Jalgaon Crime News : देवळी (ता.चाळीसगाव) शिवारात अज्ञात व्यक्तीने डोक्यात लाकडी दांड्याने वार करून व गळा आवळून खून केल्याची खळबळजनक गुरुवारी (ता. ८) समोर आली होती.
हा खून दोन्ही पोटच्या मुलांनीच केल्याचे समोर आले आहे. वडील घरखर्चासाठी पैसे देत नसत व आई आम्हाला वारंवार शिवीगाळ करायची म्हणून खून केल्याची कबुली दोघा भावांना दिली. (son killed father chalisgaon jalgaon crime news)
खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत मेहुणबारे पोलिसांनी छडा लावत या गुन्ह्यात दोघा भावांना अटक केली. दरम्यान, दोन्ही संशयितांना शुक्रवारी (ता. ९) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
देवळी (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र सुकदेव पाटील (वय ५५) यांचा चिंचखेडे शिवारातील शेतात पत्री शेडमध्ये झोपलेले असता लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून व गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. ८) उघडकीस आला होती.
खुनाचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, विष्णू आव्हाड, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. तपासकामी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून वेगवेगळी पथके तयार करून गोपनीय यंत्रणेमार्फत गुन्ह्याचा तपास सुरू केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भावंडांवरच बळावला संशय
अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केल्यावर तेथे आढळून आलेले भौतिक पुरावे, रक्ताने माखलेल्या लाकडी काठ्या, दोरी, तसेच कांदा चाळीचे तुटलेले कुलूप व तेथील कपाशीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोण्या यांचे बारकाईने निरीक्षण केले असता खुनाचा बनाव केल्याचे दिसून आले.
त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी तेथेच तळ ठोकत सर्व तपास पथकांना तपासाबाबत सूचना देऊन घटनास्थळावर हजर असलेला मृताच्या मुलांकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्या जबाबात आढळून आलेली विसंगती व सदर ठिकाणच्या संशयास्पद हालचालींवरून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून गावामध्ये त्यांच्याविषयी माहिती एकत्रित केली. यात मृताचा मोठा मुलगा मुकेश राजेंद्र पाटील (वय २३) व लहान मुलगा राकेश राजेंद्र पाटील (वय २१) यांना गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली
दोघा भावंडांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत त्यांना विश्वासात घेतले असता त्यांनी आपणच बापाचा खून केल्याची कबुली दिली. वडील हे आई व आम्हाकडून दररोज शेतामध्ये काबाडकष्ट करून घेत होते. मात्र आम्हाला घरखर्चाला, कपड्यांसाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी वेळोवेळी पैसे मागून देखील ते देत नव्हते.
तसेच वारंवार आईला व आम्हाला शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यामुळे वडिलांनाच संपवण्यासाठी कट रचला. गुरुवारी (ता.८) पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास वडील शेतात एकटे झोपलेले असताना मुकेश व राकेश हे दोन्ही दुचाकीवरून शेतात गेले व वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने गंभीर दुखापत करून नंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. तसेच हा खून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कापूस चोरण्याच्या इराद्याने केल्याचा देखावा तयार करून घरी जाऊन झोपी गेले, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
फिर्यादीच निघाला आरोपी
या खुनाच्या गुन्ह्यात फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुरुवारी (ता.८) रात्री उशिरा दोघा भावंडांना अटक केली.
हा गुन्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार मिलिंद शिंदे, सुभाष पाटील, दिलीप सोनवणे, हवालदार योगेश मांडोळे, पोलिस कर्मचारी गोरख चकोर, कमलेश राजपूत, भूषण बाविस्कर, दीपक महाजन, नीलेश लोहार, योगेश बोडके, प्रवीण पाटील, हनुमंत वाघेरे, जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर बडगुजर, दीपक नरवाडे, शैलेश माळी, होमगार्ड महेंद्र पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणला.
"या घटनेतील संशयितांनी तपासाअंती वेगवेगळी उत्तरे दिली. दोघांवर सुरवातीपासूनच संशय होता. त्यातील एकाला विश्वासात घेऊन फॉरेन्सिक लॅब मदतीने त्याची तपासणी केली असता दोन ठिकाणी रक्ताचे बारीक डाग दिसले. तेव्हाच संशय आला होता. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे." - विष्णू आव्हाड सहाय्यक निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.