चाळीसगाव : दुष्काळी अनुदानाच्या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी (ता. २१) आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातून ‘आंदोलन करणारे माजी खासदार-आमदार आहेत लाखाच्या अनुदानाचे धनी’ या शीर्षकाखाली मेसेज व्हायरल करून लाखोंची पेन्शन घेणारे माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख या दोघांनी तब्बल ९८ हजार ६०० रुपये दुष्काळी अनुदान घेतल्याची माहिती मेसेजमध्ये नमूद केली आहे. (Jalgaon Strong criticism on movement of former MLA MPs)
आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे, की तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झालेले नाही, ते जमा करावे, असा आरोप करीत शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. २१) माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे.
यात या वर्षी दुष्काळी घोषित असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, ते तत्काळ देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र, अशी मागणी करणारे माजी खासदार व माजी आमदारांनीच लाखोंचे अनुदान आपल्या खात्यात पाडून घेतल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील आधी आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून लाखोंची पेन्शन मिळते. मात्र त्यांनी आपली पत्नी संपदा पाटील यांच्या नावाने ४७ हजार ६०० रुपये दुष्काळी अनुदान घेतले आहे. तर माजी आमदार राजीव देशमुख यांनाही पेन्शन सुरू आहे. (latest marathi news)
त्यांनीही त्यांच्या तळेगाव शिवारातील जमिनीचे ५१ हजार रुपये दुष्काळी अनुदान मिळविले आहे. एकीकडे लाखोंची पेन्शन व कोट्यवधींची संपत्ती असताना शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान घेणे व दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणे, असा दुटप्पीपणा उघड झाल्यामुळे ऐन आंदोलनाच्या आधी हे माजी खासदार-आमदार तोंडघशी पडले आहेत.
वास्तविक शासनाचे कुठलेही अनुदान घेणे आता ऐच्छिक आहे. लाभार्थ्यांनी नाकारलेले अनुदान गोरगरिबांसाठीच्या दुसऱ्या योजनांसाठी वापरले जाते. या दोन्ही माजी लोकप्रतिनिधींना हे दुष्काळी अनुदान नाकारताही आले असते. मात्र, त्यांनी स्वतःहून महसूल प्रशासनाला बँक खाते क्रमांक देऊन त्यानंतर ‘केवायसी प्रोसेस’ करून हे अनुदान आपल्या पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे उद्या त्यांनी आम्हाला हे अनुदान शासनाने न माहीत होता खात्यात टाकले, असे सांगून अंग देखील झटकता येणार नसल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
"संस्थेचे भूखंड हडप करून किंवा गौण खनिजांच्या माध्यमातून चोरी करून याच्या त्याच्या नावाने ठेके घेऊन सरकारला लुटण्यापेक्षा शेतकरी म्हणून जो आपला हक्क आहे, तो आपण घेतलेला आहे. ज्याला शेतीची जाण आहे, तोच हे जाणू शकतो. हजारो कोटींमध्ये खेळणाऱ्यांना शेतकऱ्याचे दुःख तरी कसे कळणार? आम्हाला आमचे अनुदान मिळाले म्हणून आम्ही घरी बसणारे नाही, तर गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही आंदोलन करीत आहोत."
- उन्मेष पाटील, माजी खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.