Jalgaon Fraud Crime : कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील यांनी बनावट जन्मादेश दाखला सादर करून सेवेचे वर्ष वाढवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जामनेर न्यायालयाने त्यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठवली आहे. (principal has been sentenced to hard labor for cheating government jalgaon crime news)
कासोदा (ता. एरंडोल) येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महानंदा पाटील या नियम व वयोमानानुसार २०१५ मध्ये निवृत्त होणार होत्या; परंतु त्यानंतरही त्यांनी सेवेत कायम हजर राहून शासकीय लाभ प्राप्त करण्याच्या गैरहेतूने प्रतिज्ञापत्रात जाणीवपूर्वक खोटी जन्मतारीख नमूद केली होती.
हा जन्मदाखला त्यांनी जामनेरचे तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी यांची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून प्राप्त केला होता. या प्रकरणी शिक्षण संस्थेने येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गंभीर गुन्ह्याची सुनावणी बुधवारी (ता. २९) जामनेर न्यायालयासमोर झाली.
या प्रकरणात सरकारी वकील कृतिका भट यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष घेतली. यात नरेंद्र भिकनराव पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीने केलेला गुन्हा हा आर्थिक स्वरूपाचा व गंभीर असून, शासनाची दिशाभूल करणारा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जामनेर न्यायालयाने मुख्याध्यापिका पाटील यांना दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
न्यायाधीश दि. न. चामले यांच्या न्यायासनासमोर हा घटला चालला. खटल्यात सरकारी वकील म्हणून रवींद्रसिंह देवरे व अनिल सारस्वत यांनीही काम पाहिले. ॲड. प्रसन्न पाटील यांनी त्यांना मदत केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ तपास अधिकारी होते. पोलिस कर्मचारी चंद्रकांत बोदडे व नीलेश सोनार यांनी पैरवी अधिकारी म्हणून न्यायालयात मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.