रावेर/चिनावल : तालुक्यातील चिनावल येथील इंडिकॅश कंपनीच्या (Indicash Company) एटीएममधून (ATM) तांत्रिक बिघाडामुळे ‘अतिरिक्त’ पैसे मिळालेल्या ग्राहकांचे समाधान (Customer) औटघटकेचे ठरणार आहे. गुरुवार (ता. २३)पर्यंत एटीएममधून निघालेले अतिरिक्त पैसे जे ग्राहक परत करतील त्यांची नावे पोलिस ठाण्यात देण्यात येणार नाहीत, मात्र जे ग्राहक अतिरिक्त पैसे परत देणार नाहीत त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा एटीएम कंपनीच्या चालकांनी दिला आहे.
चिनावल येथील टाटा इंडिकॅश या कंपनीच्या एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत, त्याच्या पाच किंवा दहापट जास्त पैसे निघत असल्याचे काही ग्राहकांना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी आढळले. ही वार्ता गावात पसरताच जास्तीचे, अतिरिक्त पैसे काढण्यासाठी या एटीएमवर प्रचंड गर्दी झाली. रेटारेटी आणि लोटालोटी यातूनही अनेकांनी या एटीएममधून पाच ते दहापट जादा पैसे काढले आणि आनंदोत्सव साजरा केला. काहींनी या आनंदात पार्ट्याही केल्या. सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत एटीएमजवळ प्रचंड गर्दी आणि गोंधळ सुरू होता. मात्र, नंतर सावदा पोलिस ठाण्याचे पोलिस येताच पैसे काढणाऱ्यांनी धूम ठोकली. या घटनेची रात्री उशिरा आणि बुधवारी (ता. २२) सकाळपासून जिल्हाभर चर्चा सुरू होती. बुधवारी सकाळी हे एटीएम चालविणाऱ्या सीएमएस कंपनीचे कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की मंगळवारपासून एटीएममधून कोणी, कोणत्या एटीएम कार्डवरून आणि कोणत्या बँकेच्या खात्यातून पैसे काढले, याची माहिती गुरुवारी (ता. २३) आमच्या कंपनीचे तज्ज्ञ इंजिनिअर आल्यानंतर मिळेल. तोपर्यंत ज्यांना अतिरिक्त पैसे मिळाले आहेत, त्यांनी ते स्वतःहून जमा करावेत, अशी अपेक्षा आहे. ज्यांच्याकडून पैसे मिळणार नाहीत, त्यांची नावे कंपनी सावदा पोलिस ठाण्यात देणार आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा कंपनी दाखल करणार आहे. तसेच एटीएमच्या भोवतालच्या काचादेखील लोटालोटीत फुटल्या आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला, अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हादेखील दाखल होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
पैसे काढणाऱ्यांचे धाबे दाणाणले
सीएमएस कंपनी करणार असलेल्या कारवाईबाबत चिनावल गावात माहिती मिळताच एटीएममधून अतिरिक्त पैसे मिळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बुधवारी दुपारपर्यंत काही ग्राहकांनी ५० हजार रुपये कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे जमा केले आहेत व अजूनही पैसे येत आहेत. कंपनीचे कर्मचारी ग्राहकांकडून अतिरिक्त मिळालेले पैसे घेताना त्यांना पावती देत नाहीत, असे ‘सकाळ’ प्रतिनिधींच्या लक्षात आले आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ज्यांना अतिरिक्त पैसे मिळाले आहेत व जे स्वतः पैसे परत देत आहेत त्यांना त्या रकमेची पावती द्यावी व पैसे पोलिसांच्या उपस्थितीत स्वीकारावेत, अशीही मागणी ग्राहकांनीही केली.
आनंदाच्या भरात पार्ट्या..
अतिरिक्त पैसे काढताना उत्साहाच्या भरात आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत, याचेही भान काही उत्साही युवकांना राहिले नाही. मात्र, आता त्यांचे धाबे दणाणले असून, पैसे परत देण्यास सुरवात झाली आहे. मात्र, काहींनी उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात पार्ट्या केल्याने आता खिशातून भरपाई देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दोन तासांत काढले आठ लाख
चिनावल येथील बसस्थानकाच्या मध्यवर्ती जागेत असलेल्या या टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएममध्ये दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठ लाख ५० हजार रुपये भरले होते. मंगळवारच्या या प्रकारात आठ लाख ३६ हजार ५०० रुपये एटीएममधून काढले गेल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन तासांत अतिरिक्त पैसे मिळण्याच्या मोहात उत्साही युवकांकडून पैसे काढले गेल्याचा प्रकार दुर्दैवाने घडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.