Jalgaon News : दीड महिन्यापासून सुरु असलेला बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या ग्रुप ‘बी’मधील विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा घोळ अद्याप संपलेला नाही. रिक्त जागा भरून घेण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यास परवानगी दिल्याचा महाविद्यालयांचा दावा असून लवकरच ‘स्पॉट राऊंड’द्वारे प्रवेश प्रक्रिया होईल, असे संकेत मिळाले आहेत. (Spot round soon to fill vacancies by ayush prasad jalgaon news )
मध्य प्रदेश, कर्नाटक व गुजरात राज्यांत हीच स्थिती निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमधील महाविद्यालयांनी ‘एनसीआयएसएम’कडे प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढीसाठी न्यायालयात दाद मागितली. काही महाविद्यालयांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने ही प्रक्रिया लांबली.
गुजरात, मध्यप्रदेश व कर्नाटकात त्या-त्या राज्यांच्या यंत्रणेने रिक्त जागा भरुन घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरु केल्याने महाराष्ट्रातही प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जाते. वैद्यकीय अभ्यासक्रमांतील ग्रुप ‘बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या शाखांसाठी ‘आयुष’च्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील सीईटी- सेलने ३० नोव्हेंबर ‘कट ऑफ डेट’ ठरवून दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया त्याच दिवशी थांबली.
मात्र, याच दरम्यान राज्यात नव्याने आलेल्या जवळपास १२ नवीन आयुर्वेद महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने जवळपास दीडशे जागा रिक्त राहिल्या. शिवाय, पात्र विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने ते विद्यार्थीही प्रवेशापासून अद्याप वंचित आहेत.
‘सकाळ’चा पाठपुरावा
महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने त्या भरण्यासाठी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी, या महाविद्यालयांच्या मागणीचा ‘सकाळ’ने पाठपुरावा करून हा विषय संबंधित यंत्रणांपर्यंत प्रभावीपणे पोचवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही त्याची दखल घेत ‘सीईटी- सेल’सह आयुष मंत्रालयास निवेदन दिले.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने
मागील आठवड्यात विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय लागल्याचे महाविद्यालयीन प्रशासनाचे म्हणणे असून याच धर्तीवर गुजरात राज्याला ‘आयुष’ने जागा भरुन घेण्याबाबत निर्देश दिल्याने तेथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. मध्यप्रदेश व कर्नाटकातही राउंड होत असल्याची माहिती आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आठवडाभरात प्रवेश प्रक्रिया सुरु होऊ शकते.
.. म्हणून ‘स्पॉट राऊंड’
सीईटी- सेलने याआधीच तांत्रिक कारणास्तव आता ऑनलाइन राउंड घेणे शक्य नसल्याचे न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आयुर्वेद महाविद्यालयांमधील रिक्त जागा भरून घेण्यासाठी ‘स्पॉट राउंड’ होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यासाठी सीईटी- सेल नव्याने एखादी नोटीस लवकरच प्रसिद्ध करेल.
उच्च न्यायालयात आज सुनावणी
ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ‘एनसीआयएसएम’च्या वेबसाईटवर नोव्हेंबरच्या शेवटच्या दोन दिवसांत व नंतर ६ डिसेंबरपर्यंत देशभरात आणखी काही आयुर्वेद महाविद्यालयांना याच २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी मान्यता (लेटर ऑफ परमिशन) दिल्याचे घोषित केले. महाराष्ट्रात अशी सहा महाविद्यालये असून त्यांच्या जवळपास साडेतीनशे जागा आहेत.
मात्र, ही महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत येऊच शकली नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयांच्या वतीनेही उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यासह रिक्त जागा भरुन घेण्यासाठी दाखल याचिका, अशा दोन याचिकांवर एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. त्या याचिकांमध्ये ‘्आयुष’तर्फे रिक्त जागांबाबत माहिती मागविण्यात आली. त्यानंतर ८, १० व १२ जानेवारीस कामकाज झाले. आता सोमवारी (ता.१५) पुन्हा सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.