uddhav thackeray and sharad pawar esakal
जळगाव

Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या हक्काच्या जागांवर ‘उबाठा’च्या दाव्याने वाद! जिल्ह्यातील तीन जागांवरुन तिढा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागवाटपाची चर्चा अद्याप प्राथमिकस्तरावर नसतानाही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हक्काच्या समजत असलेल्या जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दावा केल्यामुळे दोघा पक्षांमध्ये वाद उद्‌भवण्याची शक्यता आहे. अशा तीन-चार जागांमुळे ‘मविआ’चे जागावाटप वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Controversy with claim of UBT on rightful seats of NCP)

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. नोव्हेंबरअखेर राज्यात नवे सरकार स्थापन होईल, तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सूचना केल्या आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

मविआत विविध जागांवरुन रस्सीखेच

महायुतीतील तीन घटकपक्षांप्रमाणे महाविकास आघाडीतही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्ष अशा तीन घटक पक्षांचा समावेश आहे. स्वाभाविकत: या तीनही पक्षांत विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांमधून ‘मविआ’तील या तीनही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी किती जागा येतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापैकी काही जागांसाठी दोन, तर काही जागांवर तीनही पक्षांत रस्सीखेच दिसून येते.

राष्ट्रवादी- ‘उबाठा’त स्पर्धा तीव्र

जिल्ह्यातील मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर, चाळीसगाव, एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ व जामनेर अशा सात जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे. यापैकी मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर व जळगाव ग्रामीण या मतदारसंघातून तर राष्ट्रवादीने उमेदवारही निश्‍चित करून टाकल्याचे मानले जात आहे.

पैकी ‘उबाठा’नेही जळगाव ग्रामीण, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या जागांसाठी आग्रह धरला असून, कोणत्याही स्थितीत या जागांवर तडजोड करायची नाही, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जातेय. या चार जागांच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी संबंधित इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देऊन टाकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार निश्‍चित

अकरा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जळगाव ग्रामीणमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर, एरंडोल-पारोळ्यातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, मुक्ताईनगरमधून पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, जामनेरमधून आताच पक्षात प्रवेश केलेले दिलीप खोडपे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. शिवाय, चाळीसगावमधून माजी आमदार तथा पवारांचे निकटवर्तीय राजीव देशमुख यांच्यासाठी उमेदवारीचा आग्रह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी यापैकी कुठल्याही जागेवर तडजोड करायला तयार नाही, असे चित्र आहे. (latest marathi news)

कॉंग्रेसला किती जागा सुटणार?

जिल्ह्यातील ११ जागांच्या समीकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक जागा येतील, कॉंग्रेसला दुय्यम स्थान मिळेल, असे सांगितले जाते. अकरापैकी कॉंग्रेसच्या वाट्याला एखाद-दुसरी जागा येण्याची शक्यता आहे, किंबहुना या दोन्ही पक्षांचा तसाच प्रयत्न आहे.

सध्या रावेर येथे कॉंग्रेसचे एकमेव आमदार आहेत, त्यामुळे ही जागा कॉंग्रेस हमखास लढवेल. सोबत आणखी एखादी, शक्यतो अमळनेरची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. परंतु, त्या जागेसाठीही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अर्धाडझन इच्छुक आहेत, त्यांनी त्यासाठी आग्रह धरला आहे.

कॉंग्रेसकडे एक, दोघांकडे काहीच नाही

ताब्यातील विद्यमान जागांच्या निकषासह मतदारसंघातील संघटनात्मक मजबुतीचा, पक्षाच्या मागील निवडणुकीतील कामगिरीचा निकष जागा वाटपात महत्त्वाचा मानला जात आहे. यास्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उबाठा त्यांची ताकद असलेल्या मतदारसंघांचा हवाला देत आहे.

मात्र, या दोन्ही पक्षांकडे विद्यमान स्थितीत एकही आमदार नाही, कॉंग्रेसकडे तरी रावेरची जागा आहे. त्यामुळे तूर्तास विधानसभेच्यादृष्टीने विचार केल्यास राष्ट्रवादी व ‘उबाठा’पेक्षा कॉंग्रेसची ताकद कागदावर जास्त वाटते. त्यामुळे कॉंग्रेस केवळ एक-दोन नव्हे तर आणखी काही जागांसाठी आग्रही राहील, हे निश्‍चित.

"चाळीसगाव, एरंडोल-पारोळा, जळगाव ग्रामीण या आमच्या हक्काच्या व आमची ताकद असलेल्या जागा आहेत. याठिकाणी आमचे उमेदवार गेल्या पाच वर्षांपासून काम करीत आहेत. त्यामुळे या जागा आमच्याच पक्षाकडे राहाव्यात, असा आमचा आग्रह व मागणी कायम आहे."

- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.

"चाळीसगाव, एरंडोलसह जळगाव ग्रामीण व पाचोरा या जागांवर आमच्या पक्षाकडे विजयाचे मेरिट असणारे उमेदवार आहेत. त्यांचा मतदारसंघात संपर्कही कधीपासूनच सुरू आहे. गेल्या वेळी यापैकी जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा या तीनही जागा शिवसेनेनेच लढविल्या होत्या. त्यामुळे या जागांवर आमचा दावा प्रबळ व रास्त आहे."

- विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT