ॲड बाळकृष्ण पाटील : सकाळ वृत्तसेवा
Jalgaon Pre-Monsoon : ऑक्टोबर महिन्यापासून चराईसाठी पश्चिम खानदेशातून (धुळे,नंदुरबार ) पूर्व खानदेशात आलेल्या हजारो मेंढ्या मृगाचा पाऊस पडू लागल्याने आता गावाकडे परतू लागल्या आहेत. त्यामुळे अमळनेर ,शिरपूर, चोपडा, एरंडोल, धरणगाव, धुळे, चाळीसगाव आदी मार्गांवर मेंढ्यांचे कडप रस्त्याच्या बाजूने चालताना दिसून येत आहेत. (Shepherds on their way back after arrival of rainy season )
साधारणपणे दिवाळी संपल्यावर पश्चिम खानदेशातील वाघापूर, तामथरे, कढरे ,छडवेल,लामकानी, निमडाळे, मेहरगाव, पिंपळनेर, दुसाने, फोफादे,कर्ले , परसोळे, बोरीस, नकुंभे, बुरझळ, निजामपूर, जैताने, खोरी टिटाणे,इंधवे,बळसाणे आदी गावातून ठेलारी बांधव मेंढ्या घेऊन पूर्व खानदेशातील चोपडा, यावल, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव आदी भागात दरवर्षी येतात.
मृगाच्या आगमनाने संकेत
या तालुक्यातील गावांमध्ये असलेले माळरान,गावठाण ,जंगल चराईसाठी पीक संस्थेत करार करून ठरलेल्या रकमेवर घेतात. त्या जंगलातील पिकांची काढणी होताच खाली झालेले क्षेत्रात मेंढ्या चारतात. तेथील नाल्या खोल्यातील चराईवर जून महिना येईपर्यंत मेंढ्या राहतात. त्या बदल्यात त्याच शिवारात एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात ठराविक रकमेवर मेंढ्या बसवून मिळणाऱ्या एकूण रकमेतून पीक संस्थेत ठरलेली रक्कम अदा करतात. (latest marathi news)
ज्या शेतात मेंढ्या थांबलेल्या असतात त्या भागाला त्या वस्तीला 'वाडा 'म्हणतात. याच वाड्यावर आठ नऊ महिन्यासाठी लग्नकार्य ,शेंडी, उत्तरकार्य, दशक्रिया ,मरण आणि तोरण ची कार्ये उरकली जातात. ठरलेल्या जंगलात त्या गावाच्या शिवारात असेपर्यंत मेंढ्या चारुन दररोज त्याच भागात मेंढ्या बसवण्याचा हा दिनक्रम आठ महिने सुरूच असतो.
साधारणपणे जून महिना सुरू होताच बऱ्याच भागात रोहिणी आणि मृग नक्षत्राचा पाउस सुरु होईपर्यत वास्तव्याला असतात. पाऊस पडल्यानंतर रस्ता, माळरान, गावठाण सोडल्यास पेरणी योग्य जमिनीत मेंढ्या उतरवणे शक्य होत नाही, त्यामुळे ठेलारी बांधव दोन-तीन दिवसाचा टप्प्याचा प्रवास करत गावी परततात.
दरवर्षीचा सुरू असलेला हा मेंढ्या चराईचा व्यवसाय ते अनेक वर्ष करीत आले आहेत. त्यामुळे त्या त्या गावात त्यांच्या ओळखी पाळखी ही झाल्या असून मेंढ्यांची गुजराण होत असल्याने हा राबता गेले अनेक वर्ष सुरू आहे. मात्र बऱ्याचदा वीज पडणे, अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत हे ठेलारी मेंढ्या वाचवतात हे विशेष !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.