जळगाव : शहरात अनेक भागांत रस्त्यांची कामे होत आहेत. काही महापालिकेच्या माध्यमातून, तर काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहेत. मात्र, या कामांची गुणवत्ता चांगली नसल्याची तक्रार आहे.
या रस्त्यांवर कोटिंगच करण्यात आलेले नाही, तर काही भागांत कोटिंग करूनही रस्त्याची खडी उखडलेली दिसत असल्याची तक्रार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम व महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी ढिम्म असून, या कामांची गुणवत्ता कोण तपासणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Road works in Jalgaon are of poor quality Public Works Municipal Officer Dham Lack of coating Jalgaon News)
शहरातील विसजनीनगर, बालगंधर्व खुले नाट्यगृह, झाशी राणी पुतळा गल्ली, गणेश कॉलनी ते न्यायालय रस्ता, सुभाष चौक, शनिपेठ आदी भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही कामे शासनाने दिलेल्या ४२ कोटींतून, तर काही कामे महापालिका व आमदार निधीतूनही होत आहेत. मात्र, या रस्त्यांच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही समाजसेवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रस्त्यांच्या कामांची पोलखोल केली आहे.
रस्त्याला कोटिंग नसल्याने खडी उखडली
मक्तेदारांनी रस्त्यांची कामे केली आहेत. त्याला कोटिंगच केलेले नाही. केवळ कच टाकला आहे. त्यामुळे रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखडली जात आहे. कामे झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत ही खडी उखडत असेल, तर त्याच्या कामांच्या दर्जाबाबत गंभीर स्थिती आहे.
कोटिंगच्या रस्त्याचे कामही निकृष्ट
शहरातील काही रस्त्यांवर मक्तेदाराने कोटिंग केले आहे. मात्र, या ठिकाणी केवळ खडी आणि डांबराचे लेअर करून त्याला कोटिंग केले आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा निकृष्ट असून, रस्त्याच्या साईडची खडी उखडली आहे.
अधिकारी मात्र ढिम्म
नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने त्याच्या दर्जाची तपासणी करण्याची गरज आहे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केलेली नाही. महापालिकेत तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ही तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल आल्यानंतर बिलाची अदायगी करावी, असा नियम आहे.
मात्र, या रस्त्याच्या गुणवत्तेची पाहणी न करताच त्याची बिलेही मंजूर होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा या रस्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या कामांची तपासणी केल्यानंतरच बिले अदा करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.