बोदवड : मी राष्ट्रवादीत गेलो, बीएचआरच्या (BHR) चौकशीचा पाठपुरावा केला, त्यामुळे अडचणीत येत असलेल्या काहींनी माझ्यामागे ‘ईडी’ची (ED) चौकशी लावली. याआधीही माझ्या मालमत्तांची अनेकदा चौकशी झाली. मी वडिलोपार्जित सधन आहे, पण मास्तराच्या पोराकडे बाराशे कोटींची मालमत्ता आली कोठून, असा प्रश्न विचारत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) शुक्रवारी (ता. १) पुन्हा एकदा आक्रमक झाले.
बोदवड येथे जय माता दी जिनिंगमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य व सहकारी निवडणुकीच्या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, तालुकाध्यक्ष उद्धव पाटील व्यासपीठावर होते.
खडसे आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना खडसे शांत कसे, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याच खडसेंनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत टीका केली. २०१४ पर्यंत जिवाचे रान करत पक्ष वाढविला, राज्यात सत्ता आणली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याबाबत फोन आला असताना अचानक रात्रीतून निर्णय बदलला. त्यानंतरही सातत्याने अन्याय झाला आणि आता राष्ट्रवादीत गेल्यानंतर ईडीची चौकशी मागे लावल्याचे ते म्हणाले.
त्यांची चौकशी का नाही?
माझ्यामागे चौकश्या लावल्या. अनेकदा मालमत्तांची तपासणी झाली. मी वडिलोपार्जित शेतकरी, शेतजमिनीचा मालक आहे. कितीही चौकश्या झाल्या, तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. मात्र, एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या मास्तराच्या मुलाकडे बाराशे कोटींची मालमत्ता कशी जमली? त्याची चौकशी का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी गिरीश महाजनांचे नाव न घेता उपस्थित केला. जामनेर मतदारसंघ शिवसेनेचा होता. राजाराम पवार आमदार असताना मी ‘यांना’ तिकीट दिले, असा दावाही त्यांनी केला.
शंभर टक्के यश मिळविणार
जिल्ह्यातील नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला शंभर टक्के यश मिळेल, असा शब्द श्री. पवार यांना दिला असून, त्यासाठी कामाला लागा. बोदवड नगरपंचायतीत सर्व १७ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी गटनेता कैलास चौधरी, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक दीपक झांबड, विजय पालवे, रामदास पाटील, मधुकर राणे, गोपाल गंगतिरे, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.
मतदारसंघात महिला असुरक्षित
गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये एका महिलेच्या संदर्भात संवाद असून, संबंधित महिलेच्या पतीने या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच मी याबाबत इशारा दिला होता. ‘जर असे झाले तर महिला सुरक्षित राहणार नाहीत...’ आणि आता तोच अनुभव येत आहे, असे सांगत त्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.