जळगाव : लॉकडाउनमुळे कमी झालेल्या वाहतुकीचा फायदा घेत चौपदरीकरणाचे काम गतीने करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. तरसोदपासून फागण्यापर्यंत या कामाचा आढावा घेतला असता तीन-चार ठिकाणी बोटावर मोजण्याइतक्या मजुरांव्यतिरिक्त काम थंड बस्त्यात होते.
कोरोनाचा संसर्ग फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागला आणि एप्रिलपर्यंत तो तीव्र झाल्यानंतर राज्यात लॉकडाउन जारी करण्याची वेळ आली. या ‘लॉकडाउन’मुळे जसे व्यवसाय, उद्योग बंद पडलेत तसा त्याचा प्रभाव पायाभूत सुविधांच्या कामांवरही झाला.
आधीच संथ, आता ठप्प
‘लॉकडाउन’च्या कारणाखाली फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे कामही आता ठप्प झाले आहे. चार वर्षांपासून खरेतर या कामाला ग्रहण लागलेले असताना ते अद्याप ४० टक्केही पूर्ण होऊ शकलेले नाही. गेल्या सहा महिन्यांत या कामाने थोडी गती घेतली होती. मात्र, एप्रिलमध्ये लॉकडाउन सुरू झाल्यानंतर हे काम आता पुन्हा थंड बस्त्यात गेले आहे.
किरकोळ काम सुरू
या कामाचा आढावा घेतला असता पाळधी ते थेट फागण्यापर्यंत या कामाची प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टद्वारे पाहणी केली. धुळे जिल्ह्यात या टप्प्याचा फागणे असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात अजंग गावापासून हे काम अग्रोह कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या मक्तेदार एजन्सीकडे सोपविण्यात आले आहे.
सपाटीकरणाचे काम
अजंग गावाजवळ महामार्गाच्या एका लेनवर टाकलेल्या मुरमाचे सपाटीकरण, तसेच डांबरीकरणावर रोलर फिरवणे सुरू होते. मुकटी पारोळ्याच्या दरम्यान एका नाल्यावर छोट्या पुलाचे काम सुरू होते. मात्र, त्याठिकाणी दोन-चारच मजूर काम करताना दिसून आलेत.
पारोळा-एरंडोलदरम्यान किरकोळ कामे
पारोळा ते एरंडोल या टप्प्यात काहीअंशी काम मार्गी लागले आहे. परंतु, सद्य:स्थितीत या टप्प्यात एकाही ठिकाणी काम सुरू असल्याचे दिसून आले नाही. काही ठिकाणी जेसीबीद्वारे रस्त्यालगतची माती काढून ती ट्रकमध्ये भरणे, बाजूला करणे आदी कामे किरकोळ स्वरूपात दिसून येत होती.
एरंडोल-पाळधीच्या टप्प्यात
एरंडोल- पाळधी या टप्प्यात काही भागातील महामार्ग दोन्ही लेन काही अंतरापर्यंत तयार आहेत. परंतु सलग दोन-चार किलोमीटरचा टप्पा अद्याप कोणत्याही ठिकाणी पूर्ण झालेला नाही. काही ठिकाणी मशिनरी केवळ रस्त्यावर पडून होती.
लॉकडाउनचा लाभ नाहीच
तरसोद-चिखली या टप्प्यात गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये वेल्स्पन इन्फ्रा या मक्तेदार एजन्सीने वाहतुकीची वर्दळ नसल्याचा लाभ घेत बहुतांश काम मार्गी लावले. मात्र, त्या धर्तीवर अग्रोहला फागणे- तरसोद टप्प्यातील कामाला गती देता आली नाही. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात लॉकडाउन सुरू झाले असून, वाहतूक बंद नाही पण कमी झाली आहे. त्याचा लाभ घेऊन कामाला गती देणे गरजेचे आहे. मात्र, या ८७ किलोमीटर टप्प्याचे काम कधी पूर्ण होईल, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.