धुळे : साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत ४० वर्षांनंतर प्रथमच बहुमतात विजय मिळविला, तरी भाजपला त्याचा आनंद फारसा पचनी पडला नाही. मोहिनी जाधव खून प्रकरणी विजयी नगरसेवक, काही पदाधिकारी, कार्यकर्ते अद्याप बेपत्ता असल्याने पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या पंचायतीसाठी गुरुवारी (ता. २७) नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी विजयी नगरसेविकांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध होण्यासंदर्भात गुरुवारी प्राथमिक स्वाक्षरीची प्रक्रिया पार पाडली. गॅझेटमध्ये नाव प्रकाशित झाल्यानंतर २६ दिवसांच्या आत गटनोंदणी करणे आवश्यक असून, नगराध्यक्ष निवडीची प्रक्रियाही आयोगामार्फत जाहीर केली जाईल.
नवनिर्वाचित नगरसेवक २६ दिवसांच्या आत हजर झाले नाही, तर नगराध्यक्ष निवडीबाबत पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय खून प्रकरणातील संशयित नगरसेवकांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या प्रक्रियेकडेही सर्वांचे लक्ष असेल. असे अर्ज मंजूर झाले तर ठीक, अन्यथा ते फेटाळले गेले, तर मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या स्थितीमुळे साक्रीतील घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
साक्री नगरपंचायतीसाठी बुधवारी (ता. १९) मतमोजणीसह निकाल जाहीर झाला. त्याच दिवशी सायंकाळी भाजपच्या कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराच्या मुलास भाजपच्या काही समर्थकांकडून मारहाण झाली. भावाच्या सोडवणुकीच्या प्रयत्नात त्याची चुलत बहीण कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला. फिर्यादीसह भटू जगताप यांच्या जबाबानुसार एकूण १६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर पैकी दहा जणांची नावे निष्पन्न झाली असून, सहा जणांची नावे निष्पन्न होणे बाकी आहे.
एकीकडे ही स्थिती असताना, साक्रीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचे कसे काय होईल, अशी चिंता कार्यकर्त्यांना सतावते आहे. विजयी नगरसेवक, काही कार्यकर्ते, पदाधिकारी नऊ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यात संबंधित प्रकरणातील संशयितांच्या मागावर पोलिस आहेत. दुसरीकडे विजयी गटाने अद्याप गट नोंदणी केलेली नाही. गट नेत्याची निवडही गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विजयी १७ नगरसेवकांची नावे गॅझेटमध्ये येण्यासाठी आनुषंगिक प्रस्तावावर गुरुवारी स्वाक्षरी केली. दोन ते तीन दिवसांत गॅझेटमध्ये नावे प्रकाशीत होतील. तेथून २६ दिवसांच्या आत गट नोंदणी करावी लागेल. नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम आयोगामार्फत जाहीर होईल, असे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले. या सर्व घडामोडीत साक्रीचे विजयी नगरसेवक केव्हा या शहरात उपस्थित होतात आणि कोण अटकपूर्व जामीन अर्जासाठी प्रयत्नशील राहतो किंवा कसे किंवा अन्य काय घडामोडी घडतात याकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.