Jalgaon News: वाढदिवस, मंत्री, नेत्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ स्वागत फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात येत असतात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण दिसून येते. महापालिकेने आता शहरात ‘नो बॅनर झोन’ जाहीर केला आहे.
महापालिकेने शहरात बॅनर लावण्यास परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. यानंतरही ज्यांनी बॅनर लावले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. (No banner Zone announced in city jalgaon news)
शहरात अनेक भागात मोठमोठे बॅनर लावण्यात येत असतात. त्यात काही महापालिकेच्या परवानगीने, तर काही विनापरवानगीने लावण्यात येत असतात. विशेष म्हणजे, परवानगी घेतलेले काहीजण रस्त्यावर कोठेही आपले बॅनर लावत असतात. विनापरवानगीचे बॅनरही अनेक भागात लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे.
नेत्यांच्या दबावामुळे कारवाई नाही
शहरात राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते नेत्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावत असतात. त्यात बहुतांश जण विनापरवानगीने ते लावत असतात. काहीजण एकाची परवानगी घेऊन दहा बॅनर लावतात. महापालिकेतर्फे कारवाई करण्यास आल्यास त्यांच्या नेत्यांचा दबाव येतो. त्यामुळे महापालिका त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ ठरत होती.
आता थेट गुन्हे दाखल
बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्यामुळे अमरावती, नागपूर महापालिकेतर्फे शहरात ‘नो बॅनर’ झोन करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे बॅनर लावण्यास परवानगी दिली जात नाही. तसेच बॅनर लावल्यास थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येतो. त्याच धर्तीवर आता जळगाव महापालिकेनेही शहरात ‘नो बॅनर झोन’ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता शहरात बॅनर लावण्यास परवानगी देणे महापालिकेने पूर्णपणे बंद केले आहे. आता कोणालाही बॅनर लावण्यास परवानगी देण्यात येत नाही. जर कोणी बॅनर लावल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत शहरात सात जणांवर शहर विद्रूपीकरणांतर्गत महापालिकेतर्फे पोलिसांत गुन्हे दाखल करून बॅनरही काढण्यात आलेले आहेत.
महापालिका घेणार निर्णय
शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे सद्यःस्थितीत शहरात ‘नो बॅनर झोन’ जाहीर करण्यात आला आहे. शहरात सद्यःस्थितीत कोणतेही बॅनर लागणार नाही. तसेच कोठेही बॅनर लावता येणार नाही. महापालिका बॅनर लावण्यास परवानगी देणार आहे.
मात्र आता महापालिका जागा ठरवून देईल त्याच ठिकाणी बॅनर लावण्यात येतील, दुसऱ्या ठिकाणी बॅनर लावल्यास ते जप्त करून संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. महापालिका आता शहरात बॅनर लावण्याच्या जागा लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु सध्यातरी कोठेही बॅनर लावण्यास बंदी करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.