश्यक असतात. हे साचे (डाय मेकिंग) बनविण्याचा व्यवसाय काही दशकांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर विस्तारला होता. शहरातील जवळपास दीडशे कारागीर या व्यवसायावर अवलंबून होते. येथील साचांना स्थानिक बाजारपेठेसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. भुईकोट किल्ल्यामुळे ऐतिहासिक ओळख असलेले पारोळा शहर डाय मेकिंग व्यवसायामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपास आले होते. (jalgaon seventh generation of Jade family struggles to keep art of mold making alive marathi news)
परंतु कालानुरूप बदलत्या तंत्रज्ञानामुळे हा व्यवसायच ठप्प झाला असून, ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. परंतु ही कला जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जडे बंधू धडपड करीत आहेत. जडे कुटुंब सात पिढ्यांपासून विविध प्रकारच्या डायी तयार करीत आहे. त्या डायींचा वापर इतर कारागीर करीत असल्यामुळे त्यांना या डायींमुळे रोजगार मिळाला असल्याचे सोमनाथ जडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
मागील ५० ते ६० वर्षांपूर्वी पारोळा शहरात तब्बल १५० कारागीर या साचे (डायी) तयार करण्याचे काम करीत होते. मात्र हळूहळू अष्टपैलू कारागीर व कलाकुसर लुप्त पावत असल्यामुळे सद्यस्थितीत शहरात सोमनाथ जडे व छोटू जडे ही दोन भावंडे व त्यांची मुले हे कलाकुसरीचे काम करीत आहेत.
दरम्यान, ही कला वडिलोपार्जित असून, प्रत्येक मूर्तीला ‘डायी’च्या माध्यमातून आकार दिला जात असल्यामुळे पूर्णपणे हे काम डोळ्यांचे व बैठे असल्यामुळे बरीच मंडळी या कामाकडे पाठ फिरवीत असून, ही कला लुप्त होत असल्याची खंत सोमनाथ जडे यांनी बोलून दाखविली. (latest marathi news)
..अशी तयार होते मूर्ती
मधमाशीच्या मेणाने प्रारंभी मॉडेल तयार केले जाते. तदनंतर मातीचा लेप चढवून चांदी, सोने किंवा पितळ यांना वितळवून त्या मॉडेलमध्ये ओतले जाते. त्यानंतर त्याला बारीक कोरीव काम करीत आकार दिला जातो. व्यवस्थित फिनिशिंग केल्यानंतर ती मूर्ती तयार होत असते. निगेटिव्ह डाय तयार करण्यासाठी लोखंडी किंवा कांस्य धातूच्या प्लेटवर कोरीव काम करून ती निगेटिव्ह डाय तयार होते. सोने, चांदीचा पत्रा ठेवून मूर्ती तयार होते. तसेच इतर दागिने तयार होतात. तसेच देवघरात ठेवल्या जाणाऱ्या मूर्त्या किंवा विविध ज्वेलरी, डायमंड मेकर तयार होत असतात.
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान
गेल्या सात पिढ्यांपासून जडे कुटुंबीय डाय बनविण्याचे काम करीत आहेत. या डाय विकण्याचे काम सध्या जडे परिवार करीत आहे. दरम्यान, या कलाकुसरची दखल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी घेत असून, सोमनाथ जडे व त्यांचे बंधू छोटू जडे या दोघांनाही राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, हे काम कलाकुसरीचे व डोळे तेवत ठेवण्याचे असले तरी वडिलांनी दिलेला हा कलाकुसरीचा वारसा आपण आज देखील जिवंत ठेवला असून, त्यामुळे या कामात आपण समाधानी असल्याचे सोमनाथ जडे यांनी बोलताना सांगितले.
जडे नावाची कहाणी
दरम्यान, सोमनाथ जडे यांचे आडनाव खरोटे आहे. मात्र त्यांचे पूर्वज हे राजा- महाराजांचे हिरे, मुकुट जळविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्यांना जडे ही ओळख निर्माण झाल्यामुळे कालांतराने सर्वच परिवार हा आपले आडनाव जडे म्हणून लावू लागला.
दरम्यान, ही कला लुप्त होत असल्यामुळे या कलेला वाव द्यावा, यासाठी सोमनाथ जडे व छोटू जडे यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून या कलेला वाव द्यावा, अशी विनंती देखील केली होती. त्या पार्श्वभूमीवर श्री. जडे यांनी शहरासह तालुक्यातील आठ ते नऊ कारागिरांना ही कला आत्मसात करण्याची शिकवण दिली.
''डाय तयार करणे ही कला लुप्त होऊ नये, यासाठी शासनाने कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा हा कोर्स ठेवावा, तसेच ही कला आजच्या नव्या पिढीला तिची ओळख निर्माण व्हावी म्हणून ही कला अध्ययनात वापरावी, अशी अपेक्षा आहे.''- सोमनाथ जडे, पारोळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.