आल्हाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
Jalgaon Election News : आगामी काळात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार आणि अजित पवार गट), शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट) या प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने देखील नियोजन सुरू केले असून, एमआयएमसाठी पडद्यामागून हालचाली सुरू करण्याचे प्रयत्न विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत.(Movement of MIM with major parties dynamic Preparation for Local Self Government Elections jalgaon news)
तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेसह जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लढविण्याची पूर्ण तयारी ‘एमआयएम’ने सुरू केली आहे.
तालुक्यातील कासोदा, आडगाव जिल्हा परिषद मतदार संघ आणि कासोदा पंचायत समिती मतदारसंघावर ‘एमआयएम’ने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील अल्पसंख्याक समाजाची मतदारसंख्या लक्षात घेता पालिका निवडणुकीत एका माजी नगरसेवकाने एमआयएमच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह प्रभागातील निवडणुका लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्यामुळे राजकीय पक्षांच्या इच्छूक उमेदवारांसमोर आव्हान उभे राहणार आहे.
शहरात भाजप, शिवसेना (शिंदे गट आणि ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) या पक्षांचे संघटन मजबूत असून, कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य असले तरी काही प्रभागात त्यांना अनुकूल वातावरण आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघते, यावर पालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
ईदच्या मिरवणुकीत घडलेल्या प्रकारामुळे शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले असून, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न ‘एमआयएम’कडून केला जात आहे. शहरात एमआयएमचे अधिकृत पदाधिकारी नाहीत. मात्र संघटनात्मक नियुक्ती करण्याबाबत देखील प्रयत्न केले जात आहे.
..तर राजकीय चित्र धक्कादायक
नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांमध्ये इच्छूक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, सर्वच उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. शहरात विविध सण, धार्मिक उत्सव, वाढदिवस याचे लागणाऱ्या शुभेच्छा फलकांवर इच्छूक उमेदवारांच्या नावापुढे भावी नगरसेवक म्हणून उल्लेख केला जात आहे.
राज्यात सत्तारूढ असलेल्या महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडी पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवतात की युती आणि आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातात, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढविल्यास धक्कादायक निकाल लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.