चाळीसगाव शहराच्या नैऋत्येस १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणादेवी या गावात जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. जवळच पाटणा गाव असल्याने हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.
एका आख्यायिकेनुसार, शके ११५० (इ. स. १२२८)मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले, असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते. (navratri special article on Awakened Aadishakti Chandika Devi jalgaon )
माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्याला येतात. मात्र, त्यांचा त्या ठिकाणी पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरीरातील प्राण काढून घेते. त्यामुळे तिचे शव यज्ञमंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करू लागतात. त्या वेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो.
अशा वेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंदस्वामी यांनी तपस्या करून चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरून खाली यावे, अशी विनंती गोविंदस्वामींनी भगवतीला केली.
यावर भगवतीने होकार देताना गोविंदस्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंदस्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. त्यावर भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर, तेव्हा माझी स्वयंभू मूर्ती तुझ्या हातात येईल, असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना गोविंदस्वामी यांनी केली आहे.
मंदिरालगतचा परिसर अत्यंत नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूंनी अर्धचंद्राकार सह्याद्री पर्वतांचे उंच कडे असून, अनेक वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते.
विशेषतः पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्नता देणारे, शांत व आल्हाददायक असते. या दिवसांत मंदिराच्या चौथऱ्यावरून मंदिराच्या भोवतालचा परिसर पाहिल्यावर वनराईने नटलला दिसतो.
पर्वतांचे उंच कडे, रंगीबेरंगी फुला-फळांनी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळखळ वाहणारे ओढे हे सर्व दृश्य पाहताना निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय राहत नाही. देवीचे मंदिर सध्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या निगराणीत आहे. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भगवती महापूजा, चक्रपूजा, होमहवन पार पाडले जात आहेत. पाटणादेवीचे मंदिर साधारणतः बाराव्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंती मोठ्या मंदिरांत त्याची गणना होते.
दहा ते बारा फूट उंच चौथऱ्यावर त्याची रचना पूर्वाभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून, त्याला २८ कोपरे आहेत. ७५ बाय ३६ फूट मंदिराची लांबी-रुंदी; तर १८ फूट उंची आहे. गाभाऱ्यात सभामंडपात एक पुरातन शीलालेखही आहे. पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे.
देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. पाटणादेवीचा संपूर्ण परिसर गौताळा अभयारण्यात येतो. ज्यात कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर, सीतान्हाणीनामक लेणे, शृंगारचौकी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आदींचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.