प्रभू श्रीराम रथोत्सव हा 151 वर्षांचा लोकोत्सव
दीपोत्सव संपलेला, तरी त्यास पूर्णत्व आलेले नसते, कारण घरोघरी दीपोत्सवाला आलेल्या लेकी-सुना, पाहुणे, बच्चे कंपनी या सर्वांनाच प्रतीक्षा असते, ती म्हणजे, जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम रथोत्सवाची. प्रभू श्रीराम रथोत्सव हा १५१ वर्षांचा लोकोत्सव आहे यंदा. कान्हदेश अर्थात, जळगावच्या रथोत्सव कान्हदेशातील वारकरी संप्रदायाचे थोर व जलग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे मूळ सत्पुरुष श्री सद्गुरू अप्पा महाराजांनी हिंदू धर्मातील अठरा पगड जाती-जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सवास प्रारंभ केला. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून श्रीराम वहनोत्सव होत असतो.
जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणी-मात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबर प्राणी-मात्रांचे ऋण मानते. त्याचे प्रतीक म्हणजे, हा वहनोत्सव मानला जात आहे. त्यात घोडा, हत्ती, वाघ, सिंह, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी दहा दिवस वहने निघतात. (kartiki ekadashi shree ram rathotsav history and information jalgaon news)
कार्तिक प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिक शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन, गोपाळकाल्याचे कीर्तन होऊन अन्नसंतर्पणाने उत्सवाची होते. यामुळे जळगावनगरीत पंधरा दिवसांची दिवाळी व आनंदोत्सव साजरा होत असतो.
अशी सुरू झाली परंपरा..
श्रीराम मंदिर संस्थानचे प्रथम गादीपती मूळ सत्पुरुष सद्गुरू श्री आप्पा महाराज हे मेहरूण तलावाजवळ वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले असताना, त्यांना त्या अवस्थेत वैशाख वद्य दशमी श्री संत मुक्ताई तिरोभूत सोहळा दिनी साक्षात आदिशक्ती श्री ‘संत मुक्ताबाईं’चा साक्षात्कार झाला. त्यांनी दृष्टांत देऊन आषाढीस पंढरीची पायी वारी व कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीस वहन व श्रीराम रथोत्सवाची प्रेरणा श्री आप्पा महाराजांना दिली. त्या वर्षापासून म्हणजे शके १७९४ इसवी सन १८७२ पासून आजतागायत १५१ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा श्रीराम रथोत्सव निरंतर सुरू आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुनश्च मंदिरात नेले जातात. कार्तिक शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रास क्रीडा असते. गोप-गोपिकांच्या मूर्ती वहनावर सजविल्या जातात. वहनाला ठिकठिकाणी पानसुपारी असते. पानसुपारी म्हणजे यजमानपद.
त्या दिवशी देव आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात. त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. देवांच्या वतीने मंदिराचे विद्यमान गादीपती श्री महाराज तो सन्मान स्वीकारतात. भजन-भारूड होऊन पानसुपारीची सांगता होते. जळगावच्या रथोत्सवासाठी शहर व परिसरच नव्हे ; तर जिल्हाभर व महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून लोक दर्शनासाठी येतात व नवस बोलतात.
जळगावच्या दीपोत्सवानिमित्त आलेल्या माहेरवाशिणी रथोत्सवानंतर सासरी जातात. थोर परंपरा लाभलेला श्रीराम रथोत्सव १८७२ मध्ये सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात रथोत्सवाचे स्वरूप वेगळे होते. त्या काळात मातीच्या रस्त्यावरून रथ उत्साहाने ओढला जात होता. रात्री मशाल, पणत्या लावल्या जात होत्या. पूर्वी म्हणजे साधारण एकशे दहा वर्षांपूर्वी जुन्या गावात रथ फिरत असल्याने मार्गही लहान होता.
हिंदू- मुस्लीम एकोप्याचे दर्शन
श्रीराम रथोत्सवात हिंदू- मुस्लीम समाजबांधवांचे एकोप्याचे दर्शन
लाभते. कारण, श्रीराम रथ परिक्रमा करत असताना संत लालखाँ मियाँ यांच्या समाधीजवळ येतो व थोडा वेळ थांबतो. श्री संत आप्पा महाराज व लालखाँ मियाँ यांचा स्नेहभाव खूप जवळचा होता. तो खानदेशात परिचित आहे. संत लालखाँ मियाँ यांच्या समाधीवर रथोत्सवाचे सेवेकरीतर्फे पुष्पचादर अर्पण केली जात असते. मुस्लीम समाजबांधवांच्या वतीने रथोत्सवातील मान्यवरांचा सत्कार केला जातो. मुख्य म्हणजे श्रीराम रथावर पुष्प वर्षाव केला जात असतो.
रथाचा मार्ग...
श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हेवाडा, डॉ. आंबेडकरनगर, चौधरीवाडा, तेली चौक, राम मारुती पेठ, मंदिराच्या मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, शिवाजी रोड, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौकमार्गे सराफ बाजारातील श्री भवानी मंदिर, श्री मरीमाता मंदिर, भिलपुरामार्गे भिलपुरा चौक, दधिची चौक, बालाजी मंदिरामार्गे रात्री बाराला रथ चौकात परत येतो.
रामरायांची चैतन्यमय मूर्ती पालखीत विराजमान करून ‘रामनामा’च्या जयघोषात सनईच्या मंगल स्वरात श्रीराम मंदिराचे महाद्वारात येते. इथे श्री अप्पा महाराजांच्या वंशज सौ. सूनबाईंचे हस्ते रामरायांना औक्षण करून दीप ओवाळून रामराया पुनश्च गर्भगृहात सिंहासनावर विराजमान होतात. हे होत असताना, श्री संत निळोबा रायांचा
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।
घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ।
हा अभंग आणि
उभारीला हात जगी जाणविली ।
देव बैसले सिंहासनी । आल्या याचकाहो पुरे धणी ।
हा श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग होऊन आरती होते. उपस्थित सर्व रामभक्तांना प्रसाद व श्रीफळ संस्थांकडून विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांचे हस्ते दिला जातो. असा हा पंधरा दिवस चाललेला उत्सवाचा मुख्य व मोठ्या आनंदाचा प्रबोधिनी एकादशीचा अकरावा सुदिन मोठ्या थाटामाटात सादर संपन्न होतो. पुढील चार दिवसात रासक्रीडेचे वहन, तुळशी विवाह, फुलांचा महादेव आदी कार्यक्रम होऊन त्रिपुरारी पौर्णिमेस श्री संत सोपानदेवांचे जयंती दिनी श्री गोपाळकाल्याच्या कीर्तन व अन्न संतर्पणाने पंधरा दिवस चाललेल्या श्रीराम रथोत्सवाची सांगता होते. ती पुढील वर्षी रथ कधी येतो या श्रद्धायुक्त अंत:करण भावनेने...
रथोत्सवाशिवाय येथे दिवाळी संपत नाही आणि पाहुण्यांचा इथून पाय बाहेर पडत नाही. एवढे आकर्षण, महत्त्व, श्रद्धा रथोत्सवाबद्दल आहे. त्याचे कारण तसे आहे. अठरापगड जाती-जमातीमधील लोकांना एकत्र करून, त्यांना सोबत घेऊन काम करणे तसे म्हटले तर कठीणच. कारण प्रत्येकाची समज आणि क्षमताही वेगळी. त्यामुळे एखाद्या कामाचे आकलन ते कसे करतात, ते काम कसे पूर्णत्वास नेतात हे समजणे कठीण. मात्र या अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र ठेवण्याचं कसब श्री सद्गुरु अप्पा महाराज यांना साधले.
त्यामुळे त्यांनी या मंडळींच्या सहकार्याने आणि सहभागाने समाज एकीकरण आणि भगवत भक्तीच्या प्रसारासाठी १८७२ मध्ये कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला सुरू केलेला रथोत्सव आज १५१ व्या वर्षी त्याच श्रद्धेने, भक्तिभावाने, सर्वांच्या सहयोगाने अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. ही किमया कशाची आहे? एखादा उत्सव इतकी वर्षे असा कसा सुरू राहू शकतो? आपले स्थान, पद, प्रतिष्ठा विसरून समस्त लोक त्यात स्वेच्छेने सहभागी कसे होतात ? कुठल्याही जाती-पातीचे, धर्म आणि पंथाचे बंधन त्याला कसे आडवे येत नाही? या सर्वच एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे हा आता श्रीरामाचा रथोत्सव राहिलेला नाही तर तो सर्वांचाच उत्सव झाला आहे. तो लोकोत्सव बनलाय. सनई, चौघडे, तुतारी अन् ठेका धरायला लावणाऱ्या ढोल-ताशा, नगारे, झांज अशा वाद्यांच्या निनादात निघणारी श्रीराम रथाची मिरवणूक म्हणजे एक अनुपम सोहळा, डोळ्यांचे पारणे फिटावे असा उत्सव...
असा आहे रथ.. त्याची मजबुती
प्रभू श्रीरामाचा रथ हा जसा श्रद्धेचा विषय आहे, तसा कारागिरीचा आहे. सागवानी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या रथाची उंची ३५ ते ४० फूट आणि लांबी-रुंदी १५ बाय १५ फूट. चार चाके असलेल्या या रथाच्या प्रत्येक चाकाची जाडी एक फूट आहे. उंची ५ फूट, तर चाकाची गोलाई ७ ते ८ फूट आहे. रथावर तांब्याचा ३ फुटी एक मुख्य कळस, तर सहा इंचाचे २१ कळस लावण्यात येतात. रथाच्या पुढच्या बाजूस दोन पांढरे शुभ्र लाकडी अश्व, अर्जुनाची सुंदर मूर्ती. त्यांच्या शेजारी गरुड आणि हनुमंताची मूर्ती आकर्षकपणे सजवलेली असते.
रथोत्सवादरम्यान भाविक भक्तांना दर्शनासाठी रथ थांबविण्याकरिता मोगरीचा उपयोग केला जातो. रथाला मोगरी लावण्याचा मान विशिष्ट कुटुंबाकडे परंपरेने येतो. ही मोगरी म्हणजे अडीच ते तीन फूट लांबीचा आणि दीड पूर जाडी असलेला लाकडी ओंडका असतो. भाविक भक्त रथ ओढत असताना त्याला गती आलेली असते. त्यामुळे तो एकाएकी थांबविणे शक्य नसते. अशा वेळी प्रत्येक चाकाला चार ते पाच मोगऱ्या लावून रथ थांबविला जातो.
रथोत्सवाच्या दिवशी रथाला पुष्पमाला, विविध फुले, नारळाची तोरण आणि ध्वजांनी सुशोभित केले जाते. रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागतद्वार आणि आकर्षक रांगोळ्या काढलेल्या असतात. जळगावसह धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेश, गुजरातमधील भाविक दर्शनासाठी येतात.
युवक लाठ्या-काठ्यांचे प्रात्यक्षिक दाखवतात. काही मनोरे रचतात. आर्शीवाद देणारी सोंगे, सद्गुरू अप्पा महाराज यांची प्रतिमा असलेले ट्रॅक्टर, त्यात महिला आणि बाल भाविकांची झालेली गर्दी, संत मुक्ताई पालखी, भालदार, चोपदार, नजाकतीचे खेळ करणारे अश्व आदींमुळे या रथोत्सवाला सामाजिक जाणिवेचा स्पर्श लाभतो. सकाळी ‘सियावर रामचंद्र की जय’, अशा जयघोषांनी भारावलेल्या वातावरणात सद्गुरू आप्पा महाराज यांचे पाचवे वंशज आणि श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते रथातील उत्सवमूर्तीची आरती होऊन रथ मार्गस्थ होतो. पुढे परिसरातील विविध भागात फिरून रात्री हा रथ मूळस्थानी परत येतो.
जातीय सलोख्याचे दर्शन
आप्पा महाराजांचे जिवलग मित्र असलेल्या लालशाबाबा यांच्या दर्ग्याजवळ रथ थांबविला जातो. इथे श्रीराम मंदिर संस्थानतर्फे बाबांच्या दर्गावर चादर अर्पण करण्यात येते. दर्ग्यातर्फे या रथोत्सवावर पुष्पवृष्टी होते. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या या दोन महान संत पुरुषांची एकमेकांप्रति असलेली ही कृतज्ञता सद्गुरू अप्पा महाराज यांचे पाचवे वंशज आणि श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते पूजा होऊन मूर्ती रथात ठेवल्या जातात आणि नंतर रथोत्सवास प्रारंभ होतो.
रथोत्सवापूर्वी संस्थानतर्फे वहनोत्सव काढण्यात येतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत चालणारा हा वहनोत्सव म्हणजे पंचमहाभूतांची सजीव आणि निर्जीवांची तसेच निसर्गाची पूजा असते. विविध प्राणी, देवता, वस्तू यांचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता असते. आपण प्रभू श्रीरामांचा रथ ओढला की, प्रभू रामराया आपल्या प्रपंचाचा रथ या भवसागरातून पार करेल अशी भाविकांची श्रद्धा असते.
श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती
प्रथम - श्री संत सद्गुरू आप्पा महाराज (१८७२ ते १९१०)
द्वितीय - श्री सद्गुरू वासुदेव महाराज (१९१० ते १९३७)
तृतीय - श्री सद्गुरू केशव महाराज (१९३७ ते १९७५)
चतुर्थ - श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज (१९७५ ते २००२)
पाचवे- ह.भ.प. श्री मंगेश महाराज (विद्यमान)
दोनवेळा साधेपणाने रथोत्सव
माजी पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांचे निधन झाले होते. त्यावर्षी रथोत्सव निघाला नव्हता. कोरोना काळात जागेवरच रथाचे पूजन केले होते. अशा दोनवेळा साधेपणाने रथोत्सव साजरा केल्याची माहिती गादीपती मंगेश महाराज यांनी ‘सकाळ’ला दिली.
कर्ता, करविता तोच आहे..
उत्सव निर्विघ्नपणे पार कसा पडतो ? याविषयी मंगेश महाराज म्हणाले, की श्री रामचंद्राचा हा रथोत्सव आहे. अठरा पगड जातीतील समाजबांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. हे कार्य परमेश्वरी आहे. कर्ता आणि करविता तोच आहे. ४०० ते ५०० भाविकांचे सहकार्य रथोत्सवाला असते.
"श्रीराम मंदिर संस्थानचे मूळ सत्पुरुष सद्गुरू श्री आप्पा महाराजांनी दीडशे वर्षांपूर्वी हिंदू समाजातील अठरापगड जातींना एकत्र करून हा श्रीराम रथोत्सव सोहळा प्रारंभ केला आहे. समस्त जनतेने श्रीराम रथोत्सवात आपण सगळे सहभागी होऊन अखंड हरी भक्तीत रममाण होऊ या !" - ह.भ.प.मंगेश महाराज (अध्यक्ष, श्रीराम मंदिर संस्थान आणि विद्यमान गादीपती)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.