माजी मंत्री एकनाथ खडसे काल-परवा खड्ड्यात गेलेल्या जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी थेट रस्त्यावरच उतरले. जळगावचं कुणी तारणहारच नाही म्हटल्यावर खडसेंनी प्रामाणिक हेतूने शहराच्या हिताचे विषय लावून धरले, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, दहा वर्षांपूर्वीचे खडसे, त्यांच्यामागील संघटनशक्ती आणि आताची त्यांची राजकीय ‘पोजिशन’ यात खूप फरक आहे. शिवाय, निगरगट्ट यंत्रणा, हतबल व निष्क्रिय नगरसेवक आणि उदासीन लोकप्रतिनिधींना खडसे किती पुरे पडणार, हा प्रश्नच आहे.
गेल्या आठ वर्षांपासून खड्ड्यात गेलेल्या जळगाव शहराला बाहेर काढणारा कुणी ‘तारणहार’ मिळत नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस शहराची अवस्था अधिकच वाईट होत चाललीय. सहा वर्षांपासून सुरू झालेल्या अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. या योजनेमुळे संपूर्ण शहरातील रस्ते खोदून ठेवले, त्यांचे नूतनीकरण तर दूरच; दुरुस्तीही झालेली नाही. वॉटरग्रेसला स्वच्छतेचे ५८ कोटींचे कंत्राट देऊनही स्वच्छतेचा बोजवारा वाजतोय. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा पत्ताच नाही.(Monday Column about Jalgaon Political Situation Related to Eknath khadse Jalgaon News)
ही दुरवस्था असताना, जळगाव शहराच्या विकासाच्या बाता मारणारे तत्कालीन व आताचे मंत्री, महापालिकेतील पदाधिकारी काहीही न करता अक्षरश: तमाशा पाहत आहेत आणि ही स्थिती असताना, खडसेंनी काल-परवा जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाची अचानक पाहणी करत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले.
कारण स्वत: खडसे काही वर्षांपासून जळगावच्या राजकारणापासून तसे अलिप्त आहेत. याआधी भाजपत असताना, त्यांनी सुरेशदादा जैन यांच्याविरोधात सातत्याने संघर्ष करत त्यात काहीअंशी यशही मिळविले आहे. त्या वेळी सुरेशदादांसारख्या प्रस्थापित नेत्याविरोधात लढणारे खडसे आणि आता जळगावातील रस्त्यावर उतरत कामाचे ‘ऑडिट’ करणाऱ्या खडसेंमध्ये मात्र बराच फरक आहे.
खडसे भाजपत असताना, त्यांनी जळगावात जैन अन् भुसावळला चौधरी बंधूंविरोधात जो काही लढा उभारला त्यात नेतृत्व खडसेंचे असले, तरी त्यांच्यामागे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. शिवाय त्या वेळी खडसेंचाच शब्द पक्षात ‘प्रमाण’ असल्याने पक्षश्रेष्ठींचा भरभक्कम पाठिंबाही त्यांना होता. ते विधिमंडळ सभागृहात गटनेते व नंतर विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे पक्ष विरोधात असले, तरी खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर बऱ्यापैकी प्रभाव, प्रशासनावर चांगला वचकही होता.
सुरेशदादांच्या नेतृत्वात तत्कालीन पालिकेचा गैरव्यवहार, जिल्हा बँकेतील अपहार यासारखे विषय उचलून धरत खडसेंनी जळगावातील सभा प्रत्येक पालिका व विधानसभा निवडणुकीत गाजविल्या. त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळत गेला. त्यातून शहरात भाजपची ताकद वाढली. मात्र, तेव्हा पन्नाशीत असलेल्या खडसेंनी आता सत्तरी ओलांडलीय. वाढत्या वयासह प्रकृतीमुळे त्यांच्या क्षमतेवरही मर्यादा आल्यात. तद्वतच या काळात तापी, गिरणेच्या पुलाखालून बरेच ‘राजकीय’ पाणीही निघून गेले.
खडसे आता भाजपत नाहीत. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरलीय. राष्ट्रवादीत विधान परिषदेवर आमदार होऊनही ‘मविआ’ची सत्ता गेल्याने खडसेंना पुन्हा विरोधातच बसावे लागतेय. त्यांचा मूळ स्वभावच संघर्षाचा असल्याने विरोधी पक्षात राहिल्याने त्यांना काही फरक पडत नाही. आता पुन्हा जळगावात संघर्ष करायचा म्हणून ते मैदानात उतरत असतीलही, पण त्यांच्या संघर्षाला हव्या असलेल्या पाठबळासाठी कार्यकर्त्यांच्या फळीची राष्ट्रवादीत वानवा आहे. कार्यकर्तेच काय, राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील नेतेही खडसेंचे नेतृत्व मान्य करायला तयार नाहीत. भाजपत जसा त्यांचा शब्द ‘प्रमाण’ होता, तसा राष्ट्रवादीत नाही. त्यामुळे पक्षनेतृत्व खडसेंना कोणत्या बाबीत, कितपत साथ देते, याबद्दल शंका आहे.
सरतेशेवटी २००१ च्या तत्कालीन पालिका निवडणुकीतील लोकनियुक्त नगराध्यक्ष (भाजपचे डॉ. के. डी. पाटील), २००३ च्या निवडणुकीत भाजपचे तुल्यबळ सदस्य निवडून आणणे, जळगाव विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत जैनांना जेरीस आणण्यासह मोदी लाटेवर स्वार होत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जळगावातून भाजप उमेदवार विजयी करण्यापर्यंत खडसेंचे योगदान वादातीत असले, तरी जळगाव शहरावर अधिराज्य गाजविण्यात त्यांना यश आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सर्वांनाच अनुभवले, पारखले...
तत्कालीन जळगाव पालिकेत एकछत्री अमल राखताना जळगावकरांनी सुरेशदादा जैनांचे नेतृत्व अनुभवले. खडसेंनी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातूनही भाजपच्या नेतृत्वाची काही काळ का होईना नागरिकांनी चव चाखली. २०१८ ला गिरीश महाजनांच्या शब्दावर विश्वास ठेवत त्यांनाही पारखले. पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटलांचाही अनुभव घेतला, पण जळगावला समृद्ध करण्यात ही सर्वच नेतृत्वे अपयशी ठरलीत. त्यामुळे ‘आता यापैकी कुणीच नको, किंवा सुरेशदादाच बरे होते’, अशी नागरिकांची मानसिकता झाली असेल, तर त्यात त्यांचा काय दोष?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.