जळगाव

वाईट वृत्ती, लुटीची इच्छा अन् घोटाळ्याचा मार्ग

वाईट वृत्ती, लुटीची इच्छा अन् घोटाळ्याचा मार्ग

सचिन जोशी

where there is will there is a way.. मराठीतून ‘इच्छा तिथे मार्ग’ अशी ही सकारात्मक उक्ती. दुर्दैवाने बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधींचा गैरव्यवहार (Jalgaon bhr patsanstha fraud matter) करताना अगदी गडगंज संपत्ती असलेल्या बड्या हस्तींच्या पैसा लुटण्याच्या इच्छेने वाममार्गाची निवड केली. संचालक, कर्जदार आणि घोटाळ्यात आता अटक केलेल्या आरोपींची नावे, प्रोफाइल पाहिले तर ही आधीच कोट्यधीश असलेली मंडळी घोटाळ्यातील पैसा कुठे टाकणार, असा प्रश्‍न निर्माण व्हावा, इतके हे प्रकरण गंभीर, चिंताजनक. (jalgaon-bhr-credit-union-scam-matter)

नव्वद-दोन हजारच्या दशकात जळगाव जिल्ह्यात पतसंस्थांचे पेव फुटले. बघता बघता शेकडो पतसंस्था स्थापन झाल्या. संस्थापक संचालकांची समाजातील प्रतिष्ठा, वावर व तामझाम, लक्झरिअस फर्निचरसह कॉर्पोरेट लुकच्या कार्यालयांनी ठेवीदारांना भुरळ घातली. बँकांपेक्षा दोन पैसे जास्त मिळतील या लाभापेक्षेने सामान्य नोकरदार, विशेषत: निवृत्त शासकीय कर्मचारी या पतसंस्थांकडे वळला. आयुष्यभराची पुंजी त्यात जमा केली. पुढे कोटींनी जमलेली ही रक्कम संचालकांनी आपल्यातच कर्जाच्या रूपात खिरापतीसारखी वाटून घेतली अन्‌ पतसंस्थांचे ‘पर्व’ संपुष्टात आले.

बीएचआर पतसंस्था ही या मालिकेतील एक. एखाद्या खासगी कॉर्पोरेट बँकेलाही लाजवेल, असा या संस्थेचा राज्यभरात डोलारा. पण जेवढी व्याप्ती तेवढाच घोटाळाही मोठा केला या संस्थेच्या संचालकांनी. ‘कुंपणच शेत खातं...’ अशीही आपल्याकडे म्हण आहे. भाईचंद हिराचंद पतसंस्था या मल्टिस्टेट पतसंस्थेचे शेत मात्र इतके मोठे होते, की ते कुंपणाने म्हणजे संचालकांनी खाल्ल्यावरही राहिलेल्या पिकासाठी नेमलेल्या रखवालदाराने (अवसायक)समाजातील कथित प्रतिष्ठितांना सोबत घेऊन त्यावर ‘ताव’ मारल्याचा गंभीर प्रकार समोर आला.

बीएचआरमधील गैरव्यवहार प्रकरणात आधी तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापक, अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यभरात पन्नासवर अधिक गुन्हे दाखल झाले. त्यांना अटकही झाली आणि त्यासंबंधी खटले सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात अवसायक जितेंद्र कंडारेच्या नियुक्तीनंतर त्याने व्यावसायिक सुनील झंवरसारख्या मंडळींना हाताशी धरून केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती आधीपेक्षाही मोठी आहे.

गेल्या पाच वर्षांत कंडारे व मंडळीने कोट्यवधींच्या ठेवींची रक्कम सेटलमेंट करून देण्याचा ‘फंडा’ सुरू केला. त्यासाठी दलाल नेमले गेले. गुंतविलेल्या रकमेपैकी ‘जे मिळेल ते आपले’ मानून ठेवीदारांनी ३०-४० टक्क्यांत ठेवींची तडजोड केली. अक्षरश: ठेवीदारांच्या पावत्या ठराविक रकमांमध्ये विकत घेऊन नंतर त्याचे कर्जप्रकरणाशी ‘मॅचिंग’ करण्यात आले. गैरव्यवहाराचा हा प्रकार कमी होता की काय, दुसरीकडे संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल विकत घेऊन त्यावर श्रीमंतीचे इमले बांधले गेले.

बीएचआर पतसंस्थेत ज्यांच्या ठेवी आहेत, त्यांची नावे पाहिली तर या व्यक्ती किती सामान्य आहेत, हे लक्षात येईल. ठेवींवर दोन पैसे जास्त व्याज म्हणून मानवी स्वभावातून त्यांनी मोठ्या विश्‍वासाने आपल्या रकमा गुंतविल्या. दुसरीकडे संस्थेचे संचालक, कर्जदार आणि आता समोर आलेल्या संशयितांचे प्रोफाइल पाहिले तर हे लोक सामान्य ठेवीदारांच्या रकमा हडप करून आणखी किती श्रीमंत होणार आणि एवढा पैसा टाकणार तरी कुठे, असा प्रश्‍न पडावा. अर्थात, हा प्रश्‍न सामान्यांना पडतो, त्यांच्यासाठी या पैशाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. किंबहुना कितीही गडगंज संपत्ती असली तरी त्यांच्यासाठी कमीच, या वृत्तीची ही मंडळी. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील कारवाईचे स्वागत होत असले तरी त्यामुळे ज्यांच्या ठेवींची रक्कम असुरक्षित आहे, ती सुरक्षित होऊन त्यांना परत मिळेल का, हा प्रश्‍न कायम राहतो. आर्थिक गुन्ह्यांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने अशी कठोर कारवाई झाली पाहिजे याबद्दल दुमत नाहीच, पण घाम गाळून कमावलेला पैसा त्यात गुंतला असेल तर ज्याचा त्याला मिळालाच पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT