जळगाव : गुन्हेशाखेत कार्यरत असताना हजेरी मास्तरशी बोलताना मराठा समाजाप्रती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वर्षभरापासून फरार असलेल्या तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सोमवारी स्वत: शरणागती पत्करली.
तणाव लक्षात घेता या प्रकरणाचे कामकाज थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानी कोर्ट भरवून घेण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात कामकाज चालले.. जिल्हापेठ ठाण्यालाही पोलिसांचा गराडा होता.(Suspended PI Kiran Kumar Bakal finally surrendered jalgaon news)
काय आहे प्रकरण
जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हेशाखेत वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत असताना किरणकुमार बकाले यांनी मुक्ताईनगर खुनाच्या यशस्वी तपासानंतर, संबंधित पोलिस निरीक्षकांनी तपासाचे श्रेय घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला आणि त्यातून बकालेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
त्यासंबंधी संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यावर विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि समाजबांधवांसह तरुणांनी राज्यभर आंदोलन करून त्यांच्या अटकेची मागणी केली होती.
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी विनोद पंजाबराव देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचे तपासाधिकारी डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे चौकशी सुरु होती. याच गुन्ह्यात फरारी असलेले तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले सोमवारी (ता.१५) रोजी स्वतःहून पोलिसांत हजर झाले.
जमावाला गुंगारा
सोमवारी मकरसंक्रांत असल्याने न्यायालयास सुटी होती. बकाले यांच्या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याने विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने न्यायालय आवारात सकाळी साडेअकरावाजेपासूनच ठाण मांडून होते.
सुरक्षेच्या कारणास्तव तपासाधिकारी संदीप गावित यांनी पावणेचार वाजता न्यायालयातील बंदोबस्त हटवला आणि न्यायालयास विनंती केल्यावरुन बकाले यांना न्यायाधीशांच्या शासकीय निवास्थानी हजर करण्यात आले.
कडेकोट बंदोबस्त
बकाले सकाळी हजर झाल्यावर त्यांची नियमानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी चारच्या सुमारास न्या. केळकर यांच्या शासकीय निवास्थानी हजर करण्यात आले.
अप्रिय घटना घडू नये यासाठी न्यायालयाच्या आवारात आणि न्यायाधीशांचे शासकीय निवासस्थान असलेल्या परिसरात शीघ्र कृती दलाच्या तुकडीसह पोलिस निरीक्षक आर.टी. धारबळे, डॉ. विशाल जैस्वाल यांच्यासह गुन्हेशोध पथकाचे व गोपनीय विभागाचे कर्मचारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कोठडीची कारणे
संशयित जबाबदार पदावर असताना, तसेच संविधानिक पदीय कर्तव्याचे निर्वाहन करताना कुठलेही भेदभाव न करण्याबाबत शब्दबद्ध असताना बेजबादार वक्तव्य केले आहे. परिणामी पोलिस दलाची जनमानसात प्रतिमा मलीन होऊन विशिष्ट समाजाविषयी द्वेष निर्माण होऊन तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे.
जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावर जनमानसात रोष व्यक्त होऊन निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. वादग्रस्त ऑडिओ क्लिप संशयितांनी व्हायरल केली किंवा नेमकं कोणाकडून लिक झाली या बाबत तपास करणे आहे, संशयिताचा जिल्हा न्यायालयाने दोन वेळेस तर उच्च न्यायालयाने एक वेळेस जामीन फेटाळला आहे.
जामिनावर मुक्त झाल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची व जनमानसात उद्रेकाची शक्यता आहे, अशी कारणे कोठडीसाठी मांडण्यात आली. ॲड. प्रिया मेढे यांनी सरकार पक्षातर्फे, ॲड. सूरज जहाँगीर यांनी बचाव पक्षातर्फे तर ॲड. गोपाल जळमकर यांनी फिर्यादी पक्षातर्फे युक्तिवाद केला.
घटनाक्रम असा
१० सप्टेंबर २०२२ : आक्षेपार्ह संभाषणाची क्लिप लिक
१३ सप्टेंबर २०२२ : रात्री ११:३० वाजता बकालेंनी पदभार सोडला
१४ सप्टेंबर २०२२ : रोजी तडकाफडकी नियंत्रणकक्षात जमा
१५ सप्टेंबर २०२२ : जिल्हापेठ पेालिसांत गुन्हा दाखल
१५ सप्टेंबर २०२२ : पोलिस अधीक्षक डॉ.मुंडेकडून निलंबन
२६ सप्टेंबर २०२२ : जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व फेटाळला
२१ ऑक्टोबर २०२२ : औरंगाबाद उच्च न्यायालयालयाने अटकपूर्व फेटाळला
२१ डिसेंबर २०२३ : जिल्हा न्यायालयाने दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन फेटाळला
१५ जानेवारी २०२४ : किरणकुमार बकाले पोलिसांना शरण
बकालेंवरील कलम व शिक्षा...
निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या विरोधात अत्यंत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. कलम १५३(अ)- दोन समूहात, धर्मात भांडण लावण्यासाठी विद्वेष पसरविणे (शिक्षा-३वर्षे), कलम १५३(ब)-राष्ट्रीय एकते विरुद्ध प्रभाव टाकणे, लांच्छन लावणे (शिक्षा-३ वर्षे), कलम १६६-अधिकाराचा गैरवापर करून हानी पोहचवण्याच्या उद्देशाने गैरकृत्य, कलम २९४- सार्वजनिकपणे अश्लील संभाषण, कलम ५००-अब्रू नुकसानी, कलम ५०९-नैतिक अधःपतन तथा स्त्रियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य (शिक्षा-२ वर्षे).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.