जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संजय पवारांच्या विजयाकडे केवळ ‘खडसेंना मात’ या दृष्टीने न बघता त्यामागे आगामी राजकीय समीकरणांचा व्यापक विचार करणे गरजेचे वाटते.
या निवडीत पवारांना आशीर्वाद देऊन पालकमंत्र्यांनी पुढील काळासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघ ‘सेफ’ केल्याची किनार तर आहेच, शिवाय यापुढेही जेव्हा संधी मिळेल, त्या प्रत्येकवेळी एकनाथराव खडसेंचा ‘राजकीय गेम’ करायचा या एकमेव अजेंड्यावर मंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन काम करतील, हेही यातून अधोरेखित होतेय. (sakal monday column Agenda to overcome eknath Khadse and security of constituency Jalgaon Political news)
जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष निवडीचे विश्लेषण जो-तो आपापल्या परीने, वेगवेगळ्या ॲंगलने करतोय. राज्यातील सहकारात पक्की मांड ठोकलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असूनही ज्येष्ठ नेते खडसेंच्या पदरी दूध संघापाठोपाठ जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव का पडावा? यावर खडसेंनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
विधिमंडळात खडसेंसारखा आक्रमक चेहरा हवा, म्हणून पक्षाने त्यांना विधानपरिषदेतील निवडीनंतर दुसऱ्याच अधिवेशनात गटनेता केले. श्री. खडसे त्यांच्या क्षमतेनुसार विधिमंडळ गाजवत आहेतच, पण जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाला ओहोटी लागल्याचे दिसते. पक्षाचे शीर्ष नेतृत्व खडसेंमागे असेलही, पण पक्षाचे जिल्ह्यातील नेते खडसेंचे नेतृत्व मानायला तयार नाही, हे वास्तव समजून घ्यावेच लागेल.
केवळ खडसेंना मात द्यायची, म्हणून पवारांना निवडून आणून त्यात समाधान मानण्यापलीकडे भाजपची या निवडीतील उपलब्धी शून्य आहे. दुसरीकडे उपाध्यक्षपद चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटलांकडे मिळविण्यातील यश, याहून शिंदे गटाचीही उपलब्धी नाही.
कारण असेही ते या गटाला मिळणारच होते. संजय पवार बँकेचे अध्यक्ष होणार असतील, तर त्यांना आशीर्वाद देण्यामागे खरी राजकीय खेळी गुलाबराव पाटलांची आहे.
बँक अध्यक्षपदानिमित्त पवारांची जळगाव ग्रामीण मतदारसंघातील तयारी होत असल्याचे कुणी म्हणत असेल तर ते योग्य नाही. कारण, पालकमंत्र्यांनी या निवडीसाठी पवारांना आशीर्वाद देत आपला मतदारसंघ ‘सेफ’ केल्याचे सांगता येईल.
संजय पवार स्वत:ला राष्ट्रवादीत असल्याचे मानत असतील, तर महाजन, गुलाबराव या मंत्रीद्वयींनी त्यांना आशीर्वाद देऊन स्वपक्षासाठी काय मिळविले, हा प्रश्नच आहे. अर्थात, संजय पवार हे व्यक्तिमत्त्व तसे राजकारणाच्या चौकटी पलीकडचे आहे.
ते एकाचवेळी शरद पवार, अजितदादांसह पवारांना न चालणाऱ्या सुरेशदादांनाही नेता मानतात. एकीकडे नाथाभाऊंची स्तुती करायला ते कधी मागे नव्हते. आता त्यांनी श्री. महाजन, गुलाबरावांचे बोट धरले असेल तर त्यात नवल नाही. राजकीय संधी साधायची असेल, तर संजूभाऊंसारख्या ‘स्मार्ट’ लोकांना ते हमखास जमते. असो..
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
एकंदरित दूध संघ व आता जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस व नेतृत्व म्हणून खडसेंचा पराभव झाला, हे अधोरेखित होतेच, पण जळगाव जिल्ह्यात खडसेंचा शब्द आता चालणार नाही, ही अन्य पक्षातील नेत्यांची अन् राष्ट्रवादीत खडसेंचा शब्द आम्ही ऐकणार नाही, ही त्यांच्या पक्षातील नेत्यांची भावनाही खडसेंनी समजून घेत पुढचे डाव टाकावेत, अशी अपेक्षा आहे.
स्वकेंद्रित राजकारण अन् पक्षधोरण बाजूला
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांचे राजकारण सुरवातीपासूनच स्वकेंद्रित राहिलेय. त्यासाठी कुटुंबात पदे, घराणेशाही, असे शब्द वापरून खडसेंचे नाव घेतले जाते.
मात्र, सध्या जिल्ह्यात प्रस्थापित झालेल्या नेत्यांपासून प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या नेत्यापर्यंत सर्वच आजी-माजी आमदार, नेतेमंडळी आपापले मैदान (मतदारसंघ) सुरक्षित ठेवण्यासाठी पक्ष धोरणाला फाटा देत अन्य पक्षीय नेत्यांशी संबंध राखल्याची अनेक उदाहरणे अन् प्रसंगही आहेत, म्हणूनच मंगेश चव्हाणांना दूध संघात निवडून आणताना आणि संजय पवारांना बँक अध्यक्षपदासाठी मदत करताना खडसे विरोधक म्हणून महाजन, गुलाबरावांनी कुठेही हात आखडता घेतला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.