जळगाव : दक्षिण भारतातील रामेश्वरम् आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वरापेक्षा जळगाव जिल्ह्यातील रामेश्वर या शिवालयाचे (Ram Navami 2023 ) स्थानमहात्म्य तसूभरही कमी नाही.
प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात याठिकाणी वास्तव्य केले. (ram navami 2023 special Shri Kshetra Rameshwar)
भक्तिपूर्वक पूजनासाठी त्यांनी व लक्ष्मणाने इथं लिंग स्थापन केले. विश्वामित्र ऋषींनी या लिंगांची प्राणप्रतिष्ठा केली अन् हे तापी- गिरणा- अंजनीच्या त्रिवेणी संगमावरील स्थान पावन झाले.
जळगाव जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून रामेश्वरची ओळख आहे. जळगाव शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर तापी, गिरणा व अंजनी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर रामेश्वर वसले असून, याठिकाणी दोन शिवलिंग स्थापित आहेत.
अशी आहे आख्यायिका
रामेश्वर या जळगाव जिल्ह्यातील शिवलिंगाची स्थापना श्रीरामांनी केल्याचा संदर्भ तापी पुरणाासह अरण्यकांड व स्कंद पुराणातून मिळतो. प्रभूंच्या वनवास काळात ते चित्रकूट पर्वताकडे जाताना राम, सीता व लक्ष्मण हे याच त्रिवेणी संगमावर विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात राहिले. राम शिवभक्त असल्याने त्यांनी पूजेसाठी त्यांनी संगमातून वाळू आणून शिवलिंग स्थापन केले. पुढे त्या पिंडीचे काळ्या पाषाणात रूपांतर झाल्याचे सांगितले जाते.
दोन शिवलिंगांचे दुर्मिळ ठिकाण
याच ठिकाणी प्रभू रामांसोबत लक्ष्मणानेही या स्थळी शिवलिंग स्थापन केले, म्हणून रामेश्वरला दोन शिवलिंग आढळून येतात. विश्वामित्रांनी या लिंगांची प्राणप्रतिष्ठा केली, तेव्हापासून हे स्थळ रामेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागल्याचे सांगितले जाते. दोन शिवलिंग असलेल्या भारतातील दोन स्थळांपैकी हे एक ठिकाण आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
दशरथाचा दशक्रिया विधी
प्रभू राम याठिकाणी काही दिवस वास्तव्यास होते. त्याचवेळी राजा दशरथ वैकुंठवासी झाले. रामाला हे कळल्यानंतर या त्रिवेणी संगमावर त्यांनी दशरथांचा दशक्रिया विधी व पिंडदान केल्याचीही आख्यायिका आहे. अहिल्याबाई होळकर यांनी सुमारे साडतीनशे वर्षांपूर्वी भारतभरातील हजारो मंदिरांचा जीणोद्धार केला. त्यात श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिराचाही जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळून येते.
असे विधी, असे उत्सव
श्रावण महिन्यात मेळा, पौष व माघ महिन्यात, तसेच ऋषिपंचमीलाही या संगमावर स्नानासाठी भाविकांची गर्दी होते. सोमवारी, नवरात्री, श्रीकृष्ण जन्माष्टमीला विविध कार्यक्रम, पितृपक्षात त्रिपिंडी, कालसर्प योग शांती आदी पितृमोक्ष धार्मिक कार्यक्रम येथे होतात.
रामेश्वरला असे जाल
रामेश्वरला जळगावहून ममुराबाद, विदगावमार्गे ४५ किलोमीटर, भोकरहून आठ किलोमीटर कच्च्या रस्त्याने जाता येते. आता नांद्रा, आव्हाणे, पळसोद, गाढोदामार्गेही रस्ता उपलब्ध आहे. भुसावळहून यावल- विदगावमार्गे ७५ किलोमीटर, चोपड्याहून १२, तर धरणगावपासून १५ किलोमीटरवर रामेश्वर आहे.
उनपदेव, रामेश्वरचे कनेक्शन
या मंदिराची सेवा करणारे स्वामी कृष्णचैतन्य महाराज याबद्दल बोलताना अधिक रंजक माहिती सांगतात. यापासून जवळच चोपडा तालुक्यातील उनपदेव हे गरम पाण्याचा झरा असलेले दुर्मिळ स्थान आहे. या ठिकाणी रामाने जरद आणि नीरद या दोघा राक्षसांचा वध केला. याठिकाणच्या सर्वांग ऋषींना त्वचेचा आजार झाला होता, तो उनपदेवच्या पाण्याने बरा केला, म्हणून या झऱ्याचे पाणी पवित्र मानले जाते. रामेश्वरच्या संगमावरील जमिनीत रामरक्षा आढळून येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.