Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांनी जाहीर केलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मंगळवारी (ता. २) कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. (sharad pawar resign Officials MLAs activists are aggressive to take sharad pawar decision of resign should be reversed jalgaon news)
शरद पवार यांनी मुंबईत त्यांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे.
येथील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयासमोर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पक्षाचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘पवार साहेब राजीनामा मागे घ्या’, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.
पवारांनी राजीनामा मागे घ्यावा : देवकर
पक्षाचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले, की शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य नाही, त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा करेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
कार्यकर्त्यांची उपस्थिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील, माजी जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, विनोद देशमुख, कार्यालयप्रमुख संजय चव्हाण, राजेश दत्तू पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
वरिष्ठांच्या आदेशाने आंदोलन मागे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राजीनामा मागे घेण्याची घोषणा करेपर्यंत आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.
ते म्हणाले, की राजीनाम्याबाबत शरद पवार दोन ते तीन दिवसांनी निर्णय घेणार आहेत, तोपर्यंत कोणीही आंदोलन करू नये, असा आदेश वरिष्ठा स्तरावरून आला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले आहे.
आमदार अनिल पाटलांचे शरद पवारांना साकडे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी त्यांना साकडे घातले असून, निर्णय मागे न घेतल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या निर्णयाने अमळनेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यासंदर्भात अनिल पाटील यांनी पवार यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे, की आपण गेल्या सहा ते सात दशकांपासून राजकीय कारकिर्दीत आपण विविध पदे भूषविली आहेत. त्यात प्रामुख्याने राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, उद्योग मंत्री तसेच १९९९ ते आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात.
गेल्या ६० वर्षातील आपले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आपले योगदान संपूर्ण देशाने बघितले आहे. परंतु आज आपण अचानक घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाला राजकीय धक्का देणारा आहे, त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आला.
परंतु, आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत. त्यामुळे आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीबाबतचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा; अन्यथा मला माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अनिल पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
उर्वेश साळुंखेंनी पवारांना रक्ताने लिहिले पत्र..
बुधगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी स्वतःचे शरीरातील रक्त काढून त्या रक्ताने लिहिलेले पत्र शरद पवार यांना पाठविले आहे.
कोण कसे व किती प्रेम पक्षाशी असलेली निष्ठा कशी व्यक्त करेल, हे सांगता येत नाही. स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा निर्णय मागे घ्यावा, या पत्रात लिहिले आहे, की आदरणीय पवार साहेब आपण आज जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हा युवकांसाठी खूप धक्कादायक आहे.
जोपर्यंत आपण या सृष्टीवर आहात तोपर्यंत आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होऊ नका...साहेब...... बाप कधी जबाबदारीतून निवृत्त होतो का? साहेब आम्हास युवकांना तुमच्यासारख्या भक्कम आधार-वडाची गरज आहे, अशी भावनिक विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी पाठविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.