Jalgaon News : असोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न असल्याने पाण्यात गेलेल्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलाची सुटका करीत असताना, एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) घडली. सुकलाल लालचंद माळी (वय ६३, रा. असोदा, ता. जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. स्वतःचा जीव जात असताना, शेतकऱ्याने आपल्या सर्जा-राजाचे प्राण वाचवले. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे असोदासह पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. ( While rescuing bull farmer drowned and died )
असोदा गावात सुकलाल लालचंद माळी पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासोबत वास्तव्याला होते. कुटुंबातील सर्वच मंडळी शेतात त्यांना मदतीला राहायची. मंगळवारी (ता. ११) रात्री जळगावसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाळा सुरू झाल्याने शेतीकामे वाढली असून. नेहमीप्रमाणे सुकलाल माळी सकाळीच बैलगाडी जोतून मन्यारखेडा रस्त्यावरील त्यांच्या शेताकडे निघाले होते.
अशी घडली घटना
आसोदा-मन्यारखेडा रस्त्यावर नव्यानेच रेल्वेचा बोगदा झाला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्यात पाणी साचले होते. नेहमीचा रस्ता अन् थांबवलेले पाणी असल्याने आपण निघून जावू, असा समज होऊन पलीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्यातून टाकली. सुरवातीला कमी पाणी होते. त्यांना वाटले सहज बैलगाडीही निघून जाईल.
मात्र, अचानक बैलगाडी खोलवर पाण्यात गेली. बैलगाडी बुडाल्यावर बैलांचा जीव जाऊ नये, म्हणून त्याही परिस्थितीत सुकलाल माळी यांनी बैलांचा जीव वाचविण्यासाठी जोत सोडत गाड्यापासून बैल वेगळे केले. मात्र, त्यांना स्वतःला पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
‘ते’ डोळ्यानं दिसले पण!
सुकलाल दादा बैलगाडी बोगद्यात घालताना दुरुन दिसले. नेहमीचा रस्ता असल्याने निघून जातील, म्हणून आम्हीही लक्ष दिले नाही, असे बघ्यांनी सांगितले. थोड्या वेळात बैले सैरावैरा धावत सुटल्यावर शेतात काम करीत असलेले ग्रामस्थ मदतीला धावले. बराच वेळ पाण्यात काही दिसत नसल्याने पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात शोध घेतल्यावर सुकलाल माळी हाती लागले. दोराच्या सहाय्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांच्या टीमने तपासणीअंती त्यांना मृत घोषित करताच कुटुंबासह नातेवाइकांनी आक्रोश केला.
‘साठी’चा जवान शेतकरी गेला
आयुष्य मातीत खपले. अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवल्याने संयमित व्यक्ती म्हणून सुकलाल माळी परिचित होते. सळसळीत बांधा अन् शेतीकामांत विशीतील तरुणांला लाजवेल इतका कामाचा उरक होता. कुटुंबप्रमुख असल्याने पत्नी चमेलीबाई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार त्यांच्या आधारावरच चालत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे माळी कुटुंबीयाचे रडून रडून बेहाल झाले असून ग्रामस्थही सुन्न झाले आहेत. याबाबत तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.