Jalgaon Road Accident  esakal
जळगाव

Jalgaon Road Accident : जळगावातून जातात मृत्यूचे महामार्ग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्या‍त रस्ते अपघातात वर्षाला पाचशेच्यावर निरपराध नागरिकांचा नाहक बळी जात आहे. अतिवेगवान वाहने आणि मानवनिर्मित चुकांमुळे मृत्यूचा आकडा दर वर्षी वाढतच आहे. अपघाती मृत्यूमध्ये देशात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रात जळगाव अव्वलस्थान पटकावत असतानाही लोकप्रतिनिधींचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले प्रकर्षाने जाणवते. सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे ॲथॉरिटी (न्हाई) आणि पालिका-महापालिका स्थानिक प्रशासनास या मृत्यूला जबाबदार का धरू नये, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जळगाव जिल्ह्या‍तून जाणारे विविध राज्य महामार्ग, एशियन महामार्ग, गाव-तालुक्यांतर्गत मुख्य रस्त्यांवर वर्षभरातून चक्क पाचशेपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमावावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे मानवनिर्मित चुकांमुळे घडणाऱ्या या अपघातांमध्ये निरपराध नागरिकांचा सर्वाधिक बळी जातो. मृत्यू झालेल्या वाहनधारक-प्रवाशांच्या संख्येत सर्वाधिक मृत्यू तरुण आणि कुटुंबाचा कर्ता पुरुष असल्याच्या घटना अधिक आहेत.(Jalgaon tops in road accident state jalgaon news)

जबाबदार कोण?

मुक्ताईनगर तालुक्यातून एशियन महामार्ग क्रमांक ४६ जिल्ह्यात शिरतो. वरणगाव, भुसावळ, नशिराबाद, जळगाव, पाळधी, एरंडोल, पारोळा अशा तब्बल १२० किलोमीटरच्या अंतरात बहुतांश ठिकाणी गाव आणि शहरातूनच हा महामार्ग जातो, तर जळगाव ते औरंगाबाद-बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गच नाही तर गाव तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर दररोज दोन मृत्यू घडत आहेत. परिणामी स्थानिक पालिका-महापालिकेच्या कर्तव्यानुसार या मार्गाला कुठेही अडथळे येणार नाहीत व प्रकाशयोजना योग्य आणि पुरेशी असेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. पण कुठल्याच गाव-तालुक्यात तर सोडा जळगाव महापालिकेलाही याची जाणीव नाही. ग्रामस्थ-नागरिकांना मारण्यासाठीच तर यंत्रणा काम करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.

मृत्यूची आंधळी कोशिंबीर

एशियन महामार्ग शहरातून जात असताना महामार्गावर सूर्यास्तानंतर गडद अंधार असतो. महापालिकेची जबाबदारी असताना नागपूर-मुंबई महामार्गावरही पथदीप कार्यरत नाहीत आणि जळगाव-औरंगाबाद महामार्गावरही अंधाराचे साम्राज्य आहे. वाहनधारकांना खासकरून दुचाकीस्वारांना अक्षरशः जिवावर उदार होऊन वाहन चालविण्याची वेळ आली आहे. ट्रक, कंटेनर यांसारख्या लांबपल्ल्याच्या वाहनधारकांना शहर-गाव, वस्ती कुठेय हेच कळत नाही. प्रत्येक चौकात आणि शहरातून महामार्गाला येणाऱ्या रस्त्या (टी-जंक्शन)वर हायमास्ट लॅम्प असणे अपेक्षित असताना चौकही अंधारातच आहेत.

जळगाव-औरंगाबाद रस्ताच चुकीचा

जळगाव ते औरंगाबाद या रस्त्याच्या निर्मितीसाठी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दोन-दोन वेळेस उद्‍घाटन करण्यात आले, तरी पाच वर्षे उलटूनही हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. मुळात हा रस्ता संपूर्णतः चुकीचा बांधलेला असून, डबल रस्ता करताना रस्त्याच्या दुतर्फा किमान तीन ते पाच फुटांचे रोडमार्जिन असणे अपेक्षित असताना कट टू कट काँक्रिट रस्ता तयार झाला आहे. दुचाकीस्वार, लहान वाहनांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच या मार्गावर नाही. ओव्हरटेक करताना सर्वाधिक अपघात सदोष रस्त्यांमुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रस्ता सुरक्षा समितीच निद्रिस्त

प्रत्येक जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती कार्यान्वित असते, जिल्‍हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या दर दोन महिन्यांत बैठका घेतल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), महापालिका, नॅशनल हायवे ॲथॉरिटी (न्हाई), पोलिस दल, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त बैठका बोलावून वाढत्या अपघातांच्या कारणांचा ऊहापोह करून त्यावर योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातात. दोन वर्षे कोविड काळात गेली. त्यानंतर तत्कालीन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कार्यकाळात काही बैठका झाल्या, मात्र हव्या तशा सुधारणा अद्यापही झालेल्या नाहीत.

ब्लॅकस्पॉट

अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉटेड ठिकाणांमध्ये एशियन महामार्गावर वरणगावचे वळण, नहाटा चौक भुसावळ, तरसोद, कालिंकामाता मंदिर चौकाचे वळण, अजिंठा चौक ते इच्छादेवी, खोटेनगर ते विद्यापीठापर्यंतचा रस्ता, पाळधी बायपास, एकलग्न, पारोळा वळणाचा समावेश आहे. जळगाव-औरंगाबाद राज्य महामार्गावर चिंचोली वळण, उमाळा-गाडेगाव घाटरस्ता, नेरी वळणावर (वन्यप्राण्यांशी धडक), पहूर, फर्दापूर वळण आदी अपघातप्रवण ठिकाणे असून, या ठिकाणांवर कुठे साइन बोर्ड नाही, आहे तर दिसत नाही. निर्धारित उंचीपेक्षा जास्तीचे स्पीडब्रेकर, महामार्गावरील खड्डे, साइडपट्ट्या नसणे, महामार्गांच्या नियमित डागडुजीची कामेच होत नसल्याने ही ठिकाणे अपघातप्रवण म्हणून अंकित झाली आहेत.

जळगाव आकडे बोलतात...

वर्ष २०२० - एकूण अपघात ः ७५२, मृत्यू ४७१, कायमस्वरूपी जायबंदी जखमी ५१४

वर्ष २०२१ - एकूण अपघात ः ७८५, मृत्यू ५२५, कायमस्वरूपी जायबंदी, जखमी ३९१

वर्ष २०११ (जानेवारी-सप्टेंबर) - एकूण अपघात ः ६६६, मृत्यू ४०८, कायमस्वरूपी जायबंदी जखमी ५१४

अपघात थांबविण्याचे प्रयत्न

"जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अपघातस्थळांचे परीक्षण वेळोवेळी करण्यात येते. अपघातग्रस्त वाहनांची तपासणी करून तांत्रिक माहितीही आम्ही संकलित करतो. त्यासोबतच अपघाताला कारणीभूत इतर घटकांची नोंद घेतली जाते. ब्लॅकस्पॉट असतील किंवा महामार्गावर अर्ध्यापर्यंत वाढलेली अतिक्रमणे असतील त्याचे सचित्र अहवाल रस्ता सुरक्षा समितीमध्ये सादर केले जातात. तत्कालीन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नियमित झालेल्या बैठकांमध्ये संबंधित विभागांसह आरटीओ विभागालादेखील सूचना करण्यात येतात. त्यांचे तंतोतंत पालन करण्यात येते."

-श्याम लोही,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT