तांदलवाडी (ता. रावेर): पक्षी हा जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक असून, जगभरातील पक्ष्यांची जैवविविधता झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक पक्षी-प्रजाती दुर्मीळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत. राज्यातील पक्ष्यांचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवून त्यांच्या संरक्षणाप्रति जबाबदारी स्पष्ट व्हावी, यासाठी पाच ते १२ नोव्हेंबर हा आठवडा ‘पक्षी सप्ताह’ साजरा करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरत आहे.
भारतीय पक्षी अभ्यासशास्त्राचा पाया रचून जागतिक स्थरावर पोहोचवणारे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त बर्डमॅन डॉ. सलीम अली आणि भारतीय पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पक्षी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वनमंत्री यांनी दिली.
खानदेशातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात विदेशी पक्षी सैबेरिया, मंगोलिया, तिबेट, चीन, युरोप, रशिया, पाकिस्तानातून स्थलांतर करून येतात. आतापर्यंत या जलाशयावर १३० प्रजातींवर पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून, दरवर्षी भारतातील तसेच राज्यातील पक्षितज्ज्ञ व पक्षी अभ्यासकांची गर्दी होत असते. काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोकाग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या दुर्मीळ प्रजातीही या ठिकाणी आढळून येतात. त्यांच्या संवर्धनासाठी या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.
पक्षिप्रेमींकडून विविध उपक्रम
स्थानिक पक्षी तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, पक्षी अभ्यास, पक्षीविषयक माहितीपत्रे, माहिती पुस्तक प्रकाशित करून जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, पक्षी छायाचित्र प्रदर्शन, कार्यशाळा, पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त पक्षी व त्यांचा अधिवास, पक्ष्यांचे स्तलांतर आदी उपक्रम पक्षी सप्ताहादरम्यान घेण्यात येतील.
पक्षी सप्ताह हा शासन स्तरावर करण्यात यावा, अशी मागणी आम्ही ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’च्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून करीत होतो. मागणी मान्य झाल्याने वन विभागाने प्रयत्नशील राहून पक्ष्यांविषयी जनजागृती अधिक चांगल्या प्रकारे होईल, अशी अपेक्षा आहे.
- अनिल महाजन, पक्षी अभ्यासक
जैवविविधता समिती सदस्य, जळगाव.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.