Jalgaon Water Shortage : यावर्षी दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. सुंदरनगर तांडा (ता. चाळीसगाव) येथील चारही तांड्यावर सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांआड केवळ पंधराच मिनिटे पाणी मिळत असल्याने सध्याच्या रणरणत्या उन्हात सुंदरनगरवासीयांना पाण्यासाठी पायपीट होत आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून येथील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे.(Jalgaon Water Shortage 15 Water is available only once day in sundar nagar marathi news)
सुंदरनगर तांडा (ता. चाळीसगाव) यासह तीन ताडे असून, एकूण चार तांडे आहेत. या तांड्याची लोकसंख्या साडेतीन हजाराच्या आसपास आहे. या तांड्याला ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करणारे ३२३ नळ कनेक्शन असल्याची माहिती ग्रांमपचायत प्रशासनाने दिली. उन्हाळ्यात सुरवातीलाच तालुक्यातील विहिरींची पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामांत गुंतल्याने पाणी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विहीरीत पाणी नाही
सुंदरनगर तांड्याला पाणीपुरवठा करणारी विहीर गाव तलावाच्या जवळ आहे. सध्या या तलावातच पाणी नसल्याने विहिरीचे पाणी देखील कमी झाले आहे. यामुळे दहाबारा दिवसात विहिरीत पाणी जमा झाल्यावर ते पाणी गावातील पाण्याच्या टाकीत विद्युत पंपाच्या साहाय्याने टाकले जाते. यानंतर टाकीतून गावाला पाणी सोडले जाते. केवळ पंधरा मिनिटे पाणी पंधरा दिवसांनी मिळते. पाण्याची ग्रामस्थांना वाट पाहावी लागत असते. महिलांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पाणी शोधण्याच जातो दिवस
बायडाबाई ठाकरे : आमच्याकडे पाण्याची गंभीर स्थिती आहे. ज्या विहिरींना थोडेफार पाणी आहे, ते विहिरवाले भरू देत नाही. साधारण आमचा अर्धा दिवस हा पाणी शोधण्यात जात असतो. त्यामुळे रोजंदारीवर काम मिळाले की, अर्धे चित्त कामावर व अर्धे पाण्याकडे असते. त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा. (latest marathi news)
शासनाने टँकर सुरू करावे
पिनाबाई राठोड : पाणी आणण्यासाठी एक किलोमीटरवर पायपीट करावी लागते. आधीच काही कामधंदा मिळत नाही. कोणी कामाला लावत नाही. शासनाने टँकर सुरू करावे. इतर शेतात पाणी घ्यायला गेलो, की ते शेतकरी म्हणतात आमची बागायत शेती सोडून तुम्हाला पाणी देऊ का? शासनाने टँकर सुरू केले तर आमची रोजंदारी देखील बुडणार नाही.
टँकर मिळाले तर विहिर नाही
नवनाथ राठोड (ग्रामपंचायत सदस्य) : आमच्या समाजातील सर्वांत मोठा सण होळीचा असतो. पाणी नसल्याने हा सण कुठे गेला ते देखील कळाले नाही. बऱ्याच दिवसापासून विहीर शोधत आहोत. विहीर मिळते तर टँकर मिळत नाही व टँकर मिळाले तर विहीर नाही. या समस्यांना आम्ही वैतागून गेलो आहोत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
आजाराला आमंत्रण...
सुंदरनगर तांड्याला लागून तीन तांडे आहेत. पाण्याची टंचाई पाहता ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ज्या विहिरींचे दूषित पाणी आहे, अशा विहिरींचे पाणी त्यांना प्यावे लागत आहे. पाण्यामुळे लहान बालके, महिला- पुरुष नेहमी आजारी पडत असतात. सर्दी, खोकला, ताप, हगवण अशा आजारांना नेहमी आमंत्रण द्यावे लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गावात दूषित पाण्यामुळे डायरियासारखी साथ पसरण्याची भीती व्यक्त होत असल्याने येथे प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करुन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.